Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आधी प्रपंच करावा नेटका

सौ. कमल जोशी

आधी प्रपंच करावा नेटका
ग्रंथा नामे दासबोध। गुरू शिष्याच्या संवाद।
येथे बोलिला विशद। भक्तिमार्ग।।

श्री दासबोधाच्या सुरुवातीलाच समर्थांनी दासबोधाचा विषय 'भक्तिमार्ग' आहे असे सांगितले. दासबोध हा जीवनग्रंथ आहे. त्यात प्रपंचातून परमार्थाकडे भक्तिमार्गाने कसे जावे याचे सुंदर वर्णन आहे. परमार्थाकडे वाटचाल करताना प्रपंच हा त्या मार्गातील धोंडा आहे असा पूर्वीचा समज होता. समर्थही त्याला अपवाद नव्हते. समर्थांनी मानवी जीवनाचा आणि परमार्थाचा समन्वय साधला आणि प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही असे ठामपणे सांगितले म्हणूनच ते म्हणतात -

आधी प्रपंच करावा नेटका।
मग घ्यावे परमार्थ विवेका ।।

माणसाची सहजप्रवृत्ती प्रपंच नदीबरोबर वाहण्याची आहे. पण नदीच्या प्रवाहाला स्वत:चा उगम पाहाण्याचे भाग्य नसते. अनेक जन्माच्या सुकृत्याने जेव्हा मानव जन्म प्राप्त होतो तेव्हा त्याला बुद्धी मिळते. त्या बुद्धीच्या साहाय्याने मानवाला प्रपंचनदीचा प्रवाह पाहण्याचे भाग्य प्राप्त होते. म्हणजेच 'मी' कोण? कुठून आलो? ह्या प्रश्नांचा विचार करण्याचे सामर्थ्य त्याचे ठाई येते. संसारात विज्ञानाचा विकास किंवा भौतिक सुधारणा करणे हे जसे मानवाचे कर्तव्य आहे तसेच दृश्य जगतात अडकून न पडता आत्मस्वरूप ओळखणे हेही त्याचे कर्तव्य आहे. ह्या दृश्य प्रंपचाची आसक्ती सोडली पाहिजे. तेव्हा समर्थ म्हणतात -

आता जरी वैराग्य ढाकेना। आणि प्रपंच सुटेना।
तरी प्रपंची असोनी वासना। परमार्थाकडे ओढावी।।

प्रपंच उपाधीमध्ये राहून परमार्थ शोधावा व जीवन सार्थक करून घ्यावे. आत्मज्ञानी लोक संसारात राहून अलिप्तपणे आपले व्यवहार करतात.

प्रंपंचि ते भाग्य । परमार्थी वैराग्य ।
दोन्ही यथायोग्य । दोन्हीकडे ।।

संपूर्ण समर्थवाड्‍.मय विवेकावर आधारित आहे. विवेकाने संसार नेटका करावा न नाना प्रत्याने तो भरभराटीला न्यावा. कन्यपुत्रांचे विवाह करावे आणि प्रपंचातून कर्तव्यमुक्त व्हावे. कर्तव्य पार पाडले की 'लोक म्हणती भला रे भला। इतुकेन इहलोक साधला।' अशा प्रकारे संसारात सर्वत्र वाहवा मिळाली की 'परलोक तोही आणिला पाहिजे मना।' आधी प्रपंच नेटका करून परमार्थ विवेक साधावा. संसरात अलिप्त राहून परमार्थ वाढवावा. प्रपंची जो सावधान। तो परमार्थ करील जाण। माणसाच्या अंगातील प्रामाणिकपणाचा गुण माणसाचा संसार व परमार्थ दोन्हीमध्ये यश प्राप्ती करून देतो. 'प्रपंच मुळीच नासका। विवेके करावा नेटका.'


समर्थांनी प्रपंचाचे दारुण चित्र रेखाटून संसारात सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 'लेकुरें उदंड झालीं। तो ते लक्ष्मी निघोन गेली। बापर्डी भिकेसी लागलीं। खावया अन्न मिळेना।' समर्थांनी त्या काळात दिलेला इशारा पचनी पडण्यास 350 वर्षे लागली. आज मात्र 'आम्ही दोन, आमचे दोन' हे गोंडस 'संसार चित्र' आपण पाहात आहोत. दरिद्री आणि मिळमिळीत संसाराचा समर्थांनी धिक्कार केला आहे. दरिद्री संसार करण्यापेक्षा 'प्रपंची लाथाडावे। आधी विद्यावंत व्हावे। उदंडचि मिळवावे। मग सुखी व्हावे।' ' आधी कष्ट मग सुख' हा समर्थांचा बोध आहे. प्रथम कष्ट करावे, लोकांना सुख द्यावे व मग स्वत: सुखाचा उपभोग घ्यावा. सुखाच्या संसाराकरिता कोणत्या गुणांचा त्याग करावा, कोणत्या गुणांचा अंगीकार करावा ह्या सार्‍याचा तपशील दासबोधात पाहायला मिळतो.

