Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारत - पाक सामन्याची तिकिटे 20 मिनिटातच संपली!

भारत - पाक सामन्याची तिकिटे 20 मिनिटातच संपली!
नवी दिल्ली , बुधवार, 4 फेब्रुवारी 2015 (14:29 IST)
विश्वचषकात भारत - पाकिस्तान संघ जेव्हा मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकतात त्यावेळी स्टेडियम ही रणभूमी असते आणि हे युद्ध आपणच जिंकावे अशी दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची इच्छा असते. या दोन्ही देशांदरम्यानच्या प्रत्येक सामन्याला क्रिकेय चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. याचाच प्रत्यय 15 फेबु्वारी रोजी होणार्‍या भारत - पाकिस्तान सामन्यांसाठीच्या तिकीट विक्रीवरुन आला. अवघ्या 20 मिनिटांतच या सामन्याच्या सर्व तिकीटांची विक्री झाली. 
 
१९९२ साली विश्‍वचषक जिंकणार्‍या पाकिस्तानला विश्‍वचषक स्पर्धेत अद्यापि एकदाही भारतावर विजय मिळवता आलेला नाही. आपल्या संघाने विश्‍वचषक जिंकला नाही तरी चालेल; पण या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करायलाच हवे, अशी दोन्ही संघांच्या हितचिंतकांची इच्छा असते. पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज शोएब अख्तरच्या मते भारत-पाकिस्तानमधील सामन्यातील विजय हा विजेत्या संघाला विश्‍वचषकापेक्षाही जास्त आनंददायी वाटतो. भारताने विश्‍वचषक स्पर्धेत नेहमीच पाकिस्तानवर विजय मिळवलेला आहे. यंदा मात्र पाकिस्तान विजयी होईल, अशी आशा तो बाळगून आहे.
 
२0११ साली विश्‍वचषक जिंकणार्‍या भारतीय संघात हरभजन सिंगचा समावेश होता; परंतु निराशाजनक कामगिरीमुळे त्याला निवड समितीने यंदा डच्चू दिला आहे. त्या वर्षी मोहाली येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला त्या सामन्याविषयी हरभजन म्हणाला, जेव्हा भारत-पाकिस्तानमध्ये सामना असतो त्या वेळी ड्रेसिंग रूममधील वातावरण तणावपूर्ण असते; पण त्याचे पडसाद हॉटेलमधील रूमपासूनच उठतात. पाकिस्तानविरुद्ध दुसर्‍या दिवशी सामना असल्यामुळे पराभूत झालो तर काय होईल? या भीतीने मी आदल्या रात्री झोपूच शकलो नाही, अशी कबुली त्याने दिली. ३४ वर्षीय हरभजनने असेही सांगितले की, सुदैवाने आम्ही तो सामना जिंकलो आणि देशभरात आनंद साजरा करण्यात आला; पण तो सामना जर आम्ही गमावला असता तर ज्यांनी कौतुक केले आहे त्यांनीच आमच्या घरांवर दगडफेक केली असती. त्या वेळच्या संघातील दुसरा फिरकी गोलंदाज पियुष चावलाचे उत्तर होते की, भारत-पाकिस्तान संघांमधील सामन्यापूर्वीच जे दडपण येते ते संघ व्यवस्थापनाकडून नव्हे तर देशातील क्रिकेटप्रेमी व आमची कुटुंबीयांकडून येते. ही मंडळी आम्हाला वारंवार आठवण करून देतात की, उद्या पाकिस्तानविरुद्ध सामना आहे. पियुष चावलाने तर गौप्यस्फोट केला की, सामन्यादरम्यान सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना मागून प्रेक्षकांमधून इशारा ऐकू येतो की, कोणत्याही परिस्थितीत सामना जिंका; अन्यथा तुम्हाला घरी जाणे अवघड होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi