धेनुमूषक मुखस्पर्शे । अथवा स्पर्शे अधःकेशे । त्यजावे अन्न भरवसे । असेल उच्छिष्ट अन्नाजवळी ॥११॥
एक हाती वाढले अन्न । शिळे असेल शीत जाण । वर्जावे तुम्ही ब्राह्मण । निषिद्ध बोलिले आचार्य ॥१२॥
घृततैलमिश्रित । शिळे अन्न अपवित्र । तळिले असेल सर्वत्र । शिळे नव्हे सर्वथा ॥१३॥
विप्र विकिती गोरस । घृत क्षीर परियेस । घेता घडती महादोष । साक्षात वह्निपक्व जेवू नये ॥१४॥
माषान्नाचे वटक देखा । शिळे न होती कधी ऐका । जैसे लाह्यापीठ देखा । शिळे नव्हे परियेसा ॥१५॥
कंदमूळादि सुरान्न । जवांचे असेल परमान्न । गुडयुक्त असेल अन्न । शिळे नव्हे परियेसा ॥१६॥
ऐशा शिळ्या अन्नासी । दोष नाही परियेसी । विटाळ होता महादोषी । शुचि स्थानी असावे ॥१७॥
भोजन केलिया नंतर । तांबूल घ्यावे परिकर । क्रमुकचूर्ण पर्ण सत्वर । घ्यावे द्यावे ब्राह्मणी ॥१८॥
तिळमिश्रित भक्ष्यासी । जेवु नये रात्रीसी । जेविता होय महादोषी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाते ॥१९॥
क्रमुक एक सुखारोग्य । द्वय देता निश्चळ आरोग्य । त्रीणि द्यावी महा भाग्य । चतुर्थे दुःख होय जाणा ॥२२०॥
पाच क्रमुक देता जरी । आयुष्य प्रज्ञा वाढे भारी । देऊ नये सहा सुपारी । मरण सांगे परियेसा ॥२१॥
पर्ण अग्र मूल न काढी जरी । व्याधि संभवे अवधारी । अग्र भक्षिता पाप भारी । चूर्णपर्णे आयुष्य क्षीण ॥२२॥
पर्णपृष्ठी बुद्धिनाश । द्विपर्ण खाता महादोष । ऐश्वर्याचा होय विनाश । ऋषिसंमत असे जाणा ॥२३॥
पर्णैविण क्रमुक मुखी । घालिता आपण होय असुखी । सप्त जन्म दरिद्री दुःखी । अज्ञानी होय अंतकाळी ॥२४॥
यतीश्वरादिब्रह्मचारी । रजस्वला स्त्री विधवा जरी । तांबूल भक्षिता मांसपरी । रस त्याचा सुरापानसम ॥२५॥
तांबूल भक्षिल्यानंतर । सायंसंध्या करावी विप्रे । सूर्यअर्धमंडळ उतरे । अर्घ्यै द्यावी परियेसा ॥२६॥
बैसोनि द्यावी अर्घ्यै तिन्ही । चारी द्यावी काळ क्रमूनि । गायत्री मंत्र जपूनि । इमंमेवरुण म्हणावा ॥२७॥
गोत्रप्रवर उच्चारोन । मग करावे औपासन । करावे निशि भोजन । क्षीरमिश्रित मुख्य असे ॥२८॥
रात्री करिता परिसिंचना । ऋतंत्वा सत्यं मंत्र म्हणा । येणे विधी करा भोजना । पूर्वी जैसे बोलिले असे ॥२९॥
भोजन झालियानंतर । वेदाभ्यास एक प्रहर । मग जावे शयनावर । येणे विधी आचरावे ॥२३०॥
शयन करावयाचे विधान । सांगेन ऐका विद्वज्जन । पराशर सांगे वचन । तेचि विधान सांगतसे ॥३१॥
खट्वा असावी निर्मळ जाण । वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण । औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण । न करावी खट्वा परियेसा ॥३२॥
निषिद्ध जांबूळ काष्ठाची । वर्जावी प्रेतगजदंताची । भिन्नकाष्ठ त्यजावी साची । बरवी असावी खट्वा देखा ॥३३॥
सुमुहूर्तै विणावी खट्वा देखा । धनिष्ठा भरणी मृगशीर्षी दूषका । वार सांगेन विशेखा । शूभाशुभफळ असे ॥३४॥
आदित्यवारी लाभ देखा । चंद्रवारी महामुखा । भौमवारी पाविजे दुःखा । बुधवारी सांगे महापीडा ॥३५॥
गुरुवारी विणल्यासी । सहा पुत्र होती त्यासी । शुक्रवारी अतिविशेषी । मृत्यु पावे मंदवारी ॥३६॥
स्वगृही शयन पूर्वशिरेंसी । श्वशुरालयी दक्षिणेसी । प्रवासकाळी पश्चिमेसी । शयन करावे परियेसा ॥३७॥
सदा निषिद्ध उत्तर दिशा । वर्जले फळ सांगितली दिशा । विप्रे आचरावा ऐसा । ऋषिमार्ग शुभाचार ॥३८॥
पूर्ण कुंभ ठेऊनि उशी । मंगळ द्रव्य घालावे बहुवशी । रात्रिसूक्त म्हणावे हर्षी । विष्णुस्मरण करावे ॥३९॥
मग स्मरावा अगस्त्यऋषि । माधव मुचुकुंद परियेसी । आस्तिक कपिल महाऋषि । सर्पस्तुति करावी ॥२४०॥
निषिद्ध स्थाने निजावयासी । सांगेन सर्व परियेसी । जीर्ण देवालयी स्मशानासी । एक वृक्षातळी वर्जावे ॥४१॥