प्रापंचिकाला समाजात राहावे लागते. तेव्हा त्याने समाजाचाही विचार करणे आवश्यक आहे. त्याला समाजऋणही फेडावे लागते. त्याकरिता उत्तम गुणांचा अभ्यास करावा. हे उत्तमगुण स्वार्थाकरिता वापरू नयेत. लोककल्याणार्थ वापरावे. लोकांच्या सुखदु:खाकडे लक्ष देऊन लोकसंग्रह करावा. लोकांना हरिभक्तीमध्ये रमवावे. लोकजागृतीकरिता प्रबोधशक्तीचा वापर करावा, ह्या सर्वांची शिकवण देताना समर्थ म्हणतात -

शहाणे करावे जन । पतित करावे पावन ।
सृष्टिमध्ये भगवद्‍भजन । वाढवावे।
जितुके कांही आपणासी ठावे । तितुके हळुहळु शिकवावे।
शहाणे करूनी सोडावे । बहुत जन।।

शारीरिक रूप आपल्या हातचे नसते ते बदलता येत नाही, पण शरीरापेक्षा अंतरंग निर्मळ असणे जरूर आहे. आंतरिक गुणांचा विकास प्रयत्नाने होऊ शकतो. ''उंच वस्त्र नीच ल्याला। आणि समर्थ उघडाचि बैसला। परि तो आहे परीक्षीला । परीक्षवंती।'' अशाप्रकारे तनें मने झिजावें। तेणे भले म्हणोन घ्यावे। हे प्रापंचिकाचे गुह्य आहे. परमार्थतही ते लागू पडते. ' येह लोक परलोक पाहाणे। सावधपणे राहाणे। हे विवेकाने साधते. जयाचे ऐहिक धड नाही। त्याचे परत्र पुससी कोई। हा विचार भागवत धर्मात सांगितला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 'इहिक तरी न नशे' आणि मोक्षु तो उरलाचि असे।' नरदेहाची चांगली बाजू भागवत धर्माने लक्षांत घेतली व देहाच्या साहाय्याने प्रपंचाबरोबर परमार्थाची शिकवण दिली. समर्थ ह्या विचाराला सहमत आहेत. प्रथम समर्थही प्रपंचाविषयी उदास होते. प्रपंच नाशिवंत आहे म्हणून त्याचा त्याग करावा असे विचार समर्थांचे होते. नंतर त्यांचे विचार बदलले. जन्म-मृत्यू हे देहाचे दोष आहेत. पण जोपर्यंत देहाला राबविता येते तोपर्यंत त्याचेकडून विचाराचे व ज्ञानप्राप्तीचे कार्य करून घेतल्यास जन्म-मृत्यूचे भय राहात नाही.

अविनाशी आत्मसुख प्राप्त करून घेण्यास देहासारखे दुसरे साधन नाही. म्हणून समर्थ म्हणतात ''नाना सुकृतांचे फळ। तो हा नरदेहचि केवळ.''

अशा नरदेहाकडून अनेक गोष्टी साध्य होतात. श्रवण, मनन, विद्याभ्यास, कर्म, उपासना, ज्ञान आणि परमात्मप्राप्ती हे सारे देहानेच मिळते. म्हणून 'देहेविण निरर्थक सकल काही।' ईश्वराचे वास्तव्य सर्वत्र आहे. आत्म्याच्या रूपाने तो सर्व देहांत भरून आहे. म्हणून कोणाला दुखवू नये. श्रीसमर्थ म्हणतात ''नारायण असे विश्व। त्याची पूजा करीत जावी। या कारणे तोषवावी। कोणी तरी काया।'' ईश्वराच्या सर्व व्यापतेची आठवण ठेवून देहाकडून प्रपंच करावा नेटका आणि पाहावे परमार्थ विवेका. जोपर्यंत देह धडधाकट आहे तोपर्यंत क्षणही वाया जाऊ देऊ नये. सतत श्रवण-मनन केल्याने आपला संसार पवित्र होतो. 'फुला संगे, मातीस वास लागे'' ह्या नियमाने एकाचा गुण स्वत:चाच उद्धार करतो.

संसारात राहून संसारातील मन काढून टाकणे, मनाला हरीभक्तीचे वळण लावणे म्हणजे मनोजय होय. हा मनोजय मोक्ष प्राप्त करून देतो. ईश्वर दाखवितो. संसारावर, चराचर सृष्टीवर सत्ता गाजवितो, कारण मनोजय हाच तर खरा परमेश्वर होय. काम, क्रोध, लोभ, मत्सरा आणि दंभ हे विकार पचविण्याची सवय संसारात राहूनच माणसाला जडवून घेता येते. जो कोणी ह्या विकारांवर विजय मिळवितो तोच खरा साधू किंवा संत होय. संसारात राहूनच नरदेहाचा भरपूर उपयोग करता येतो. देह पंचभूतांचा आहे. ह्या देहाच्या मतदीने आत्मसुखाचा शोध घेता येतो. 'ऐसा जोसावध। त्यास कैचा असेल खेद। विवेक सुटला संबंध। देहबुद्धिचा।' प्रपंच आणि परमार्थ विवेकाने पाहाणे हेच यशस्वी जीवनाचे खरे मर्म होय. जीवनाचे हे मर्म ओळखून जो जीवन जगतो तोच त्रैलोक्याचा स्वामी होतो. ''देव ऋषी मुनी योगी। नाना तपस्वी वीतरागी'' हे सर्व गृहस्थाश्रमात निर्माण झाले आहेत. त्या सर्वांनी संसारात राहूनच आत्मोन्नती करून घेतली आहे. समर्थांनी प्रत्यक्ष संसार केला नाही पण प्रपंचाचा सूक्ष्य अभ्यास केला. लोकांच्या सुखाचा आणि उन्नतीचा तो एक मार्ग आहे हे समर्थांनाही पटले होते म्हणूनच तर समर्थ म्हणतात की 'प्रपंच करावा नेटका' संसारात राहून परमार्थ साधा. प्रपंच करण्याकरिता ज्या गुणांची आवश्यकता आहे. त्या सर्व गुणांची आवश्यकता परमार्थालाही आहे. म्हणूनच ''प्रपंच आणि परमार्थ। जाणता तोचि समर्थ' असे समर्थ विचार दासबोधात नमूद केले आहे.

जयजय रघुवीर समर्थ।

Share this Story:

Follow Webdunia marathi