Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs SA : विराटचं विक्रमी शतक, जाडेजाला 5 विकेट्स, टीम इंडियाचा सलग आठवा विजय

IND vs SA : विराटचं विक्रमी शतक, जाडेजाला 5 विकेट्स, टीम इंडियाचा सलग आठवा विजय
, सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (08:25 IST)
IND vs SA : विराट कोहलीचं ऐतिहासित शतक आणि रवींद्र जाडेजाच्या फिरकीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेला 243 रन्सनी हरवलं आणि वन-डे विश्वचषकात सलग आठवा विजय साजरा केला.
 
कोलकात्यात इडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 327 रन्सचं आव्हान दिलं होतं.
 
पण रवींद्र जाडेजाच्या फिरकीसमोर दक्षिण आफ्रिकेची टीम 83 धावांतच ढेपाळली. आफ्रिकेचा विश्वचषकाच्या इतिहासातला हा धावसंख्येचा ही निचांक आहे.
 
टीम इंडियानं हा सामना दिमाखात जिंकत पॉईंट टेबलमधील पहिलं स्थान निश्चित केलंय.
 
रविंद्र जाडेजा भारतीय गोलंदाजीचा मुख्य हिरो ठरला. त्यानं 33 रन्स देत जाडेजानं पाच विकेट्स काढल्या.
 
जाडेजानं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा (11), हाईनरीक क्लासेन (1), डेव्हिड मिलर (11), केशव महाराज (7), कागिसो रबाडा (6) यांना बाद केलं.
 
वन डे विश्वचषकाच्या सामन्यात पाच विकेट्स काढणारा जाडेजा दुसराच भारतीय स्पिनर ठरला आहे.
 
ईडनवर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन विकेट्स तर मोहम्मद सिराजनं एक विकेट काढून जाडेजाला चांगली साथ दिली.
 
मोहम्मद सिराजनं दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला . या विश्वचषक स्पर्धेत चार शतक झळकावणाऱ्या क्विंटन डी कॉकला सिराजनं 5 धावांवर बाद केलं.
 
रविंद्र जाडेजानं पहिल्याच क्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाला 11 धावांवर बाद करत भारताला दुसरं यश मिळवून दिलं.
 
मोहम्मद शमीनंही त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट काढली. त्यानं एडन मार्करमला 9 रन्सवर माघारी धाडलं.
 
धोकादायक हाईनरीक क्लासेनला रविंद्र जाडेजानं अवघ्या एका रनवर तर मोहम्मद शमीनं रॅसी वेन देर ड्युसेनला 13 धावांवर बाद केलं.
 
रविंद्र जाडेजाला रिव्हर्स स्विप खेळण्याचा डेव्हिड मिलरचा प्रयत्न फसला. त्याची दांडी उडाली.
 
त्याआधी विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 326 धावांचा डोंगर उभारला होता.
 
विराटचं विक्रमी शतक, सचिनची बरोबरी
35 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या विराटनं त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व क्रिकेट चाहत्यांना जणू वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट दिलं.
 
ईडन गार्डन्सवर विराटनं 121 चेंडूंमध्ये नााद 101 रन्सची खेळी केली आणि सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 वन डे शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधली.
 
विराटनं या विश्वचषकात बांगलादेशविरुद्धही शतक झळकावलं होतं. त्यानंतर न्यूझीलंड (95) आणि श्रीलंकाविरुद्ध (88) त्याचं शतक हुकलं होतं.
 
पण ईडनवर त्यानं शतकाची संधी हातची जाऊ दिली नाही.
 
स्वतः सचिन तेंडुकलकरनंच या शतकासाठी विराटचं अभिनंदन केलं.
 
सोशल मीडियावर सचिननं लिहिलं आहे, "वेल प्लेड विराट. मला यंदा 49 वरून 50 वर येण्यास 365 दिवस लागले. मला आशा आहे की, तू पुढच्या काही दिवसांमध्ये 49 वरुन 50 वर जाशील आणि माझा रेकॉर्ड तोडशील. अभिनंदन!"
 
सामन्यानंतर विराटला सचिनच्या या ट्वीटविषयी सांगण्यात आलं, तेव्हा त्यानं नम्रपणे प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "माझ्या हीरोच्या रेकॉर्डची बरोबरी करणं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. लोक तुलना करतात पण मी कधीही त्यांची बरोबरी करू शकत नाही. ते (सचिन) परफेक्शनच्या जवळ आहेत. ते कामयच माझे हीरो असतील, काहीही झालं तरी. त्यांनी माझ्याविषयी जे म्हटलं आहे, ते खूप खास आहे."
 
विराट कोहलीला श्रेयस अय्यरनं चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागिदारी केली.
 
श्रेयसनं 77 धावा केल्या. श्रेयसचं या विश्वचषकातील हे तिसरं अर्धशतक ठरलं.
 
रोहितची आक्रमक सुरूवात
या सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित आणि शुबमननं आक्रमक सुरुवात केली. दोघांनी सलामीला 62 रन्सची भागीदारी रचली.
 
रोहितनं 24 बॉलमध्ये सह चौकार आणि दोन षटकारांसह 40 धावा केल्या. कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमानं त्याचा चांगला झेल घेतला.
 
त्यानंतर सूर्यकुमार यादव (22) आणि रविंद्र जाडेजा (नाबाद 29) यांनी अखेरच्या ओव्हर्समध्ये केलेल्या फटकेबाजी करत विराटला चांगली साथ दिली.
 
त्यामुळे मुळे टीम इंडियाला 325 धावांचा टप्पा ओलांडता आला.
 
दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजनं अचूक गोलंदाजी करत विराट कोहली आणि श्रेयस अय्यरला जखडून ठेवलं होतं. महाराजनं 10 ओव्हर्समध्ये फक्त 30 धावा देत शुबमन गिलची महत्त्वाची विकेट घेतली.
 
आता नेदरलँड्सलाही हरवणार?
विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा सलग आठवा विजय आहे. टीम इंडियानं 16 पॉईंट्सह पहिला क्रमांक नक्की केलाय.
 
भारताचा साखळी फेरीतला शेवटचा सामना नेदरलँड्सशी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
 
दक्षिण आफ्रिकेनंही भारताप्रमाणेच सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय. आफ्रिकेची पुढची लढत 10 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs SA: विराट कोहलीचं शतक, सचिनच्या विक्रमाची बरोबरी