Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महंते महंत करावे!

सौ. कमल जोशी

महंते महंत करावे!
श्रीमसर्थ म्हणतत - 'न्याय बुडाला बुडाला। जाहली शिरजोरी। पैक्या कारणे कारणे । होती मारामारी।' ह्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 'प्राणी मात्र झाले दुःखी। पाहाता कोणी नाही सुखी।'      
आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा लाभ होऊन बरीच वर्षे झालीत. सर्वत्र मोठ्या थाटामाटाने सुवर्णोत्सव साजरे झालेत. ह्या वर्षात एक पिढी तयार झाली. हे स्वातंत्र्य मिळवून देण्याकरीता असंख्य स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केले आहे. त्यांच्या आत्मसमर्पणावर प्रसन्न होऊन काळपुरुषाने भारताला स्वातंत्र्यदेवतेच्या स्वाधीन केले. ह्या स्वातंत्र्यसूर्याच्या प्रकाशात कितीतरी पुढार्‍यांनी आणि स्वातंत्र्यवीरांनी भारताच्या भवितव्याची स्वप्ने पाहिली असतील. स्वातंत्र्यसंपन्न व सामर्थ्यवान देशाचे मनोहर चित्र त्यांनी कल्पनेने रेखाटले असेल. त्यांचे दिवास्वप्न आज साकार झाले आहे का? असा प्रश्न जर कोणी आज विचारला तर मोठ्या दुःखाने व लाजेने मान खाली घालावी लागेल. त्याकरिता काय करावे? सामान्य माणसाला हा प्रश्न पडतो. पण ह्याचे उत्तर आपल्याला समर्थ वाङ्मयात सापडते.

श्रीसमर्थांचा 'दासबोध' हा जीवनग्रंथ आहे. त्यात जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यांनी मांडले आहे. श्रीदासबोधातील अकराव्या दशकात स. १० ओ. २५ मध्ये ते म्हणतात - 'महंतें महंत करावे। युक्तिबुद्घीने भरावे। जाणते करून विखरावे। नाना देशीं। (श्रीराम) त्या आधी २४ व्या ओवीत ते म्हणतात - 'हे प्रचितीचें बोलिलें। आधीं केलें मग सांगिलते।' (श्रीराम) स्वतः अनुभव घेऊन मी हे बोलत आहे. मी आधी केले मग जगाला सांगितले! काय सांगितले? तर महंताने दुसरे महंत तयार करावे. त्यांना युक्तीबुद्घीने शिकवावे, त्यांना ज्ञान-संपन्न करून निरनिराळ्या भागात लोकसंग्रहार्थ द्यावे.

श्रीसमर्थांच्या वेळची सामाजिक परिस्थिती आणि आजची सामाजिक परिस्थिती ह्यात फारसा फरक नाही. नाही म्हणायला त्यावेळेस परकीय सत्ता होती व आज स्वकीय सत्ता आहे. तरीसुद्घा चारशे वर्षांपूर्वीची आणि आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती सारखीच आहे असे म्हटले तर चूक होणार नाही. श्री समर्थ ब्रह्मसाक्षात्कारी संत होते. त्याचबरोबर त्यांनी जीवनाचाही सूक्ष्म अभ्यास केला होता. राजकीय परिस्थितीचाही त्यांनी खूप विचार केला होता. त्याकरिता त्यांनी प्रवास केला. त्यांनी त्या काळचे भारताचे जे चित्र दासबोधात रेखाटले ते अतिशय बोलके आहे. ते म्हणतात -

मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला।
जो जे मतीं सांपडलां। तयास तेंचि थोर। ११.२.२

त्यावेळेस समाजात स्वैराचार माजला होता. बहुजन समाज वासनापूर्तीच्या मागे लागला होता. सारासर विवेक उरलाच नव्हता. मतामतांचा बुजबुजाट झाला होता. ज्याला जे मत आढळले तेच उत्तम आणि थोर वाटू लागले. त्यामुळे नाना मते निर्माण झाली। नाना पाखंडे वाढली। त्यामुळे विचारांचा गलबला झाला. समर्थ म्हणतात - 'ऐसा नासला विचार। कोण पाहातो सारासार। युक्त अयुक्त पाहातो कोण? हिंदूंचा छळ होत होता. अन्न अन्न दशा भोगाची लागत होती. अन्याय सहन करावा लागत होता. श्रीमसर्थ म्हणतत - 'न्याय बुडाला बुडाला। जाहली शिरजोरी। पैक्या कारणे कारणे । होती मारामारी।' ह्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 'प्राणी मात्र झाले दुःखी। पाहाता कोणी नाही सुखी।' ही परिस्थिती पाहून समर्थ माऊलीचे हृदय आक्रंदून उठले. संतांचे ऊर कोमलच असते. ते म्हणतात 'उदंड दुःख लोकांचे। ऐकता ऊर फुटतो।' आजच्याच परिस्थितीचा हा आरसा नाही का? ह्या परिस्थितीत समर्थांना स्वस्थ बसवेना, त्यांनी 'मराठा तितुका मेळविला' हिंदूंची शक्तिशाली संघटना उभी केली. धर्मस्थापनेचे कार्य सुरू केले. मंदिरे बांधली, मठांची स्थापना केली. देशाकरता देवकारण आवश्यक आहे हे समाजाला पटवून दिले. शिवरायाच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या मठांत आणि मंदिरांत हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या कारखान्याचा कच्चा माल तयार होऊ लागला. त्यांनी आपल्या संघटनसूत्रांत म्हटले आहे-

बहुत लोक मिळवावे। एक विचारे भरावे।
कष्ट करूनी घसरावे। म्लेंछावरी। (श्रीराम)

हे सांगताना त्यांना माहीत होते, की हिंदूसमाज कितीही लाचार किंवा दुबळा असला तरी राजावर कधीच तुटून पडणार नाही. राजाच्या विरूद्ध लढणार नाही. कारण राजला देव मानणारी ‍ही हिंदू जनता! तेव्हा ह्या लोकांना समजावणे फार कठीण आहे. अत्यंत हळुवारपणेच त्यांना समजवावे लागेल. म्हणून त्यांनी आपल्या महंतांना सांगितले, ''बाबांनो, ह्या जनतेला समजवा.'' पण कसे? तर

मुलाचे चालीने चालावे। मुलांचे मनोगत बोलावे।
तैसे जनास शिकवावे। हळूहळू। श्रीराम


हे सांगताना त्यांना माहीत होते, की हिंदूसमाज कितीही लाचार किंवा दुबळा असला तरी राजावर कधीच तुटून पडणार नाही. राजाच्या विरूद्ध लढणार नाही. कारण राजला देव मानणारी ‍ही हिंदू जनता! तेव्हा ह्या लोकांना समजावणे फार कठीण आहे. अत्यंत हळुवारपणेच त्यांना समजवावे लागेल. म्हणून त्यांनी आपल्या महंतांना सांगितले, ''बाबांनो, ह्या जनतेला समजवा.'' पण कसे? तर

मुलाचे चालीने चालावे। मुलांचे मनोगत बोलावे।
तैसे जनास शिकवावे। हळूहळू। श्रीरा

अशाप्रकारे हिंदू जनता राजी राखावी आणि नंतर

महंतें महंत करावे। युक्तिबुद्धीने भरावे।
जाणते करून विखरावे। नाना देसी। श्रीराम

अशा प्रकारे दिव्याने दिवा लावावा त्याप्रमाणे आपल्या विचाराने दुसर्‍याचे मन तयार करावे असे ते म्हणतात आणि मग

देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा।
मुलुख बुडवावा की बडवावा। स्वराज्या कारणे

स्वराज्य मिळवायचे असेल किंवा टिकवायचे असेल तर देशाकरिता देवकारण करावे. देवाला स्मरावे. आपल्या कार्यात जर कोणी बाधा आणू लागेल तर त्याला हाणून पाडावे. कारण देशद्रोही लोक फार असतात म्हणून समर्थ म्हणतात-

देशद्रोही तितुके कुत्ते । मारोन घालावे परते।
देवदास पावती फत्ते। यदर्थी संशयो नाही

अशा देशद्रोही लोकांना चांगली शिक्षा झाली पाहिजे. स्वराज्य हवे असेल तर धर्माचे रक्षण करावे म्हणून -

धर्माकरता मरावे। मरोनी अवघ्यासी मारावे।
मारता मारता घ्यावे। राज्य आपुले

श्री समर्थांनी आपल्या महंतांना असा सल्ला लिदा. त्यांनी विस्कळित आणि विकलांग झालेला समाज प्रथम संघटित केला. समाजात ओज, अभिमान आणि अस्मिता जागी केली. नवचैतन्य भरले आणि त्यांनी आपल्या साधनकाळात प्रेत उठविण्याचे चे महान कार्य केले त्याहीपेक्षा राष्ट्राला जिवंत करण्याचे महान कार्य त्यांनी केले. हे करण्याकरिता माणसाला चळवळ केलीच पाहिजे. क्रांती घडविलीच पाहिजे म्हणून समर्थ एका सूत्रात सांगतात -

सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।

ह्या सूत्रात समर्थांनी दोन संदेश दिले आहेत. एक चळवळ व दुसरे भगवंताचे अधिष्ठान . प्रथम आपण भगवंतांचे अ‍ि धष्ठान म्हणजे काय हे पाहू. भगवंताच्या अधिष्ठानाचा विचार करता, समर्थांच्या तत्त्वज्ञानाचा मागोवा घेणे आवश्यक आहे. श्री समर्थ अद्वैतवादी होते. त्यांच्या मते, मूळ परमात्म्याची दोन रूपे आहेत. एक निर्गुण दुसरे सगुण. निर्गुण रूप सद्रुप आहे ते आहे एवढेच आपण सांगू शकतो. सगुण रूप हे सर्व शक्तीचे, सर्व मूल्यांचे व सर्व सद्गुणांचे मूलधार आहे. म्हणून ते अनादि, अनंत सर्वशक्तिमान, सर्वगुण संपन्न व संपूर्ण आहे. साधुसंतांना त्याचा 'सत्चिदानंदा'च्या रूपाने अनुभव येतो. म्हणून भगवंताचे रूप 'सत्चिदानंद' आहे असे म्हणतात. ह्याच सत्चिदानंदाची उपासना करण्याकरता ज्ञान, भक्ती आणि कर्म ह्यांची सांगड घालावी असे श्रीसमर्थ म्हणतात. ज्ञान, भक्ती आणि कर्म ह्यांच्या सामर्थ्याचा ‍आविष्कार म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान. त्याकरता भगवंताची आराधना आवश्यक आहे.

ती कशी करायची? भक्तीसुद्धा दोन प्रकारची आहे, एक सगुण दुसरी निर्गुण. कोणत्याही साधुसंतांनी सगुण भक्तीचा उच्छेद करून निर्गुण भक्तीचे प्रतिपादन केलेले आही. समर्थ म्हणतात - 'सगुणाचेनि आधारे। निर्गुण पाविजे निर्धारे' माऊली म्हणते 'निर्गुणाचे भेटी आलो। सगुणाचे संगे।' श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात - 'गाईच्या वासराला गाईचे दूध प्यायचे असेल तर त्याला गाईच्या आचळालाच तोंड लावावे लागेल, इकडे तिकडे लावून चलात नाही? त्याप्रमाणे निर्गुणाचा अनुभव घ्यायचा असेल तर सगुणातूनच घ्यावा लागतो. सामान्य माणूस सगुण भक्तीच करतो पण आंधळेपणाने करतो, ती डोळसपणे करणेच आवश्यक आहे. सगुणात आपल्या आरध्यदेवतेची पूजा करायची असते. ती आर्तभावाने करावी, भक्तीत भावाला महत्त्व आहे. भाव शुद्ध हवा.' समर्थांनी केवळ सगुण भक्ती सांगितली आणि ते चुप बसलेत असे नाही तर त्यांनी सगुण भक्तीकरता, भगवंतांच्या विविध विग्रहापैकी श्रीरामचे दैवत समाजापुढे ठेवले. त्यांनी श्रीरामाचे दैवत जाणीवपूर्वक निवडले. कारण राम मर्यादा पुरुषोत्तम होता, कुशल राज्यकर्ता होता, दैवी गुणसंपन्न होता. तो अलौकिक पुत्र होता, अलौकिक शिष्य होता अलौकिक बंधू होता, अलौकिक पती होता, अलौकिक मित्र होता आणि अलौकिक शत्रूही होता. अशा अलौकिक रामाचा आदर्श समर्थांनी लोकांपुढे ठेवला. उद्देश हा की त्यातील एक एक गुण, एकेका व्यक्तीने जरी उचलला तरी त्याची प्रचंड शक्ती समाजात निर्माण होईल. त्या प्रचंड शक्तीने समाजाचे सामर्थ्य वाढेल. म्हणून त्यांनी श्रीरामाची उपासना सांगितली. श्रीरामाचे दैवत समाजापुढे ठेवले. श्रीगुणांच्या सामर्थ्याची शक्ती म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान!

