Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्युझीलंड प्रथमच वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

न्युझीलंड प्रथमच वर्ल्डकपच्या फायनलमध्ये
ऑकलँड , मंगळवार, 24 मार्च 2015 (17:15 IST)
वर्ल्ड कप 2015च्या पहिल्या सेमीफाइनलमध्ये ग्रँट इलियट नाबाद ८४ धावांच्या शानदार खेळीमुळे न्युझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ४ गडी व १ चेंडू  राखून पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. हाता - तोडांशी आलेला विजय असा हिरावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या डोळ्यात अश्रू तरळले.
 
अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात २९८ धावांचा पाठलाग करताना कर्णधार मॅकलमने २६ चेंडूत ५९ धावांची खेळी करत न्युझीलंडला चांगली सुरूवात करून दिली. त्याला इलियटची भक्कम (नाबाद ८४) साथ मिळाली. मॅकलम बाद झाल्यानंतर न्युझीलंडचे इतर फलंदाजही पटापट तंबूत परतले. मात्र इलियटने कोरी अँडरसनसोबत (५८) सावध खेळ केला आणि न्युझीलंडला विजय मिळवून देत अंतिम फेरी गाठली. दक्षिण आफ्रिकेने ढिसाळ क्षेत्ररक्षण  करत रन आऊटच्या तीन संधी गमावल्या आणि 'चोकर्स'चा बसलेला शिक्का पुसून काढण्यात संघ पुन्हा अपयशी ठरला.
 
६ व्या षटकात मॅकलम बाद झाल्यानंतर पाठोपाठ ८ व्या षटकात विल्यमसन अवघ्या सहा धावांवर बाद झाल्याने न्युझीलंडची स्थिती २ बाद ८१ अशी होती. गेल्या सामन्यात द्विशतकी खेळी करणारा मार्टिन गपटील (३४) धावबाद झाला तर रॉस टेलरला (३०) ड्युमिनीने किपरकरवी झेलबाद केले. तर स्टेनच्या गोलंदाजीवर राँची ८ धावांवर असताना बाद झाला. दक्षिण आफ्रिकेतर्फे  मॉर्केलने ३ तर स्टेन व ड्युमिनीने प्रत्येकी १ बळी टिपला. 
 
दरम्यान विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने ४३ षटकांत ५ गडी गमावून २८१ धावा केल्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार न्युझीलंडसमोर विजयासाठी २९८ धावांचे लक्ष्य होते. पावसाच्या व्यत्ययामुळे  खेळ काही वेळासाठी थांबवण्यात आला, तेव्हा आफ्रिकेने ३८ षटकांत २१६ धावा केल्या होत्या.  खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत ४३ षटकांत २८१ धावा केल्या. ड्यु प्लिसिसने (८२) एबी डिव्हिलियर्सच्या ( नाबाद ६५) साथीने शानदार खेळी केली. न्युझीलंडतर्फे अँडरसनने ३ तर बोल्टने २ गडी बाद केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi