Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दत्तोपासनेचे प्राचीन स्थान- गिरनार

दत्तोपासनेचे प्राचीन स्थान- गिरनार
ND
सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतिप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणीं समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे.

गिरनारवर जैन मंदिर, एका पीराचा दर्गा, गोरखनाथ मंदिर, शिवमंदिर, दोन देवीचीं मंदिरें व दत्तमंदिर अशी मंदिरे आहेत. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरु गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायर्‍या आहेत. दत्तस्थानापर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायर्‍यांची चढ-उतार करावी लागते.

दत्तोपासनेच्या इतिहासांत गिरनारचा महिमा विशेष आहे. त्या तपोभूमीत दत्त दर्शनाचा घ्यास घेऊन तप आचरणारे अनेक ज्ञाताज्ञात महात्मे होऊन गेले. निरंजन रघुनाथ, किनाराम अघोरील नारायणमहाराज जालवणकर इत्यादी दत्तोपासकांना गिरनारवरच दत्तसाक्षात्कार झाला आहे. अनंतसुत विठ्ठलाने 'दत्तप्रबोधां' त गिरनारचें माहात्म्य असें वर्णिलेलें आहे :

एक शृंगावरी गोरक्षनाथ । दुसरे शृंगावरी हिंगळजादेवी असत ।
तिसरे शृंगावरी स्वयें अवधूत । विश्रांती घेत हिंडतां ।।
नवनाथ चौर्‍यांशी सिद्ध। येथें वसती गा प्रसिद्ध ।
दत्त अविनाश तूं स्वतां सिद्ध । अद्वय अभेद्य सर्वातीत।
हिंदु आणि मुसलमान । यांसाठीं रूपें दोन ।
दत्त दातार अभिमान । द्वयस्थान शोभविलें।।

(संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहासमधून साभार)

Share this Story:

Follow Webdunia marathi