Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्ल्ड कप 2023 : सेमी फायनल गाठण्यासाठी कुठल्या टीमला काय करावं लागेल?

वर्ल्ड कप 2023 : सेमी फायनल गाठण्यासाठी कुठल्या टीमला काय करावं लागेल?
, मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (22:44 IST)
वन डे विश्वचषकाचं युद्ध आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलं असून सेमी फायनलसाठीची लढाई अगदी चुरशीची बनली आहे.
 
यजमान भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे, पण त्यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. भारताशिवाय सध्या दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ सध्या पहिल्या चारमध्ये आहे.
 
पण अजून कुणाचंच सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म झालेलं नाही.
 
तसंच गुणतालिकेत कुठलं स्थान मिळतं, हेही 2025 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कारण वर्ल्डकप पहिल्या सातमध्ये येणाऱ्या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळेल.
 
चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे, त्यामुळे पाकिस्ताननं पहिल्या सात संघात आल्यास वर्ल्ड कपमधल्या आठव्या टीमलाही चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकीट मिळू शकतं.
 
उपांत्य फेरी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकीट मिळवण्यासाठी कुठल्या टीमला काय करण्याची गरज आहे, पाहूयात.
 
भारत
सध्याचे पॉईंट्स – 12 (जास्तीत जास्त 18 पॉइंट्स मिळण्याची शक्यता)
 
टीम इंडियानं उर्वरित तीनपैकी एकच सामना जिंकला, तरी त्यांचा उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चित होईल. उर्वरित सर्व सामने पराभूत झाल्यानंतरही भारतीय संघाचं टॉप चारमधील स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. थोडक्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये एखादा चमत्कारच भारतीय संघाला उपांत्य फेरीपासून दूर ठेवू शकतो.
 
भाकीत : भारतीय संघाचं सध्या एक पाऊल उपांत्य फेरीत आहे आणि त्यांचा टॉप चारमध्ये प्रवेश अगदी निश्चित दिसतो आहे.
 
दक्षिण आफ्रिका
सध्याचे पॉईंट्स – 10 (जास्तीत जास्त 16 पॉइंट्स मिळण्याची शक्यता)
 
दक्षिण आफ्रिकेनं उर्वरित तीनपैकी दोन सामने जिंकल्यास त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की आहे. त्यांना एकच सामना जिंकला किंवा सर्व सामने गमावले तरी त्यांना प्रवेश मिळू शकतो, पण त्यासाठी अन्य संघांच्या निकालांवर अवलंबून असेल.
 
भाकीत : दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित आहे आणि ते फायनल फोरच्या बाहेर फेकले गेले तर मोठा आश्चर्याचा धक्काच बसेल.
 
न्यूझीलंड
सध्याचे पॉईंट्स – 8 (जास्तीत जास्त 14 पॉइंट्स मिळण्याची शक्यता)
 
न्यूझीलंडला उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. न्यूझीलंडनं तीनपेक्षा कमी सामने जिंकले अथवा सर्व गमावले तरी त्यांना उपांत्य फेरी गाठता येईल, पण मग त्यांचं भवितव्य इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
 
भाकीत : न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीच्या प्रवेशात अडथळे आहेत, पण त्यांना उपांत्य फेरी गाठण्याची चांगली संधी आहे.
 
ऑस्ट्रेलिया
सध्याचे पॉईंट्स – 8 (जास्तीत जास्त 14 पॉइंट्स मिळण्याची शक्यता)
 
ऑस्ट्रेलियानं उर्वरित तीन्ही सामने जिंकले तर त्यांची अंतिम चारमधील जागा नक्की आहे. तीन पेक्षा कमी विजय मिळवले तर कांगारुंना अन्य निकालांवर अवलंबून राहावं लागेल.
 
भाकीत : ऑस्ट्रेलियन संघ अडखळत्या सुरूवातीनंतर आता सावरलाय. त्यांचा सध्याचा फॉर्म उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी उपयुक्त आहे.
 
अफगाणिस्तान
सध्याचे पॉईंट्स – 6 (जास्तीत जास्त 14 पॉइंट्स मिळण्याची शक्यता)
 
अफगाणिस्ताननं उर्वरित तीन पैकी एक सामना जिंकला तरी ते उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये कायम राहतील. पण, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडशी स्पर्धा असल्यानं त्यांना उर्वरित किमान दोन सामने तरी जिंकावे लागतीलचय
 
भाकीत : अफगाणिस्तानचा संघ तीन मोठ्या विजयामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. पण आता उपांत्य फेरी गाठायची, तर त्यांना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवावे लागतील.
 
