दक्षिण अफ्रिकेला न्यूझिलंडने धुळ चारुन अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केल्यानंतर आता जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष गुरुवारी होणार्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सेमिफायनल सामन्याकडे लागून राहिली आहे. या सामन्यावर पैजा लागल्या असून पुणे-मुंबई आणि राज्यातील इतर शहरांतून शेकडो क्रिकेटप्रेमींनी हा सामना पाहण्यासाठी चक्क ऑस्ट्रेलिया गाठले आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमधील एकही सामना उत्कंठावर्धन ठरलेला नव्हता. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेतील झालेला सामन्याने ही उणीव भरुन काढली. अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळविला. आता भारत आणि ऑस्ट्रेलियातील सेमीफायनलही अशीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे २९ तारखेला न्यूझीलंडशी कोण भिडणार, भारत की ऑस्ट्रेलिया, हे २६ मार्चच्या सेमी फायनलनंतर निश्चित होणार आहेत. त्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा आता सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खिळल्यात.