Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रिकेट वर्ल्ड कप ENG vs NZ : रचिन रविंद्र, डेव्हॉन कॉनवेची शतकं, न्यूझीलंडचा गतविजेत्या इंग्लंडला दणका

क्रिकेट वर्ल्ड कप ENG vs NZ : रचिन रविंद्र, डेव्हॉन कॉनवेची शतकं, न्यूझीलंडचा गतविजेत्या इंग्लंडला दणका
, गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (22:25 IST)
रचिन रविंद्र
डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रविंद्रच्या शतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं आयसीसी वन डे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडवर 9 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला.
 
चार वर्षांपूर्वी याच दोन संघात क्रिकेट विश्वचषक इतिहासातील सर्वात रोमहर्षक अंतिम सामना झाला होता. तेव्हा न्यूझीलंडला वर्ल्ड कप गमवावा लागला होता. किवी टीमनं त्याच पराभवाची व्याजासकट परतफेड केली आहे.
 
इंग्लंडनं दिलेलं 283 धावांचं लक्ष न्यूझीलंडनं 36.2 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं.
 
खरंतर 283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली होती. विल यंग खातं उघडण्यातही अपयशी ठरला. त्याला सॅम करननं बाद केलं.
 
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रचिन रविंद्रनं इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यानं डेव्हॉन कॉनवेच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची नाबाद भागिदारी केली.
 
डेव्हॉन कॉनवेनं सर्वाधिक 152 धावा केल्या. तर रचिननं 123 धावा करत त्याला भक्कम साथ दिली.
 
डेव्हॉन कॉनवे यंदाच्या विश्वचषकातला पहिला शतकवीर ठरला. त्यानं त्याचं एकदिवसीय कारकिर्दीमधील पाचवं शतक 83 बॉलमध्ये पूर्ण केलं. त्यानं एकूण 121 चेंडूंमध्ये 19 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 152 धावा कुटल्या.
 
पाठोपाठ रचिन रविंद्रनंही एकदिवसीय कारकीर्दीतलं त्याचं पहिलंच शतक झळकावलं. रचिननं 96 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 5 षटकारांसह 123 धावांची खेळी केली.
 
कोण आहे रचिन रविंद्र?
रचिन रविंद्र विश्वचषकात शतक झळकावणारा न्यूझीलंडचा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्यानं 23 व्या वर्षीच हा विक्रम नोंदवला आहे.
 
रचिन भारतीय वंशाचा असून न्यूझीलंडच्या संघात अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचे वडील इंजिनिअर असून 1990 च्या दशकामध्ये बेंगळुरूहून न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले.
 
राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या महान भारतीय खेळाडूंच्या नावांचं मिश्रण करुन त्याचं नाव ठेवण्यात आलंय.
 
रचिननं 2021 मध्ये भारताविरुद्ध कानपूर इथं झालेल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्यानं चिवट खेळी करत न्यूझीलंडचा पराभव टाळला होता.
 
रचिनला या वर्षी मार्च महिन्यात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानं पदार्पणातील सामन्यात 49 धावांची खेळी करत सर्वांचं लक्ष वेधलं.
 
भारतीय खेळपट्टीवर त्याची उपयुक्तता लक्षात घेत रविंद्रला विश्वचषकाचं तिकीट मिळालं. या स्पर्धेआधी इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 61 धावा आणि 4 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावली होती.
 
विश्वचषकापूर्वी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात रचिन न्यूझीलंडकडून पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर उतरला. त्यानं पाकिस्तान विरुद्ध 97 धावा केल्या.
 
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात रचिनला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा उठवत त्यानं इंग्लंड विरुद्ध दमदार शतक झळकावलं.
 
रूटनं रचला इंग्लंडच्या डावाचा पाया
त्याआधी गतवेळच्या विजेत्या इंग्लंडनं ज्यो रूटच्या अर्धशतकाच्या जोरावर 9 बाद 282 धावांची मजल मारली होती.
 
या सामन्यात न्यूझीलंडनं टॉस जिंकून गतवेळच्या विजेत्या इंग्लंडला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. जॉनी बेअरस्टोनं दुसऱ्याच बॉलवर ट्रेन्ट बोल्टला षटकार ठोकत आपल्या टीमचं खातं उघडलं.
 
पण बेअरस्टो 33 धावांवर माघारी परतला. मग इंग्लंडला सुरुवातीलाच बसलेले धक्के पचवून जो रूटनं एक बाजू लावून धरली. त्यानं कोणताही धोका न पत्कारता धावफलक हलता ठेवला.
 
रुटनं 86 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. या वर्ल्ड कपमधलं हे पहिलं अर्धशतक आहे.
 
तर कर्णधार जोस बटलरनं 43 धावा केल्या. रूट आणि बटलरनं पाचव्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी केली.
 
पण न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीनं बटलरला 43 धावांवर बाद करून ही जोडी फोडली. पार्ट टाईम गोलंदाज ग्लेन फिलिप्सला मोठा फटका मारण्याचा रुटचा प्रयत्न फसला आणि तो बोल्ड झाला. फिलिप्सनंच मोईन अलीला बाद केलं होतं.
 
इंग्लंडच्या आदिल रशिद आणि मार्क वूड यांनी शेवटच्या विकेटसाठी 30 धावांची महत्त्वाची भागिदारी केली.
 
न्यूझीलंडचा मॅट हेन्री यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला. सामन्याच्या आठव्या षटकात हेन्रीनं इंग्लंडच्या डेव्हीड मलानला 14 धावांवर बाद केलं.
 
हेन्रीच न्यूझीलंडचा या सामन्यातला सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 3 विकेट्स घेतल्या. तर मिचेल सँटनरनं 10 षटकांत अवघ्या 37 धावा देत 2 विकेट्स काढल्या.
 
ग्लेन फिलिप्सनं 2 विकेट्स काढल्या तर ट्रेंट बोल्टला 1 विकेट मिळाली.
 
नरेंद्र मोदी स्टेडियम रिकामं का राहिलं?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याला म्हणावी तेवढी गर्दी जमा झालेली दिसत नाही. सोशल मीडियावरही याचीच चर्चा होते आहे.
 
आठवड्याचा मधला दिवस आहे आणि भारत खेळत नाहीये, त्यामुळे सामन्यासाठी कमी लोक जमा झाले असावेत अशी चर्चा आहे.
 
1,32,000 आसनक्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये नेमक्या किती जागा भरल्या गेल्या आहेत, त्याची आकडेवारी अजून मिळालेली नाही.
 
दरम्यान, स्टँड्समध्ये प्रेक्षक कमी असले, तर मैदानात खेळाडूंच्या उत्साहावर परिणाम झालेला नाही. ज्यो रूटच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडनं सामन्यात दोनशे धावांची वेस ओलांडली आहे.
 
या सामन्यात हे विक्रम घडले
विश्वचषक स्पर्धेतील पहिली धाव षटाकारातून आली. इंग्लंडच्या बेअरस्टोनं पहिल्या ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर ट्रेन्ट बोल्टला षटकार ठोकत आपल्या टीमचं खातं उघडलं.
 
इंग्लंडच्या सर्व 11 खेळाडूंनी दोन अंकी रन केले. एका इनिंगमध्ये सर्व 11 फलंदांजी दोन अंकी रन करण्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. जोस बटलरच्या संघानं हा विक्रम नोंदवलाय.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समृद्धी महामार्ग "हे" दिवस बंद राहणार, असा असेल पर्यायी मार्ग