दिवाळीचा सण जवळ येऊ लागताच लोकांमधील उत्साह, आनंद आणि उल्हास वाढत जातो. सणाचे हे दिवस अगदी मौजमजेत घालवायला सर्वानाच आवडतात. या दिवसांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही वैशिष्टय़पूर्ण गोष्टी करण्याकडे बर्याच जणांचा कल असतो. कुटुंबासोबत घालवलेले आनंदाचे हे क्षण सर्वानाच अविस्मरणीय ठरावेत, असेच वाटत असते.
स्त्रियांच्या उत्साहाला तर पारावारच राहत नाही. घर, अंगण लखलखीत ठेवण्यापासून ते त्याची शोभा वाढविण्यापर्यंत सर्वत्र त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. जितकी काळजी घराच्या सजावटीची तितकीच स्वत: सुंदर दिसण्याची. दररोज बदलत जाणार्या आधुनिक फॅशन तंत्रानुसार सजण्या-सवरण्याच्या पद्धतीतही बरेच बदल झाले आहेत.
साधेपणातील सौंदर्य लोकांना विशेष आकर्षित करते. जास्तीत जास्त सौंदर्यप्रसाधने वापरून भपकेबाज मेकअप करण्याची रीत आता मागे पडली आहे. त्याऐवजी थोडक्या प्रसाधनांचा वापर करत साधेपणाने राहण्यात जास्त समाधान मिळते. हीच विचारसरणी सणावाराच्या दिवशीही प्रत्ययास येते. म्हणूनच दिवाळीची खरेदी करताना स्त्रिया नैसर्गिक साधनांपासून बनवलेल्या वस्तूंनाच जास्त प्राधान्य देतात. स्त्रियांसोबतच लहान मुलांसाठी देखील कपडय़ांचे वेगवेगळे प्रकार बाजारात पाहावास मिळतात. दिवाळीनिमित्त खास कपडे आणि दागिने बनवून घेणे सर्वानाच आवडते.
दिवाळीचा सण खर्या अर्थाने साजरा केला जातो तो रात्रीच्या वेळी. अशावेळी गडद रंगांचे कपडे जास्त उठून दिसतात. यासोबत मोठमोठे इअररिंग्ज आणि मॅचिंग ज्वेलरी वापरल्यास तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल. सुंदर आणि आकर्षक कपडय़ांसोबतच डोळे देखील मेकअप करून सजवा.
अशा वेळी आपला पेहराव देखील खास हवा. सणासाठी तरुणी नेहमी साडी वापरण्याला प्राधान्य देतात. कारण या पेहरावामुळे त्या मोहक आणि भरदार दिसतात. कित्येक तरुणी पारंपरिक चुडीदार आणि फॅशनेबल कुर्ता घालणे पसंत करतात.
तुम्ही देखील अशा प्रकारे नटूनथटून दिवाळी साजरी केलीत तर या सणाचा झगमगाट आणि आनंद आणखीन वाढेल. दिवाळीच्या या आनंदाला तुमच्या उठावदार सौंदर्याची साथ लाभल्यास एका अपूर्व आनंदाची अनुभूती मिळेल. ज्यातून सुख आणि समृद्धी बहरत राहील.