भगवंताच्या अधिष्ठानाचा विचार झाला. आता चळवळ म्हणजे काय ते पाहू. श्रीमसर्थांचा चळवळीचा रोख 'प्रपंच करावा नेटका' ह्याकडेच आहे. नेटक्या प्रपंचाचे मर्म काय? तर तो करता करता फिका होतो. फिका होत होत तो परमार्थात विरून जातो. प्रपंच म्हणजे काय? 1. पाच अंत:करण, 2. पाच प्राण, 3. पाच इंद्रिये, 4. पाच कर्मेंद्रिये व 5. पांच विषय. थोडक्यात परमार्थी पाहिजे पंचीकरण' परमार्थात लागणार्‍या पंचीकरणाचा पाया प्रपंचातून सुरू केला पाहिजे, त्याकरता विवेक लागतो. म्हणून समर्थ वाङ्‍मयात विवेकाला फार महत्त्व आहे. हे सर्व गुण महंतांचे अंगी असावेत असा समर्थांचा आग्रह होता. सर्व गुणांचा रक्षकगुण समर्थांनी त्यांच्या त्रिसूत्रात सांगितला आहे. तो म्हणजे सावधपण! ते रामरायाला म्हणतात 'सावधपण मज दे रे राम'। त्याचप्रमाणे ते म्हणतात 'सावध साक्षेपी आणि दक्ष । तयासी तत्काळची मोक्ष।' त्याचप्रमाणे ते म्हणतात 'सावध साक्षेपी आणि दक्ष। तयासी तत्काळची मोक्ष।' भक्ती, ज्ञान आणि कर्म हे तर मूळ गुण आहेतच पण ह्यांनी ज्ञानाच्या दोन शाखा सांगितल्या आहेत. एक वैराग्य आणि दुसरी क्रियाशीतला! देवाची भक्ती म्हणजे केवळ त्याचे स्मरण नव्हे, ते स्मरण करून कार्य करणे आवश्यक आहे. त्याकरता प्रयत्नाची जोड हवी. प्रयत्नाला तर समर्थांनी देव मानले आहे. 'यत्न तो देव जाणावा' असे ते म्हणतात. 'आधि कष्ट मग फळ । कष्टची नाही ते निर्फळ।' जीवनात कर्माला फार महत्त्व आह अशा प्रकारचे प्रशिक्षण देऊन श्रीसमर्थांनी महंत निर्माण केले. हे सर्व शिक्षण त्यांनी आपल्या आचरणातून महंताला दिले. 'आधि केले मग सांगिलते' हा त्यांचा बाणा. स्वत: केल्यानंतर जे आपण लोकांना सांगतो त्या सांगण्याला ईश्वरी सामर्थ्य चढते असे त्यांचे मत. अशा प्रकारे समर्थ आयुष्यभर लोककल्याणाच्या चिंतेत डुबून गेले होते. त्यांनी लोकसमुदायाचा हव्यास केला. व्यक्तीच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या कल्याणार्थ कार्य केले. राष्ट्राचा प्रपंच चलविला त्याकरता अकराशे महंतांना प्रशिक्षण दिले. अकराशे मठांवर त्यांची नेमणूक केली. भारतभर आपल्या दिव्यकार्याचा प्रकाश त्यांनी झळाळून टाकला. महंती हे असिधारा व्रत आहे. कठिण आहे पण त्यांनी ते स्वीकारले. तेच व्रत त्यांनी लोकांना दिले. त्याकरता प्रचंड लिखाण केले. प्रबोधन केले. आपले प्रबोधन कार्य पुढे चालू राहावे म्हणून त्यांनी संप्रदायाची स्थापना केली. लोकांना 'धीर धरा, धीर धरा। हडबडु गडबडु नका, असा सल्ला दिला.

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळी कोण आहे।
जयाची लीला वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी।

असा विश्वास दिला, ह्या सर्व नेतृत्वाची आजही समाजाला गरज नाही का? आज समाजाला समर्थासारखा नेता हवा आहे. त्यांनी निर्माण केल्याप्रमाणे मातृभूमीच्या सेवेला हजर होणारी संघटना हवी आहे. प्रशिक्षित महंताप्रमाणे समाजकर्ते हवे आहेत. तेही नि:स्पृह
पैसा, कीर्ती आणि प्रसिद्धी यापासून फटकून राहणारे, नि:स्वार्थी. तेव्हाच भारताच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पाहणारे भारतवीर, ज्यांनी आत्मसमर्पण केले ते प्रसन्न होतील!

जयजय रघुवीर समर्थ।

Share this Story:

Follow Webdunia marathi