Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीरमने फेकून दिले कोव्हिडच्या लशींचे 10 कोटी डोस

serum institute
, शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (11:45 IST)
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या भारतातील कोरोना लशींची निर्मिती करणाऱ्या कंपनीने 10 कोटी डोस टाकून दिल्याचं म्हटलं आहे. एक्स्पायरी डेट उलटून गेल्यामुळे हे डोस टाकून द्यावे लागले.
 
मागणी कमी झाल्यामुळे सीरम कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरपासून कोव्हिशिल्ड लशीचं उत्पादन बंद केलं होतं असं सीरम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी सांगितलं.
 
जगातील सगळ्यात मोठी लस निर्मिती कंपनी असलेली सीरम सध्या अस्ट्राझेनका व्हॅक्सझेव्हिरा लशीचं स्वदेशी स्वरुपात उत्पादन घेत आहे.
 
देशभरात देण्यात आलेल्या एकूण लशींपैकी 90 टक्के लस कोव्हिशिल्ड होती.
 
कोरोना संकटादरम्यान भारतात 2 बिलिअन कोव्हिड लशीचे डोस नागरिकांना देण्यात आले. 70 टक्के कुटुंबांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली.
 
जानेवारी 2022 मध्ये भारताने आरोग्य क्षेत्रात तसंच आपात्कालीन सेवांमध्ये कार्यरत लोकांना लशीचा बूस्टर डोस उपलब्ध करून दिला. 60 वर्षांवरील नागरिकांना ज्यांना सहव्याधी आहेत त्यांनाही बूस्टर डोसची व्यवस्था करण्यात आली. काही महिन्यांनंतर सर्वच प्रौढ नागरिकांना बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आला.
 
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानिमित्ताने अर्थात अमृत महोत्सवानिमित्ताने जुलै महिन्यापासून सर्व प्रौढ नागरिकांना बूस्टर डोस मोफत उपलब्ध करून देण्यात आला.
 
भारतात 298 दशलक्ष कोरोना लशींचे डोस नागरिकांना दिल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
"बूस्टर डोसला मागणी नाही. कारण लोक आता कोरोनाला कंटाळले आहेत" असं पूनावाला यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. "खरं सांगायचं तर मीही कंटाळलो आहे. आपण सगळेच कोरोनाने कंटाळून गेलो आहोत", असं पूनावाला म्हणाले.
 
पूनावाला यांच्या मते, सीरमकडे कोव्हिशिल्डचे 10 कोटी डोस उपलब्ध आहेत. या लशींची एक्स्पायरी डेट कालावधी 9 महिन्यांचा होता. महिनाभरापूर्वी ही तारीख उलटून गेली.
 
पुण्यात आयोजित 'डेव्हलपिंग कंट्रीज व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स नेटवर्क'च्या (DCVMN) वार्षिक सर्वसाधारण सभेत पूनावाला बोलत होते. "येत्या काळात जेव्हा लोक फ्ल्यू शॉट घेतात तेव्हा कदाचित कोरोना लसही घेतील असं पूनावाला म्हणाले. भारतात फ्ल्यू शॉट घेण्याची पद्धत नाही, जशी पाश्चिमात्य देशांमध्ये आहे", असंही त्यांनी सांगितलं.
 
सीरमने कंपनीने बूस्टर डोसचा भाग असलेल्या कोव्होव्हॅक्स लशीसाठीच्या चाचण्या पूर्ण केल्या असल्याचं पूनावाला यांनी सांगितलं. पुढच्या दोन आठवड्यात या लशीच्या वापराला अनुमती मिळेल अशी आशा आहे असं ते म्हणाले.
 
ओमिक्रॉनला रोखण्यासाठी विशिष्ट अशा बूस्टर डोससाठी सीरमने अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोव्हाव्हॅक्स कंपनीशी करार केल्याचं पूनावाला यांनी सांगितलं.

Published By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय राऊत यांच्या राजकीय वक्तव्याचा त्रास का? - विशेष न्यायालय