Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

AUS vs NZ: ऑस्ट्रेलियानं 3 बॉलमध्ये फिरवला सामना; थरारक लढतीत न्यूझीलंडचा पराभव

AUS vs NZ: ऑस्ट्रेलियानं 3 बॉलमध्ये फिरवला सामना; थरारक लढतीत न्यूझीलंडचा पराभव
, शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (21:50 IST)
आयसीसी वन-डे विश्वचषकातील शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या उत्कंठावर्धक सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा 5 धावांनी पराभव केलाय.
 
389 धावांचं लक्ष्य दिल्यानंतरही ऑस्ट्रेलियावर शेवटच्या ओव्हरमध्ये पराभवाचं सावट होतं. विशेषत: मिचेल स्टार्कनं शेवटच्या ओव्हरमध्ये टाकलेल्या वाईडवर चौकार गेल्यानं त्यांचा संघ चांगलाच अड़चणीत आला होता.
 
न्यूझीलंडला विजयासाठी 4 बॉलमध्ये 11 धावांची गरज होती. मैदानात सेट झालेला जिमी नीशाम स्ट्राईकवर असल्यानं न्यूझीलंडकडचं सामना झुकला होता.
 
त्या निर्णायक क्षणी ऑस्ट्रेलियानं खेळ उंचावला. ऑस्ट्रेलियानं पुढील 3 बॉलमध्ये न्यूझीलंडच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेतला.
 
जिमी नीशमनं शेवटच्या ओव्हरमध्ये चौकार मारण्याच्या इराद्यानं लगावलेले दोन फटके ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी दक्ष फिल्डिंग करत रोखले. त्यांनी त्या दोन बॉलवर चार धावा वाचवल्या.
 
49 ओव्हरमधील 5 व्या बॉलवरही नीशामनं जोरदार फटका लगावला होता. मार्नस लबुशेननं त्यापेक्षाही चांगलं क्षेत्ररक्षक केलं. लबुशेननं केलेल्या अचूक थ्रो मुळे नीशाम बाद झाला.
 
शेवटच्या ओव्हरमधील तीन सलग बॉलवर केलेल्या चपळ क्षेत्ररक्षणामुळेच ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकण्याची किमया केली.
 
या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग चौथा विजय आहे. तर न्यूझीलंडचा सलग दुसरा पराभव आहे.
 
राचिन रविंद्रचं शतक
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राचिन रविंद्रचं शतक हे न्यूझीलंडच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानं 89 बॉलमध्ये 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 116 धावा केल्या.
 
एकाच विश्वचषक स्पर्धेत दोन शतक झळकावणारा रविंद्र हा तिसरा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. यापूर्वी मार्टीन गप्टील (2015) आणि केन विल्यमसन (2019) यांनी ही कामगिरी केलीय.
 
भारताविरुद्ध शतक झळकावणाऱ्या डॅरिल मिचेलनं 54 धावांची खेळी करत रविंद्रला चांगली साथ दिली.
 
जिमी नीशामनं शेवटच्या ओव्हरमध्ये वेगानं धावा करत 39 बॉलमध्ये 58 धावा केल्या. न्यूझीलंडचे हे सांघिक प्रयत्न 5 धावांनी कमी पडले.
 
ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅडम झम्पानं 3 पॅट कमिन्स आणि जॉश हेझलवूडनं प्रत्येकी 2 तर ग्लेन मॅक्सवेलनं 1 विकेट घेतली.
 
हेडची दमदार खेळी
त्यापूर्वी आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या ट्रॅव्हिस हेडच्या आक्रमक शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 389 धावांचं आव्हान ठेवलंय.
 
क्रिकेट विश्वातील दोन पारंपारिक प्रतिस्पर्धींमध्ये धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये सामना सुरू आहे.
 
पहिल्याच सामन्यात शतक
विश्वचषक स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या मालिकेत ट्रॅव्हिस हेडला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतरही संघ व्यवस्थापनानं हेडला न वगळण्याचा निर्णय घेतला होता.
 
हेडनं पहिल्याच सामन्यात संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानं डेव्हिड वॉर्नरसोबत 117 बॉलमध्ये 175 धावांची झंझावती सलामी दिली. या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या वॉर्नरनं 65 बॉलमध्ये 81 धावा केल्या.
 
वॉर्नर बाद झाल्यानंतरही हेडची फटकेबाजी सुरूच होती. त्यानं 59 बॉलमध्ये 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केलं. हेडला 109 धावांवर ग्लेन फिलिप्सनं बाद केलं.
 
मॅक्सवेलची फटकेबाजी
वॉर्नर-हेड जोडी परतल्यानंतर न्यूझीलंडनं सामन्यात पुनरागमन केलं होतं. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबुशेन झटपट परतले.
 
स्मिथ-लबुशेन परतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं नैसर्गीक शैलीत फलंदाजी केली. मॅक्सवेलनं यापूर्वी नेदरलँड्स विरुद्ध विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावलं होतं.
 
मॅक्सवेलचा मागील सामन्यातील धडका न्यूझीलंडविरुद्धही दिसला. त्यानं फक्त 24 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 41 धावा केल्या.
 
मॅक्सवेल बाद झाल्यानंतरही न्यूझीलंडच्या गोलंदाजांना दिलासा मिळाला नाही. जॉश इंग्लिस आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 388 धावांचा टप्पा गाठून दिला.
 
इंग्लिसनं 28 बॉलमध्ये 38 तर कमिन्सनं 14 बॉलमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 37 धावांची खेळी केली. या जोडीनं सातव्या विकेटसाठी फक्त 22 बॉलमध्ये 62 धावांची भागिदारी केली.
 
न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मिच सँटनरनं 2 तर जिमी नीशाम आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘जायकवाडी’साठी पाणी सोडल्यास जलसमाधी; नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणीप्रश्न