कोरोना विषाणूचा डेल्टा प्रकार प्राणघातक आहे, तर ओमिक्रॉन प्रकार रोगप्रतिकारक आणि अत्यंत संसर्गजन्य आहे. आता या दोन प्रकारांच्या एकत्रीकरणातून तिसरा सुपर व्हेरियंट तयार झाल्यास मोठा अनर्थ समोर येऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ पॉल बर्टन यांनी म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी डेल्टा व्हेरिएंट आणि ओमिक्रॉनचा संसर्ग झाला तर नवीन सुपर व्हेरिएंट उदयास येऊ शकतो. युनायटेड किंगडमच्या संसदेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीसमोर हजर राहून त्यांनी सांगितले की कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना दोन विषाणूंसोबत एकत्र राहण्याची संधी मिळू शकते. डॉ बर्टन म्हणाले की डेल्टा आणि ओमिक्रॉन दोन्ही प्रकार युनायटेड किंगडममध्ये फिरत आहेत. यामुळे नवीन सुपर व्हेरियंटच्या शक्यतेला आणखी चालना मिळते.
यावेळी जगभरात दोन्हीही व्हेरिएंट मिळत आहेत. भारतामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही २२० च्या पुढे गेली आहे. दरम्यान, या व्हेरिएंटचा वाढला फैलाव पाहता बुस्टर डोसची मागणी होत आहे. अनेक देशांमध्ये बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत डेल्टा आणि ओमायक्रॉन म्हणजेच डेल्मिक्रॉन किती भयानक रूप धारण करेल, याबाबत काही स्पष्ट सांगता येणार नाही.
महाराष्ट्र सरकारच्या टास्क फोर्समधील सदस्य शशांक जोशी यांनी सांगितले की, अमेरिका आणि युरोपमध्ये डेल्मिक्रॉन (डेल्टा आणि ओमायक्रॉन स्पाईक) मुळे रुग्णांची छोटी लाट येत आहे. त्यांनी सांगितले की, भारतात ओमायक्रॉनचा किती आणि कसा प्रभाव पडेल हे पाहणे अद्याप बाकी आहे. भारतामध्ये डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव हा खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. सध्या देशामध्ये डेल्टाही उपस्थित आहे अशा परिस्थितीत सरकार आणि तज्ज्ञांकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. तसेच लोकांना मास्क वापरण्याचे आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे.