देशभरात लागू असलेल्या लॉगडाऊन दरम्यान
गरीब आणि होतकरु कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून मोफत धान्याचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र, राज्य सरकारने अनेक अटी ठेवल्या आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला .
“आगामी 3 महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून देताना केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र राज्य सरकारने अनेक अटी टाकल्या आहेत. आधी विकत मिळणारे रेशन घेतले तरच पुढचे धान्य मोफत मिळेल, ज्यांनी नियमित धान्य घेतले, त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरुपाच्या या अटी आहेत”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की, त्यांनी या अटी मागे घ्याव्यात. आज गरिबांना धान्य मोफत मिळणे अतिशय आवश्यक आहे. रेशन कार्ड असो वा नसो, धान्य देण्याचेच निर्णय अन्य राज्यांनी सुद्धा घेतले आहेत”, असे फडणवीस म्हणाले.