ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच आणखी एक चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. सहा दिवसांत राज्यात कोरोना रुग्ण तिपटीने वाढले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यावर उपाययोजना याविषयी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यात सहभागी झाले होते.
जानेवारी महिन्याच्या मध्यामध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता यावेळी अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या संदर्भात कृती दलाची बैठक बोलावण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.