Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान- कारंजे

श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान- कारंजे
MH GOVT
श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेले हे गाव आज लाड कारंजे या नांवाने ओळखले जाते. शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले हे गाव वर्‍हाडांतील अकोला जिल्ह्यात आहे. हे स्थानच श्रीगुरुंचे जन्मस्थान होय, हे प्रथम श्रीवासुदेवानंद सरस्वतींनी प्रकट केले. येथील काळे उपनावाच्या घराण्यांत श्रीगुरूंनी जन्म घेतला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणीं आहेत.

श्रीगुरूंचें जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारें साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्याचे मुनीम श्री. घुडे यांना विकला गेला. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती श्रीब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ श्रीलीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र व. 1, श. 1856 या दिवशी श्रीगुरूंच्या पादुकांची स्थपना केली आणि पूजेअर्चेची शाश्वत व्यवस्थाही केली. श्रीलीलादत्तांच्या निष्ठेने आणि कर्तृत्वानें प्रसिद्धीस आलेले हे स्थान आज हजारों दत्तोपासकांच्या नित्य-नैमित्तिक गर्दीने गाजते-जागते बनलें आहे.

या स्थानाचें प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्रीकरंजमाहात्म्य' नांवाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचें नाव वशिष्ठ ऋषीचे शिष्य करंजमुनी यांच्याशी निगडित आहे. कारंजे येथें जैनांचे हस्तलिखित ग्रंथांचें मोठें भांडार आहे.

(संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहासमधून साभार)

Share this Story:

Follow Webdunia marathi