देशात कोरोनामुक्त झालेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आढळला आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहरात राहणाऱ्या एका महिलेला 4 महिन्यांनी पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुक्त झालेला रुग्ण पुन्हा बाधित होण्याचे देशातील हे पहिलेच प्रकरण आहे. याबाबत हिंदी वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.
अहमदाबाद येथील 54 वर्षीय महिलेला पहिल्यांदा 18 एप्रिलला कोरोनाची बाधा झाली होती. यानंतर तिला कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर महिला कोरोनामुक्त झाली आणि तिला डिस्चार्ज देखील देण्यात आला. मात्र आता 124 दिवसांनी हीच महिला पुन्हा पॉझिटिव्ह आढळली आहे. देशातील असे हे पहिलेच प्रकरण असून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा मुलगा एअरफोर्समध्ये आहे. काही दिवसांपूर्वी तो पत्नी आणि 3 वर्षांच्या मुलासह दिल्लीवरून अहमदाबादला आईकडे आला होता. यानंतर महिला आणि तिच्या मुलाला ताप आल्याने चाचणी करण्यात आली, यात दोघेही पॉझिटिव्ह आढळले. मुलाला अहमदाबाद येथील डिफेन्स रुग्णालयात, तर आईला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोविड सेंटरमध्ये महिलेची अँटिबॉडी चाचणी घेण्यात आली आणि अहवाल निगेटिव्ह आला.