Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोहम्मद शमी : गोलंदाजाचा विजयातला वाटा विसरू नका

मोहम्मद शमी : गोलंदाजाचा विजयातला वाटा विसरू नका
, सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (13:21 IST)
मोहम्मद शमीला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला. मला बरं वाटलं. गोलंदाजांच्या वाट्याला वन डेत हे अवॉर्ड फार कमी वेळा येतं.वन डेत प्रकाशझोत फलंदाजांवर असतो. खरंतर क्रिकेटमध्ये प्रकाशझोत फलंदाजांवरच असतो, असं म्हणणं जास्त सत्याजवळ जाईल.
 
फुटबॉलमध्ये एक गोल करणारा खेळाडूही लोकांच्या गळ्यातला ताईत असतो. गोलीने जीव ओतून दहा गोल वाचवले तरी तो हिरो होतोच असं नाही.
 
गोलंदाजाचंही दुर्दैव तेच आहे.
 
त्यात शमी अचानक नावडता झाल्यासारखा वाटला. त्याच्याकडे वेग आहे, दर्जा आहे, अनुभव आहे तरी अचानक तो संघाचा अविभाज्य भाग होणं बंद झालं.
 
मुंबईच्या लोकलच्या चौथ्या सीटपेक्षा त्याची अवस्था वाईट झाली. जसप्रीत बुमरा संघात आला की त्याला खिडकीची जागा मिळते हे मी समजू शकतो. पण म्हणून शमीने उभ राहावं, हे जरा खटकणार होतं.
 
त्यात त्याच्या बायको बरोबर ताणल्या गेलेल्या संबंधाची चर्चा अधिक झाली. मध्यंतरी त्याच्या धर्मावरून त्याला ट्रोल करण्यात आलं.
 
संकटं आली की ती झुंडीने येतात.
 
पण धर्मशालाला संधी अचानक त्याच्याकडे चालून आली आणि त्याने तिला वश करून घेतल.
 
थेट पाच बळी. म्हणजे फलंदाजाच्या शतका सारखाच परफॉर्मन्स.
 
किंबहूना शमीने सामना फिरवला. रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेलच्या भागीदारीनंतर न्यूझीलंडला 320 रन्सची मजल मारणं कठीण नव्हतं.
 
पण हाणामारीच्या षटकांत शमीनं लागोपाठ दोन बळी घेतले, ह्यामुळे न्यूझीलंड बॅकफूटवर गेल.
 
त्यात एक बळी मिचेल सॅंटनरचा होता. सॅंटनर न्यूझीलंडचा जाडेजा आहे.
 
शेवटच्या 10 षटकात फक्त 54 धावा निघाल्या आणि न्यूझीलंडला भारतानं 273 वर रोखलं.
 
शेवटी एक गोष्ट जाणवली की 300 रन्सच्या पुढच्या लक्ष्याचा पाठलाग आपल्याला कठीण पडला असता.
 
न्यूझीलंडचं क्षेत्ररक्षण म्हणजे झेड सेक्युरीटी आहे. कोहलीचे कितीतरी, गर्भात अपेक्षित चौकार असलेले ऑफ ड्राईव्ह अडवले गेले.
 
त्यामुळे यशात शमीचा वाटा निःसंशय होता.
 
विराटचं शतक झालं असतं तर फोकस कदाचित त्याचावर गेला असता. कारण ते सचिनच्या विक्रमाला भोज्या करणारं शतक ठरलं असत.
 
माझं तर मत आहे की, ह्या विश्वचषकात भारतासाठी गोलंदाजांनी आतापर्यंत स्फुरणीय कामगिरी केली आहे.
 
हातच्या कांकणाला आरसा कशाला?
ऑस्ट्रेलियाला आपण 200 च्या आत गुंडळल. प्रकाशझोत कोहली, राहुलवर गेला कारण 3 बाद 2 च्या खंदकातून आपण उसळी मारली.
 
पाकिस्तानला आपण 2 बाद 155 वरून 200त रोखल. पण मग रोहितच्या लेसर शो ने डोळे दिपले.
 
गोलंदाजांची कामगिरी विसरली गेली.
 
बांगलादेश विरूध्द बिन बाद 93 वरून त्यांना 260 जवळ रोखल गेलं.
 
विराटच्या शतकाने त्याचा प्रकाशझोत पळवला.
 
बरं हे यश गोलंदाजानी बऱ्यापैकी वाटून घेतलेलं होतं.
 
आपल्या गोलंदाजीत विविधता आहे. बुमराने बोहनी करणे आणि हाणामारीच्या षटकात धावा रोखणे, जमलेली जोडी फोडणे वगैरे जबाबदारी शिरावर घेतली.
 
थोडक्यात वाहत्या धावाना बांध घालून देणे हे काम बुमराचं. तो जास्त विकेटच्या मागे जाऊन फार वेगवेगळे प्रयोग करत नाही.
 
दुसरं म्हणजे बुमराला प्रतिस्पर्धी सांभाळायला जातात. त्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत नाहीत.
 
मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव हे अक्रमक गोलांदाज आहेत. ते विकेट काढण्याचा छंद बाळगतात. भले धावा जास्त जाऊ देत.
 
तर रविंद्र जाडेजा हे अचुकतेच दुसरं नाव आहे.
 
बुमरा जाडेजा हे चार्टर्ड अकाऊंटटं सारखे. प्रत्येक चेंडूचा जमा खर्च मांडतात.
 
तर सिराज, कुलदीप मार्केटिंग मॅनेजर सारखे. धावा खर्च होऊ देत बळी हवेत.
 
शमी किंचित मागच्या युगातला. क्रॉस सीम, स्क्रंबल्ड सीमच्या जगात उभ्या सीमवर भरवसा तो ठेवतो.
 
पण त्यामुळे भारतीय गोलंदाजीत एक मस्त समतोल आला आहे. मग हार्दिक पांड्या आला की मग सहावा गोलंदाज आपोआप येतो आणि गोलंदाज आणि कर्णधार ह्यांच्या वरचा दबाव कमी होतो.
 
मुख्य म्हणजे रोहित गोलंदाजांना हाताळतो उत्तम.
 
सिराजला मार पडल्यावरही रोहित त्याच्यावर विश्वास टाकतो आणि सिराज विकेट देऊन जातो. त्याने साठ धावा दिल्या पण दोन-तीन महत्त्वाचे बळी घेतले तर त्यामुळे फरक पडत नाही.
 
धरमशालाला कुलदीपवर मिचेलने प्रखर हल्ला केला. मस्त शास्त्रशुद्ध हल्ला होता.
 
पांच गोलंदाज असल्यामुळे रोहितकडे त्याला वापरण्याशिवय उपाय नव्हता. रोहितने त्याला चेडूची दिशा बदल सांगितलं. वेगात किंचित बदल केला. जास्त चायनामन टाकले गेले. फायदा झाला.
 
गोलंदाजाचं यश हे फक्त त्याच्यावर अवलंबून नसतं. त्याला चांगला कर्णधार आणि क्षेत्र रक्षक मिळावे लागतात. सध्यातरी त्या स्तरावर भारताचं बरं चाललंय.
 
तर सांगायचा मुद्दा काय की गोलंदाजाचा विजयातला वाटा विसरू नका.
 





















Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

1 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात दारु महागणार, कर वाढवला