Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने 'या' 6 कारणांमुळे जिंकला सहावा वर्ल्डकप

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने 'या' 6 कारणांमुळे जिंकला सहावा वर्ल्डकप
, सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (07:26 IST)
घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याचं भारतीय क्रिकेट टीमचं स्वप्न अपूर्ण ठरलंय.अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 6 विकेट्सनं पराभव केला.
ऑस्ट्रेलियाची अचूक गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण यानं सामन्याची पहिली इनिंग गाजवली. तर दुसऱ्या इनिंगमध्ये ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लबुशेन यांनी चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिलं.
ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केलीय. त्यांनी यापूर्वी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली विश्वचषक जिंकला होता.
 
ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या विश्वविजेतेपदाची 6 मुख्य कारणं काय कारणं आहेत हे पाहूया
 
टॉस का बॉस
अंतिम फेरीतील टॉसचा निर्णायक कौल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या बाजूनं लागला. कमिन्सनं संध्याकाळी पडणाऱ्या ड्यू फॅक्टरचा विचार करत पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.
 
दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजांना पिचची मदत मिळाली. भारतीय स्पिनर्सना तर सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे कमिन्सचा पहिल्यांदा फिल्डिंग घेण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियासाठी टर्निंग पॉईंट ठरला.
 
बॉलर्सना फिल्डरची साथ
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांच्या योजनेनुसार गोलंदाजी केली. त्यांना ऑस्ट्रेलियन फिल्डर्सनी भक्कम साथ दिली. ट्रॅव्हिस हेडनं मागं पळत जात रोहित शर्माचा कॅच घेतला.
नेहमीच्या आक्रमक थाटात खेळत असलेला रोहित शर्मा 47 धावांवर बाद होणं हा टीम इंडियासाठी मोठा धक्का होता. त्या धक्क्यातून भारतीय टीम सावरलीच नाही. रोहित शर्माची विकेट या सामन्यातील मोठा टर्निंग पॉईंट होता.
 
हेडप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या अन्य खेळाडूंनीही जीव तोडून क्षेत्ररक्षण केलं. डेव्हिड वॉर्नरनं प्रत्येक वेळी स्वत:ला झोकून देत चौकार अडवले. बॉलर्स आणि फिल्डर्सची अभेद्य युती तोडणं भारतीय फलंदाजांना जमलंच नाही.
 
फलंदाजांचा खराब दिवस
या संपूर्ण स्पर्धेत सातत्यानं धावा करणारी भारतीय फलंदाजी अंतिम फेरीत ढेपाळली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शेवटपर्यंत भारतीय फलंदाजांना लय सापडलीच नाही.
 
विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतक झळकावलं. पण, हे दोघंही टीमला सर्वात जास्त गरज असताना बाद झाले.
सूर्यकुमार यादवला फिनिशर म्हणून अपयश आलं. अहमदाबादच्या धिम्या पिचवर त्याला फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे भारताला 250 धावा करण्यातही अपयश आलं.
 
भारतीय फलंदाजांना 11 ते 50 या 40 ओव्हर्समध्ये फक्त 4 चौकार लगावता आले. त्यामधील दोन चौकार मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी लगावले.
 
हेड ठरला डोकेदुखी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ट्रॅव्हिस हेडचं शतक भारताचा पराभव करण्यात महत्त्वाचं ठरलं होतं. त्यानं वन-डे वर्ल्ड कपमध्येही भारताचं विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.
 
वॉर्नर, मार्श आणि स्मिथ झटपट बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची 3 बाद 47 अशी अवस्था झाली होती. हेडनं मार्नस लबुशेनला मदतीला घेत भारतीय गोलंदाजांना संधी दिली नाही.
 
हेडनं 95 बॉलमध्ये शतक झळकावलं. विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो सातवा फलंदाज ठरला. त्यानं 120 बॉलमध्ये 137 धावा काढल्या.
 
रिकी पॉन्टिंगनं 2003 च्या विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध नाबाद 140 धावांची खेळी केली होती. पॉन्टिंगच्या त्या इनिंगची आठवण हेडच्या फलंदाजीनं जागवली.
 
भारताची खराब फिल्डिंग
240 धावांचं संरक्षण करण्यासाठी एखादा चांगला झेल किंवा रन आऊट आवश्यक होते..
 
केएल राहुलसाठी यष्टीरक्षक म्हणून अंतिम सामना निराशाजनक ठरला. त्याच्या चुकांमुळे सुरुवातीला काही चौकार गेले.
 
अन्य भारतीय खेळाडूंनी राहुलचंचं अनुकरण केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं काम सोपं झालं.
 
हेड आणि लबुशेन यांना झटपट बाद करणं विश्वचषक स्पर्धेत सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांना जमलं नाही. अहमदाबादच्या पिचचीही त्यांना मदत मिळाली नाही.
 
संघ निवडीतील चूक?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये फिरकी गोलंदाजी खेळताना ऑस्ट्रेलियाची तारांबळ उडाली होती. अहमदाबादचे पिचही संथ असल्यानं आर. अश्विनचा मोहम्मद सिराजऐवजी समावेश होईल, असा अनेकांनी अंदाज व्यक्त केला होता.
 
टीम मॅनेजमेंटनं विजयी संघावरच विश्वास ठेवला. मोहम्मद सिराजला एकमेव विकेट ऑस्ट्रेलियाची विजयाची औपचारिकता बाकी असताना मिळाली. हेड आणि लबुशेननं त्याची गोलंदाजी सहज खेळून काढली.
 
सिराजच्या जागेवर अनुभवी अश्विनला खेळवलं असतं तर...पुढची काही वर्ष हा प्रश्न भारतीय चाहत्यांना सतावणार आहे.
 
















Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुब्रत रॉय यांच्यानंतर 'सहारा ग्रुप'चं पुढे काय होणार?