Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीसमर्थांची आत्मलक्षी आर्तता

सौ. कमल जोशी

श्रीसमर्थांची आत्मलक्षी आर्तता
PR
श्री समर्थांनी बालवयातच 'ह्याच देही ह्याच डोळा' ईश्वराची प्राप्ती करून घेण्याचा निश्चय केला होता. म्हणून त्यांनी देवाची करुणा भाकली. देव म्हणजे काय?

विश्वनिर्माण करणार्‍या शक्तीला देव असे म्हणतात. अखंड उसळणाऱ्या परमानंदातून विश्व निर्माण झाले. त्या विश्वातील प्रत्येक वस्तूत आनंद आत्मरूपाने वास करतो. त्या आनंदावर अज्ञानाचे आवरण आल्यामुळे मानव आनंदरूपी आत्म्याला मुकतो. तो दु:ख भोगतो. जेव्हा तया दु:खाची जाणीव होते तेव्हा आनंदरूपी आत्म्याची आठवण येते. आठवर येते तेव्हा त्या अवस्थेला मुमुक्षत्व असे म्हणतात.

श्री समर्थांनी ह्या मुमुक्षत्व अवस्थेत देवाला आळविले. त्यांनी बालवयात घराचा त्याग केला. सर्व दृष्टीने अज्ञात अशा टाकळीला ते आलेत. त्या वेळेस त्यांना जननिंदा आणि उपेक्षा सोसावी लागली. त्या वेळेस त्यांच्या मुखातून निघालेले सहजोद्गार म्हणजे करुणापर अभंग, करुणाम्हणजे आत्मलक्षी आर्तता. ह्या करुणापार अभंगात साधकाच्या साधनेची प्रथम अवस्था लक्षात येते. ते देवाला आळवतात. म्हणतात- 'आम्ही अपराधी अपराधी। आम्हा नाही दृढ बुद्धी' समर्थांना दृढबुद्धी नाही असे वाटते म्हणजे काय? देवा मी तुझ्यातून निघालेला तुझ्यात अंश आहे. हेच मी या मायेमुळे विसरलो आहे. मी ब्रह्म आहे ही माझी जाणीव मला राहत नाही. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी प्रथम आपले स्वस्वरूपच विसरतो. समर्थांसारख्या साक्षात्कारी संतांना त्याची जाणीव होते. सामान्याला त्याची जाणीवही होत नाही. म्हणूनच प्राणी अपराध करीत सुटतो. देह म्हणजे 'मी' असे समजून विकारांच्या मागे लागतो. समर्थ म्हणतात, ''देवा तू पतीतपावन आहेस तेव्हा 'पतीत पावना जानकी जीवना। वेगी माझ्या मना पालटावे । मी कसा आहे? तर 'आळस आवडे सर्व काळ। किंवा 'मुखे बोले ज्ञान पोटीअभिमान'। केवळ हे मी-पणाच्या संदेहानेच होते. तेव्हा देवा वेगीं माझ्या मना पालटावे।

देवा, मी तुझी कीर्ती ऐकली, तू कसा आहेस? दीनाचा दयाळू, अनाथांचा नाथ, म्हणून तू माझे अंत:रंग ओळखू शकतोस. तुझ्याशिवाय मी कोणाला जोजार घालू? दास म्हणे आम्ही दीनहूनी दीन। करावे पाळण दुर्बलांचे देवा।' उतावळे चित्त भैरीची आर्त। पुरवी मनोरथ मायबापा। इथे समर्थांना जीवन पराधीन वाटते. ते म्हणतात हे विश्व काही माझे स्वत:चे घर नाही. देवा मला माझ्या निजधामाला म्हणजे माझ्या माहेरा घेऊन चल. 'तुजविण रामा मज कोण आहे' करुणाष्टकातही ते म्हणतात 'तुजविण रामा मज कंठवेना' त्यांना आपल्या स्वत:च्या घरी जाण्याची किती ओढ लागली होती. हे लक्षात येते आपल्या माहेराचा शोध घेण्याकरिताच श्री समार्थांनी ठोसर
घराण्याचा त्याग केला व टाकळीला जाऊन भगवंताची उपासना केली. त्यावेळेची त्यांच्या मनाची अवस्था ह्या करुणापार अभंगात दिसून येते. रामाच्या भेटीची आस त्यांना लागली आहे. ते म्हणतात रात्र माझी माय कई भेटईल। वोरसें देईल आलिंगन। ह्या जगातील दु:ख समर्थांना सहन होत नव्हते. ते दु:ख देवाला सांगण्याकरता त्यांनी आत्मलक्षी आर्ततेने देवाला आळविले आहे.

जय जय रघुवीर समर्थ।

Share this Story:

Follow Webdunia marathi