भगवंताच्या पूजेच्या षोडशोपचारात आरतीचह अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरती म्हणजे भगवंत आहे हा भाव दृढ करून त्या देवतेत 'रत' होणे, रममाण होणे. आपल्या आराध्य देवतेत रमणे म्हणजे आरती. आरती हा षोडशोपचारातील 12 वा प्रकार. प्रथम देवतेला आवाहन करतात. हे तेजोमय देवाधीदेवा, तू ये व माझ्या पूजेचा स्वीकार कर. अशा प्रकारे देवाला आमंत्रित करून तो आला आहे असे समजून त्याल नाना रत्नांनी युक्त करून असान देतात. नंतर पाद्यपूजन आचमन करून देवाला स्नान घालतात त्यानंतर गंध, पुष्य, धूप, दीप अर्पण करतात. हे सारे सोळा उपचार करून देवाची पूजा करणे म्हणजे शोडषोपचाराने देवाची सेवा करणे होय ह्यातील आरती हा 12 वा उपचार आहे. देवाच्या प्रकाशाला आपल्या आत्मज्योतीने ओवाळणे म्हणजे आरती. श्री समर्थांची आत्मज्योत तर सदासर्वकाळ प्रज्वलित होती. म्हणूनच श्री समर्थांनी गणपती, श्रीराम, मारुती, विष्णु, कृष्ण, पांडुरंग, व्यंकटेश, सांब, खंडोबा, बहिरोबा, तुळजाभवानी, सरस्वती गुरुदत्तात्रेय व विशेष म्हणजे भक्तांची मांदियाळीही आरतीने आळविली आहे. सर्वांच्या आरत्या त्यांनी लिहिल्यात. ह्यातून त्यांच्यात जागृत असलेल्या एका देवतेतील अनेकत्वांची जाणीव होते.
एक आरती करितां भक्तांचे वोळी।
तेणे सहस्त्र आरत्या केल्या वनमाळी।
बाळका पूजितां जेवि जननी तोषली।
रामी रामदासा भावे ओवाळी।।
ह्यातील भाव कोणता? तर देवात विरून जाण्यापेक्षा अणुमात्र द्वैत राखल्याने भक्ताला आनंद होतो, संत तुकोबा नाही का म्हणत? तरीच जन्मा यावे। दास विठ्ठलाचे व्हावे।
मायेचा स्वीकार करून अंतरात्माच गणेशाच्या रूपाने नटतो. तोच षड़गुणैश्वर्य संपन्न भगवान ईश्वर, हाच सर्व शिवगणांचा इंद्रियगणांचा स्वामी गणेश हा गणेश
ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस: श्रिय:।
ज्ञानवैराग्ययोश्चेति षण्णां भगशति स्मृति:।
ब्रह्माचे पाहिले सगुण रूप होय. ते निरनिराळ्या गुणांनी वेगळेपणानी जाणवते आणि आपल्या समजुतीनुसार आपण त्या रूपाला वेगळेपणाने पाहतो. आळवितो त्या रूपातील गुणाचे स्मरण करून त्यात रत होतो, त्यालाच आरती म्हणतात. समर्थांनी देवतेच्या बाह्य नामरूपाला आणि आत्मज्योतीला आर्त होऊन ओवाळले. श्रीकृष्णाच्या आरतीत हे म्हणतात.
हरिहर सुंदर ओघ एक्यासी आले।
प्रेमानंदे बांधे मिळणीं मिळाले।
एशिया संगमी मिसळोनी गेले।
रामदास त्यांची वंदी पाऊले।
परमार्थाचे ध्येच जीवब्रह्म-ऐक्य हे आहे तेच श्री समर्थांच्या सर्वच आरत्यांमध्ये पाहावयास सापडते.
जय जय रघुवीर समर्थ ।