चारी बिदी चोहाटेसी । ईश्वरस्थान परियेसी । मातापिता निजले स्थळासी । निजू नये परियेसा ॥४२॥
वर्जावे वारुळाजवळी । आणि तळ्याचे पाळी । नदीतीरी नसता जवळी । घोर स्थळी निजू नये ॥४३॥
वर्जावे शयन धान्यावरी । निजू नये मोडके घरी । वडील खाली निजतील तरी । खट्वा वर्जावी त्यापुढे ॥४४॥
नेसून ओले अथवा नग्न । निजू नये शिर वेष्टून । आकाशाखाली वर्जावे शयन । दीप असता निजू नये ॥४५॥
पूर्वरात्री अपरात्रीसी । निजू नये परियेसी । असू नये स्त्रियेपासी । रजस्वला चतुर्थदिनी ॥४६॥
असावे जानवे उपवीतीसी । दृष्टी न पडावी योनीसी । आयुष्य क्षीण परियेसी । दीप वर्जावा या कारणे ॥४७॥
नीळ वस्त्र नेसले स्त्रियेसी । करिता संग परियेसी । पुत्र उपजे चांडाळेसी । शुभ्र वस्त्र विशेष ॥४८॥
रजस्वला न होता स्त्रियेसी । न करावा संग परियेसी । संग करिता महादोषी । आणिक प्रकार एक असे ॥४९॥
दश वर्षे होता कन्येसी । रजस्वला सर्वत्रांसी । ऐका तुम्ही सर्व ऋषि पराशर सांगतसे ॥२५०॥
ऋतुकाळ असता स्त्रियेसी । गावासी जाता परियेसी । भ्रूणहत्या होय दोषी । प्रख्यात असे परियेसा ॥५१॥
वृद्ध अथवा वांझेसी ।असती पुत्र जिसी । बहु कन्या होती जियेसी । चुकता ऋतुकाळ दोष नाही ॥५२॥
ऋतु देता चतुर्थ दिवसी । पुत्र उपजे अल्पायुषी । कन्या होय पाचवे दिवसी । सहावे दिनी पुत्र परियेसा ॥५३॥
विषम दिवसी कन्या जाण । सम दिवसी पुत्र सगुण । दहा दिवस ऋतुकाळ खूण । चंद्रबळ असावे ॥५४॥
मूळ मघा रेवती दिवसी । संग न करावा परियेसी । कोप नसावा उभयतांसी । संतोषरूपे असावे ॥५५॥
ऋतुकाळी स्त्रीपुरुषांसी । जे जे असेल मानसी । सत्त्वरजतमोगुणेसी । तैसा पिंड उपजे देखा ॥५६॥
ऐसा ब्राह्मणाचा आचार । सांगता झाला पराशर । ऐकोनि समस्त ऋषीश्वर । येणेपरी आचरती ॥५७॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । ऐसा आचार परियेसी । जे आचरती विधींसी । दैन्य कैचे तया घरी ॥५८॥
ते वंद्य होत देवांसी । कामधेनु येईल घरासी । लक्ष्मी राहे अखंडेसी । पुत्रपौत्री नांदती ॥५९॥
होय आपण शतायुषी । न घडती दोष काही त्यासी । तो न भिई कळिकाळासी । ब्रह्मज्ञानी होय जाणा ॥२६०॥
काळमृत्यु चुके देखा । अपमृत्यु घडे कैचा ऐका । ऐसा आचार आहे निका । नित्य रहाटावे येणेपरी ॥६१॥
ऐसे ऐकोनिया वचना । विप्र लागे श्रीगुरुचरणा । झाला उपदेश उद्धारणा । कृपासागर गुरुमूर्ति ॥६२॥
भक्तजन तारावयासी । अवतरलासी ह्रषीकेशी । परिहरिले अंधकारासी । ज्ञानज्योती प्रकाशली ॥६३॥
ऐसे विनवोनि ब्राह्मण । पुनरपि धरिले श्रीगुरुचरण । श्रीगुरुमुर्ति संतोषोन । प्रसन्न झाले तये वेळी ॥६४॥
म्हणती श्रीगुरु तयासी । आचार सांगितला तुज हर्षी । नव जावे आता भिक्षेसी । आचार करूनि सुखी असे ॥६५॥
जे जे इच्छिसी कामना । होईल निरुती सत्य जाणा । कन्या पुत्र नांदती सगुणा । संदेह न धरावा मानसी ॥६६॥
ऐसा वर लाधोनि । विप्र गेला संतोषोनि । होता तैसा आचरोनि । सकळाभीष्टे लाधला ॥६७॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसे परियेसी । ऐकता ज्ञान समस्तांसी । मूढ होय ब्रह्मज्ञानी ॥६८॥
अज्ञानतिमिरअंधकारासी । ज्योतिप्रकाश कथा सुरसी । जे जे इच्छिले मानसी । पाविजे त्वरित अवधारा ॥६९॥
म्हणे सरस्वतीगंगाधरु । श्रीगुरुचरित्र असे सुरतरु । ऐकता होय संतोष फारु । सकळाभीष्टे साधती ॥२७०॥
इति श्रीगुरुचरित्र । नामधारका शिष्य सांगत । आचार जो का समस्त । निरोपिला श्रीगुरुनाथे ॥२७१॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निककर्मनिरूपणं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥३७॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ओवीसंख्या ॥२७१॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु