25 ऑक्टोबर संध्याकाळी 04 वाजून 18 मिनिटापर्यंत अमावस्या तिथी राहील नंतर पाडवा सुरु होईल. पाडवा 26 ऑक्टोबर दुपारी 2 वाजून 42 मिनिटापर्यंत राहील. यंदा सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसर्या दिवशी 25 ऑक्टोबर 2022 रोजी आहे ज्यामुळे उदया तिथी अर्थात 26 ऑक्टोबर रोजी पाडवा साजरा केला जाईल. पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो. या मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानतात.
2022 मध्ये गोवर्धन पूजा शुभ मुहूर्त | Govardhan puja date muhurat 2022:
26 ऑक्टोबर 2022 रोजी गोवर्थन पूजा शुभ मुहूर्त या प्रकारे आहे-
- गोवर्धन पूजा सकाळी 06 वाजून 28 मिनिटांपासून ते 08 वाजून 43 मिनिटापर्यंत करता येईल.
- विजय मुहूर्त : दुपारी 02 वाजून 18 मिनिटांपासून ते 03 वाजून 04 मिनिटापर्यंत राहील.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. हा दिवस अन्नकूट उत्सव म्हणूनही ओळखला जातो. या दिवसाला महाराष्ट्रात आणि इतर अनेक भागात पाडवा म्हणतात. या दिवसाला द्यूतक्रीडा दिन देखील म्हणतात. दिवाळी या मालिकेतील हा चौथा सण आहे.
हा सण का साजरा करतात -
भगवान श्रीकृष्णाच्या अवतारानंतर द्वापर युगापासून अन्नकूट/गोवर्धन पूजा सुरू झाली. जेव्हा कृष्णाने ब्रजच्या लोकांना मुसळधार पावसापासून वाचवण्यासाठी 7 दिवस गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलले आणि ब्रजच्या लोकांवर पाण्याचा एक थेंबही पडू दिला नाही, त्यांच्या छायेत सर्व गोप-गोपिका आनंदाने राहत असताना ब्रह्माजींनी इंद्राला सांगितले की श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला. त्यांच्याशी वैर घेणे योग्य नाही.
या दिवसाला बलिप्रतिपदा असे देखील म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले! बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले.
या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात. शेतकरी लोक सकाळीच शेतात जाऊन मडक्यात कणकेचा पेटलेला दिवा नेऊन शेताच्या बांधावर जाऊन मडके पुरून देतात आणि बळी राजाची पूजा करतात.
या दिवशी सकाळी माहेरच्या आणि सासरच्या पुरुषांना तेल लावण्याची पद्धत आहे. या दिवशी घरोघरी वडीलधाऱ्यांना आणि नवऱ्याला पाटावर बसवून त्यांच्या भोवती रांगोळी काढून औक्षण करतात. आपल्या वैवाहिक संसार उज्ज्वलं व्हावा आणि दोघांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सतत वाढत राहो या साठी पत्नी पतीचे औक्षण करते. नवरा देखील बायकोला ओवाळणी देतो.
या दिवशी सोनं खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी नव विवाहित जोडप्यानंकडे पहिली दिवाळी म्हणून मुलीच्या माहेरी दिवाळसण करतात आणि जावयाचा मान म्हणून त्याला आहेर देण्यात येतो.
व्यापारी वर्ग या दिवशी आर्थिक वर्षाची सुरुवात करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या काढल्या जातात. नवीन वह्यांची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा करतात.
या दिवशी विक्रमी संवत सुरू होतं. या दिवसाला द्यूत प्रतिपदा देखील म्हणतात त्या मागील कारण असे की एका पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकराला द्यूत खेळात हरवले होते. 'इडा-पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' अशी विनवणी बळीराजाकडे केली जाते.