श्रीलंका
सध्याचे पॉईंट्स – 4 (जास्तीत जास्त 10 पॉइंट्स मिळण्याची शक्यता)
 
उर्वरित तीन पैकी दोन सामने जिंकूनही श्रीलंका उपांत्य फेरीत दाखल होऊ शकते. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनं उर्वरित सर्व सामने गमावले तरच श्रीलंकेला संधी मिळू शकते. त्यासाठी श्रीलंकेला नेट रन रेटही सुधारावा लागेल.
 
भाकीत : अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभावानंतर श्रीलंकेचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग चांगलाच खडतर झालाय.
 
पाकिस्तान
सध्याचे पॉईंट्स – 4 (जास्तीत जास्त 10 पॉइंट्स मिळण्याची शक्यता)
 
पाकिस्तानला शेवटच्या तीन पैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनं उर्वरित सर्व सामने गमावले तरच श्रीलंकेला संधी मिळू शकते. त्यासाठी पाकिस्तानला नेट रन रेटही सुधारावा लागेल.
 
भाकीत : पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता कमी असून, त्यांना अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
 
नेदरलँड्स
सध्याचे पॉईंट्स – 4 (जास्तीत जास्त 10 पॉइंट्स मिळण्याची शक्यता)
 
आयसीसीचा सहयोगी सदस्य असलेल्या नेदरलँड्सनं या स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी केली आहे. आता उर्वरित तीन पैकी दोन सामने जिंकून ते उपांत्य फेरी गाठू शकतात. पण, त्यासाठी नेदरलँड्सला आपला रन रेट चांगला करावा लागेल. तसंच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड उर्वरित सर्व सामन्यात पराभूत होतील अशी प्रार्थना करावी लागेल.
 
भाकीत : नेदरलँड्सला आणखी काही सनसनाटी विजय मिळवावे लागतील आणि तरीही अन्य संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.
 
बांगलादेश
सध्याचे पॉईंट्स – 2 (जास्तीत जास्त 8 पॉइंट्स मिळण्याची शक्यता)
 
बांगलादेशला उपांत्य फेरी गाठण्यासाठी उर्वरित तीन सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागतील. त्यानंतरही त्यांना अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.
 
भाकीत : नेदरलँड्सविरुद्ध पराभवानंतर बांगलादेशच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
 
इंग्लंड
सध्याचे पॉईंट्स – 2 (जास्तीत जास्त 8 पॉइंट्स मिळण्याची शक्यता)
 
गतविजेत्या इंग्लंडला उपांत्य फेरी गाठण्यासाठी उर्वरित तीन सामने जिंकण्याबरोबरच नेट रन रेटमध्ये खूप मोठी सुधारणा करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अन्य सर्व टीम्सच्या निकालांवर त्यांचं आव्हान अवलंबून राहील.
 
भाकीत : एखादा खूप मोठा चमत्कारच इंग्लंडला उपांत्य फेरीत पोहचवू शकतो.
 
नेट रनरेट कसा मोजतात?
रनरेट म्हणजे एखाद्या टीमनं त्यांच्या अख्ख्या डावात प्रत्येक ओव्हरमागे किती रन्स काढल्या याची सरासरी. उदाहरणार्थ, एखाद्या टीमनं 50 ओव्हर्समध्ये 300 रन्स काढल्या, तर त्यांचा रन रेट होतो 6.
 
तर नेट रन रेट काढताना एखाद्या टीमच्या रनरेटमधून त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा रनरेट वजा केला जातो. त्यामुळे विजयी ठरलेल्या टीमचा रनरेट ‘धन’संख्येत तर पराभूत टीमचा रनरेट ‘ऋण’संख्येत येतो.
 
स्पर्धेतला नेट रनरेट मोजताना, एखाद्या टीमनं त्या स्पर्धेत खेळलेल्या ओव्हर्सचा रनरेट आणि त्यांच्याविरोधात प्रतिस्पर्ध्यांनी प्रत्येक ओव्हरमागे केलेल्या रन्स विचारात घेतल्या जातात.
 
एखादी टीमचे सर्व फलंदाज ठरलेल्या 50 ओव्हर्स पूर्ण करण्याआधीच बाद झाले, तर त्यांनी केलेल्या रन्सना निर्धारीत 50 षटकांनी भागून रन रेट काढला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिग बॉस 17 : सुशांत सिंहसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेनं विकी जैनला म्हटलेलं...