Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकात्मता निर्माण करणारा सण भाऊबीज

bhaubij
, रविवार, 3 नोव्हेंबर 2024 (12:53 IST)
दीपोत्सव.. काल निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी गोवर्धन पूजा झाली. कुटुंबात पतीपत्नीचे नाते दृढ करणारा पाडवा झाला. आज याच दीपोत्सवातील समाजात एकात्मता निर्माण करणारा सण म्हणजे भाऊबीज.                
 
एकात्मतेचा प्रारंभ होतो तो कुटुंबापासून. पतीपत्नीसह घरातील भाऊबहिणींचे नातेही तेवढेच महत्त्वाचे. ताई-दादा या शब्दांतच पवित्र आदर भाव आहे. कोणत्याही मुलीने भाऊ-दादा म्हणून समोरच्याला साद घातली की, समोरचा मदत करणारच हे ठरलेलेच असते. मग ती बहिण कुणाचीही असो.
 
या विशाल जगात भारतीय स्त्री ही कधीच एकटी नसते. लग्नानंतर सासरी जावे लागते पण आईवडीलांच्या पश्चातही माहेरचे दार भावाच्या प्रेमामुळे आजन्म उघडे असते. हे कायम स्वरुपी नात्यांचे बीज रुजविणारा.. फुलविणारा आणि हे नाते आजन्म टिकवणारा हा भाऊबीज सण.

बहिण सख्खी असो वा मानलेली.. वयाने लहान असो  वा मोठी, गरीब असो वा श्रीमंत.. पण बहिण ती बहिणच. या बहिणीचे भावावरचे प्रेम म्हणजे मातृप्रेमाची प्रतिकृतीच. ही बहिण लहान असो वा मोठी, भावाला जन्मभर या मातृप्रेमाची हमीच.

 बहिणीच्या अंतरंगात भावाविषयीच्या मायेचे अदभूत रसायन परमेश्वरानेच भरलेले आहे. पुराण कथातूनही हे बहिण भावाचे प्रेम व्यक्त होते. कृष्णाच्या बोटाला चींधी बांधण्यासाठी किमती शालू फाडायला द्रौपदी मागेपुढे बघत नाही.. अन् बहिणीला संकटातून वाचवायला धावतो तो कृष्णच.
 
भारतीयांच्या मनोमनी रुजलेला हा आदर्श. समाजात वावरतांना या कृष्ण छायेत रहावे ही समस्त बहिणींची इच्छा असते.
 
आज घरोघरी या कृष्णाच्या स्वागताची सरबराई सुरू आहे. आज भाऊ या जगात कुठेही असो तो मनाने बहिणीच्या जवळ असतो. औक्षण स्विकारतो.
 
ज्याप्रमाणे हा चंद्र वसुंधरेच्या पाठीशी आजन्म उभा राहतो तसेच हे बहिण भावाचे नाते. आपल्या शितल छायेने जीवन आनंदी करणारा चंद्र हा जगातील समस्त बहिणींचा भाऊ. आज बहिणी सर्वप्रथम त्याला औक्षण करणार.
यमानेही आपल्या बहिणीला यमुनेला दरवर्षी औक्षण करायला येईल असे वचन दिले होते. आज यमुना स्नानाचे मोठे महत्त्व आहे. यमभयापासून भाऊ सुरक्षित रहावा.. दीर्घायू व्हावा म्हणून बहिणी भावाला आज औक्षण करतात. या बहिणींना भावाकडून काहीच नको असते. भावाचे भले होवो.. भावाचा संसार सुखाचा होवो हीच औक्षण करतानाची भावना असते.

भाऊबीजेला भावाची ओवाळणी झाल्यावरच दिवाळी संपन्न होते. अशी ही कलागुणांचे चीज करणारी.. नात्यांची वीण आजन्म बळकट करणारी, मनोमनी चैतन्य निर्माण करणारी..आनंददायी दिवाळी.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bhaubeej wishes in marathi 2024: 'भाऊबीज'च्या मराठी शुभेच्छा