Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळी स्पेशल : दीपज्योतिर्नमोऽस्तुते

दिवाळी स्पेशल : दीपज्योतिर्नमोऽस्तुते
, शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (15:03 IST)
शुभंकरोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते।।
दीप ज्योती: परब्रम्हा दीपज्योतीजनार्दन:।
दीपो हस्तु में पापं दीपज्योतीर्नमोऽस्तुते।।
 
'हे दीप ज्योती! तू जगाचे कल्याण, आरोग्य व धनसंपदा आणि वाईट विचारांचा सर्वनाश करणारी आहेस. मी तुला नमस्कार करतो! हे दीप ज्योती! तू आमच्यासाठी परब्रह्म, जनार्दन आणि पापे दूर करणारी आहेस. तुला माझा नमस्कार!'
 
अंधार असलेल्या ठिकाणी प्रकाशाचे आगमन होते तेव्हा अंधार दूर होतो. अंधार दूर झाल्यानंतर तेथे मांगल्य, शुभ, आरोग्य व धनसंपदा निवास करते. वाईट विचार करत असलेल्या शत्रुची बुद्धी कुंठीत करण्याचे काम प्रकाश करतो. मनुष्याच्या जीवनात काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह, मद या गोष्टींनी आपले घर पक्के केले आहे. मनुष्याच्या जीवनात प्रकाश असल्यावर ज्ञानरूपी दिवे प्रकटतात आणि ते सर्व संकटाना दूर करतात. मनुष्याचे अज्ञान हे त्याच्या पापाचे मुख्य कारण असून त्याला दूर करण्याचे काम दीपक करतो. आपले जीवन प्रकाशमय करून अंधकारमय अज्ञान दूर करतो. 
 
आजच्या विज्ञान युगात विद्युत शक्तीने प्रकाश निर्माण केला आहे. त्यामुळे एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला दिवा लावून त्याला नमस्कार करणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे वाटते. पुराणकाळात विजेचा अभाव असल्यामुळे दिवा प्रज्वलित करून त्याला स्थिर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जात असे. कारण दिवा विझून गेला तर चालू असलेले कार्य मध्येच बंद पडण्याची भीती लोकांना वाटत असे. परंतु, आज त्या परिस्थितीमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. विज्ञानामुळे मानव भौतिक विकासाच्या शिखरावर जाऊन बसला आहे. म्हणून त्याला दिव्याची प्रशंसा करण्याची गरज वाटत नाही. उजव्या पायाच्या अंगठ्याने बटण दाबल्याबरोबर प्रकाश पडतो मग दिव्याला नमस्कार का म्हणून करायचा? असा विचार मनुष्य करू लागला आहे. परंतु, अशी कल्पना बाळगणे चुकीचे आहे. 
 
आपल्या पूर्वजांनी दीपदर्शनाला प्राधान्य दिलेले आहे, त्यामागे कृतज्ञतेची भावना आहे. विजेच्या या युगात तुपाने भरलेला दिवा लावून त्याला नमस्कार करण्याचीही तेवढीच आवश्यकता आहे. दिवा अंधाराभोवती तेजाचे वलय निर्माण करतो. याउलट विजेच्या अधिक प्रकाशामुळे मनुष्याचे डोळे दिपतात. दिवा मानवाला आपल्या मंद प्रकाशाने आत्मज्योतीचे मार्गदर्शन करतो. त्यामुळे मनुष्य अंतर्मुख बनतो. तर विजेचा प्रकाश बाह्य विश्वाला प्रकाशित करून मानवाला बहिर्मुख बनवून त्याच्या अशांतीचे कारण सांगतो. एक दिवा हजारो दिव्यांना प्रकाशित करू शकतो. एक विजेचा दिवा दुसर्‍या विजेच्या दिव्याला प्रज्वलित करू शकत नाही. म्हणून ‍दिवा आणि त्याच्या ज्योतीचे विशेष महत्त्व आहे.
webdunia
आपण स्वत: प्रकाशित होऊन दुसर्‍यालाही प्रकाश देण्याची प्रेरणा मनुष्‍याने दिव्यापासून घ्यावी. त्याने जगाला अज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी आणि दैवी विचारांचा प्रचारासाठी सदैव प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. अखंड दिव्याप्रमाणे प्रभू कार्यात मग्न राहावे. सूर्यास्तानंतर पडणार्‍या अंधारापासून पृथ्वीला कोणीही वाचवू शकत नाही. सूर्याची जागाही कोणीच घेऊ शकत नाही. सूर्याप्रमाणे नेहमी जळत राहून सर्वांना प्रकाश देण्याचे काम कोणीच करू शकणार नाही.
 
अंधार दूर करणार्‍या दोन रूपयाच्या पणतीच्या दिव्याला मी का नमस्कार करू नये? जो दिवा मला अंधारात धडकण्यापासून वाचवतो, जीवनाचा रस्ता दाखवितो, त्याला मी नमस्कार करू नये? तो लहानसा दिवाही मला प्रेरणा देतो.त्याचे मूल्य दोन रूपये असले तरीही हिम्मत आणि प्रकाश देण्याची प्रेरणा त्याच्याजवळ आहे. मला प्रेरणा देणार्‍या या दिव्याला मी जर नमस्कार केला नाही तर माझ्यासारखा कृतघ्न दुसरा कोणीच नसेल? म्हणूनच उपनिषदात ऋषींनी देवांची प्रार्थना करताना म्हटले आहे की,
'असतो मा सत् गमय। तमसो मा ज्योतीर्गमय।
मृत्योर्माऽमृतं गमय।।'
 
- पूज्य पांडूरगशास्त्री आठवले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनत्रयोदशीची कहाणी