Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्ल्ड कप फायनलपूर्वी अहमदाबादला जत्रेचं स्वरूप, एअर शो, दिवाळी आणि बरंच काही...

gujarat world cup
, शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (22:35 IST)
तेजस वैद्य
अहमदाबादेत 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बड्या संघांमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे.
 
1 लाख 32 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या म्हटल्या जाणाऱ्या, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा अंतिम सामना होत आहे.
 
या फायनलच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादेत सध्या एखाद्या उत्सवासारखं वातावरण आहे. फायनल रविवारी आहे, पण गुरुवारपासूनच स्टेडियबाहेर ब्लू जर्सी विक्री करणाऱ्यांनी दुकानं थाटली आहेत.
 
मुंबईहून आलेले टी शर्ट विक्रेते रवी काळे यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, "फायनल रविवारी असली तरी गेल्या तीन दिवसांपासून रोज 35-40 जर्सींची विक्री होत आहेत. फायनलच्या दिवशी किमान 150 जर्सी विकल्या जातील अशी आशा आहे."
 
टी शर्ट, कॅप आणि झेंड्यांची विक्री करणारे सुमारे 20-25 विक्रेते आतापासूनच नरेंद्र मोदी स्टेडियबाहेर दुकानं मांडून बसले आहेत. स्टेडियमच्या आसपास राहणाऱ्या काही लोकांनी लॉकरची सुविधा सुरू केली आहे. इतर शहरांमधून अहमदाबादला सामना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना पैसे देऊन त्यांचं सामान या लॉकरमध्ये ठेवता येईल.
 
काही लोक आतापासूनच स्टेडियबाहेर मुलांबरोबर सेल्फी काढायला येत आहेत. एक आजोबाही त्यांच्या नातवाला घेऊन आले होते.
 
ते म्हणाले की, "आम्ही वर्ल्ड कप फायनलचं तिकिट घेतलेलं नाही. पण ज्याठिकाणी हा सामना होणार आहे, ते स्टेडियम दाखवण्यासाठी नातवाला आणलं होतं. आम्ही सेल्फीही घेतला."
 
जुनागढहून आलेल्या वीरेंद्रभाई यांच्याशीही आम्ही बोलललो.
 
"मला तिकिट तर मिळालं नाही, पण याठिकाणी आतापासूनच जत्रेसारखं वातावरण पाहून मला फार छान वाटत आहे.
 
हाच अनुभव घेण्यासाठी मी आलो आहे. ज्याप्रकारे टीम इंडियातील प्रत्येक प्लेयर परफॉर्म करत आहे, ते पाहून भारताची जिंकण्याची प्रबळ शक्यता वाटत आहे," असं ते म्हणाले.
 
अहमदाबादेतील बहुतांश हॉटेलमध्ये बुकींग फुल झालं आहे. फेडरेशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्तराँ असोसिएशन गुजरातचे प्रमुख नरेंद्र सोमाणी यांनी याबाबत बीबीसीला माहिती दिली.
 
"सेमी फायनलमध्ये भारताचा विजय झाला त्याच दिवशी सायंकाळी वेगाने ऑनलाईन बुकींग सुरू झालं होतं. अहमदाबादेतील बहुतांश हॉटेल बूक झालेले आहेत. हॉटेलमधलं भाडंही सहा ते सात पटींनी वाढलं आहे," असं त्यांनी सांगितलं.
 
ज्या हॉटेलमध्ये इतर दिवशी सहज पाच हजारात रूम मिळायची तीच फायनलच्या दिवशी 45-50 हजारांत मिळत आहे.
 
वर्ल्ड कप फायनलमुळं अहमदाबाद विमानतळावरही मोठ्या संख्येनं प्रवासी येणार आहेत.
 
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल एअरपोर्टनं एक अॅडव्हायजरी-सूचना जारी करून प्रवाशांना सावध केलं आहे. चेक इन आणि सुरक्षा प्रक्रियेत अडचण येऊ नये, म्हणून प्रवाशांना थोडं लवकर येण्याचा सल्ला देण्यात आला आहे
 
टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाशी संबंधित आप मोदी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की,
 
"ज्या प्रवाशांनी आमच्या माध्यमातून बुकींग केलं आहे, त्यांना आम्ही अहमदाबादेतून डोमेस्टिक फ्लाईट घ्यायची असेल तर किमान चार तास आधी विमानतळावर पोहोचा, असं आधीच सांगितलं आहे.
 
हॉटेल्स बुकींगबद्दल बोलायचं झाल्यास अहमदाबादपासून 50-60 किमीच्या परिसरातील हॉटेल्सही बूक आहेत."
 
वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी देश-विदेशातून चाहते अहमदाबादला येणार आहेत. त्यामुळं अतिरिक्त रेल्वे आणि फ्लाईट्सची संख्याही वाढवण्यात येऊ शकते.
 
भारतीय हवाईदलाची सूर्यकिरण अॅक्रोबॅटिक टीम खास फायनलसाठी एक एअर शोदेखिल करणार आहे. फायनल सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटांचा एअर शो असेल, असं संरक्षण क्षेत्राच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.
 
नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर असलेल्या काही उत्साही चाहत्यांनी म्हटलं की, नुकतीच दिवाळी तर झाली आहे. पण भारतानं वर्ल्ड कप जिंकला तर देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार यात शंका नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तरकाशी : अडथळा आला नाही तर मध्यरात्री 40 मजुरांना बाहेर काढलं जाण्याची शक्यता