भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. ३० वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल. भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे.
COVAXIN लस हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीकडून तयार केली जात असून यासाठी त्यांनी आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. नुकतंच त्यांना केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून (डीसीजीआय) मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली होती.
पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व १२ ठिकाणांवरील एकूण ७५० जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.