Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री महालक्ष्मी माहात्म्य

श्री महालक्ष्मी माहात्म्य
, मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (15:32 IST)
॥ श्री महालक्ष्मी माहात्म्य ॥

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥ नमस्त् गरुडारुढे कोलासुर भयंकरि । कुमारि वैष्णवि ब्राह्मि महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥
 
प्रथम वंदितो श्रीगजाननाशी । जो नाशी विघ्नराशी । सद्भावे त्याच्या चरणांशी । कृपा भाकितो । ग्रंथ सिद्ध्यर्थ ॥१॥ कार्यारंभी गणेशाचे पूजन स्मरण । विघ्नांचे हो‌ई हरण । आणि कार्यसिद्धी जाण । होत असे निश्चये ॥२॥ माझिये अंतरी वसावे । सर्वकाळ वास्तव्य करावे । मज वाकशून्यास वदवावे । कृपाकटाक्षे ॥३॥ आता नमन माझे श्रीशारदेशी । जी सर्व विद्यांची स्वामिनी । ब्रह्मादिकांची जननी । प्रणवरूपिणी जगन्माता ॥४॥ व्यास वाल्मिक तुकाराम । ज्ञानेश्वर भगवंताचे अवतर । ज्यांचे अवतार कार्य थोर । त्यांसि नमितो अत्यादरे ॥५॥ स्वामी समर्थ दत्तावतार । भक्तकार्यार्थ झाला भूवर । त्यांचे स्मरण करता वरचेवर । भक्तोद्धार होतसे ॥६॥ माझे साष्टांग नमन त्यांचे चरणी । कृपा करोनी चालावी लेखणी । ऐशी करितो विनवणी । लक्ष्मी माहात्म्य वर्णावया ॥७॥ आता महात्म्य वर्णावयास । शरण तिच्या चरणास । वंदितो स्फूर्ति देण्यास । माहात्म्य गावे म्हणून ॥८॥ जय जय जगज्जननी । तू भवभयहरिणी । भक्तांसी संकट तारिणी । तुज वंदितो मनोभावे ॥९॥ अनेक अवतार धरून । तू केलेस भक्त पालन । आणि दुष्टांचे संहरण । म्हणून सुखनिधान आम्हासी ॥१०॥ तू सकळ जगाची माता । चराचरावर तुझी सत्ता । भक्तांवरी माया सर्वथा । आम्हालागी प्रसन्न हो ॥११॥ तू अनंत । तुझी नामे अनंत । त्यातून आठवून काही एक । प्रार्थना तुजसी करतसे ॥१२॥ लक्ष्मी लज्जे महाविद्ये । श्रद्धे पुष्टि स्वधे ध्रुवे । महारात्री महामाये । नारायणि नमोस्तुते ॥१३॥ मेधे सरस्वती वरे । भूति बाभ्रवि तामसी । नियते त्वं प्रसीदेशे । नारायणि नमोस्तुते ॥१४॥ पूर्वी मार्कण्डेय मुनींनी । शिष्यांस जी कथन केली । सुतांनी शौनकास कथिली । तीच अनुवादिली कथा येथं ॥१५॥ महालक्ष्मीचे महात्म्य । पुण्यफलद प्दमपुराणात वर्णन । केले आहे आवर्जुन । सारांश त्याचा हा असे ॥१६॥ पूर्वी द्वापारयुगा माझारी । पवित्र सौराष्ट्र भूमिवरी । जे कथा घडली अवनीवरी । तीच आता श्रवण करी ॥१७॥ त्या सौराष्ट्र राज्यावरी । राजा भद्रश्रवा राज्य करी । शूर वीर कीर्तिमंत । समुद्र स्वामी तो होता ॥१८॥ त्यासी वेदांचे ज्ञान होते । प्रजाहितात लक्ष होते । संत ब्राह्मण संतोषते । केले त्याने ॥१९॥ त्याची पत्नी सुरतचंद्रिका । लाखात सुलक्षणी हो का । अष्टपुत्रा पतिव्रता वैभवी नांदतसे ॥२०॥ राणीस होते पुत्र सात । वरी कन्या एक । शामबाला नामक । अत्यंत भाविक ती ॥२१॥ एकदा काय झाले । महालक्ष्मीच्या मनात आले । तिच्या राज्यात जावे । आठवण आहे का पहावे । पूर्वजन्मीची ॥२२॥ राजवैभव वाढवावे । प्रजेत ते पोहोचवावे । म्हणून राजास द्यावे । कृपादान ॥२३॥ गरिबावर करितां कृपा । तोच खा‌ईल एकटा । इतरेजनांस वाटा । कैसा मिळे ॥२४॥ म्हणोनि लक्ष्मीने काय केले । आपले रूप पालटले । म्हातारीचे रूप घेतले । चाले काठी टेकित ॥२५॥ दीनपणे राजद्वारी पोचली । तोच एक दासी आली । कोणास भेटाण्या आली । विचारी तीस ॥२६॥ काय तुझे नाव आहे । कोण तुझे पती असती । कोण्या गावे करिसी वसती । काम काय आहे ॥२७॥ वृद्धा म्हणे माझे नाव कमला । भुवनेश पति मजला । द्वारकेत असते वस्तीला । राणीस भेटणे असे ॥२८॥ तुझ्या राणीस ओळखते । लक्ष्मीकृपे वैभव भोगते । काय लक्ष्मीस स्मरते । पहाण्यास आले मी ॥२९॥ राणी रमली महालात । मैत्रिणीच्या समवेत । आपुल्या निरोपे ये‌ईल क्रोधात । जाय परतोनी म्हणे दासी ॥३०॥ वृद्धा म्हणे दासीला । ऐक तिच्या पूर्ववृत्ता । दारिद्र्य जावोनी ऐश्वर्यमत्ता । कैशी आली ॥३१॥ राणीला गर्व झाला दिसे । श्रीमंतीने लाविते पिसे । गरिबा भेटण्या न दिसे । एकही पळ ॥३२॥ धुंदी चढली वैभवाची । उतरली पाहिजे साची । हीच प्रजाकल्याणाची । वाट दिसे ॥३३॥ पूर्वजन्मीचे विसरली । लक्ष्मीने कृपा केली । दारिद्रयातून वर आली । राजवैभव भोगिते ॥३४॥ पूर्वजन्मीची वैश्य पत्नी । दारिद्रये गेली गांजोनी । पतिपत्नी नित्य भांडोनी । संसारसुखा आंचवले ॥३५॥ पती मारहाण करी । नित्य संतापे भाष्य करी । पत्नी मनी विचार करी । धन जवळ करावे ॥३६॥ घर सोडोनि जाण । गेली वनात निघोन । तेथे कष्ट दशा दारूण । वणवण फिरता भोगितसे ॥३७॥ कंटक रूतती पायात । अश्रू दाटती नेत्रात । घास नसे पोटात । ब्रह्मांड आठवे ॥३८॥ बसली एका दगडावर । रूदन करी अपार । नेत्री संतत धार । अश्रूंची होती ॥३९॥ लक्ष्मी देवीस करूणा आली । तेथ्ं ती प्रगटली । धीर दे‌ऊन वदली । चिंता न करी बाळे ॥४०॥ तिला लक्ष्मीव्रत सांगितले । सुखसंपत्ति आशिर्वाद दिले । कळवळ्याने वाचविले । तिजला ॥४१॥ मार्गशीर्ष महिन्यात । प्रति गुरुवारी अखंडित । निष्ठा ठे‌ऊन मनात । व्रत अन् उद्यापन केले तिने ॥४२॥ त्या व्रताच्या प्रभावाने । लक्ष्मी मातेच्या कृपेने । वैश्यगृह विपुल धनाने । गेले भरून ॥४३॥ दैन्य दु:खे पळाली । भांडणे ती संपली । सुखे उभी राहिली । पुढे हात जोडोनी ॥४४॥ मग लक्ष्मीचे व्रताचरण । अखंड केले धारण । वर्षानुवर्षे पालन । मनोभावे करीतसे ॥४५॥ आयुर्मर्यादा संपता । ते गेले लक्ष्मीलोका । जितुके वर्षे आचरिले व्रता । तितकी सहस्त्र वर्षे सुखे । राहिले तेथे ॥४६॥ त्या पुण्ये पुढले जन्मी । वैश्यपत्नी झाली राणि । वैभव विलास भोगुनि । अहंकार प्रवर्तला ॥४७॥ उतली आणि मातली । घेतला वसा विसरली । आठवण देण्यास तिला भली । येणे हे जाहले असे ॥४८॥ असो कर्म गती गहन । तिला व्रताचे विस्मरण । बोलण्यास तिला नाही क्षण । मी जाते ॥४९॥ दासी म्हणे आजीबा‌ई थांबा । मलाही लक्ष्मीव्रत सांगा । मी ही करेन मले सांगा । दारिद्रय दु:खे पिडले मी ॥५०॥ उतशील आणि मातशील । घेतला वसा टाकशील । धनसंपदा येता वर्तशील । अहंकारे ॥५१॥ तसे होणार नाही । शब्दाला जागेन मी । श्रद्धापूर्वक नमते मी । माते कथी आता ॥५२॥ लक्ष्मी वृद्धारूप नारी । वचने प्रसन्न दासीवरी । व्रताची महती सारी । कथन करी संक्षेपे ॥५३॥ मासा माजी मार्गशीर्ष । त्यास असे ईश्वरी अंश । सुयोग्य लक्ष्मी व्रतास । श्रेष्ठ सर्वि मानला ॥५४॥ मार्गशीर्षी प्रथम गुरूवार । आरंभ करावे व्रत हे थोर । प्रत्येक गुरूवारी महिनाभर । नेमे पूजा करावी ॥५५॥ पहाटे करावे स्नान । निर्मळ असावे तनमन । जागा गोमये सारवून । पाट वा चौरंग मांडावा ॥५६॥ फरशी असता नको सारवण । घ्यावे फडक्याने पुसुन । मग चौरंग ठे‌ऊन । त्यावरी धान्यराशी ठेवावी ॥५७॥ गहू अथवा तांदूळ । रास असावे वर्तुळ । त्यावर ठेवावा कलश । आत जल असावे ॥५८॥ त्यामाजी पैसा सुपारी । दूर्वा तैशा त्यात घाली । हळदकुंकू बोटे ओढावी । आठदिशांनी कलशावर ॥५९॥ पंचवृक्षाचे डहाळे घ्यावे । सर्व बाजूंनी कलशात रचावे । रंगवल्लीने करावे । सुशोभन ॥६०॥ चौरंगावरी देठाची दोन पाने । त्यावर सुपारी नि नाणे । शेजारी मूठभर तांदूळदाणे । त्यावर सुपारी गणपती । स्थापावा ॥६१॥ देवीचे चित्र साजिरे । कलशाजवळ ठेवावे । तैसेच लक्ष्मीयंत्रहि असावे । त्याजवळी ॥६२॥ धातूची मूर्ति असल्यावर । चित्राची नाही जरुर । पूजेस आता सत्वर । लागावे ।६३॥ सम‌ई नीरांजन उदबत्ती । प्रज्वलित करावी । वडील माणसे नमस्कारावी । पूजेपूर्वी ॥६४॥ प्रथम आचमन करावे । विड्यावर पाणी सोडावे । श्रीगणपतीस पूजावे । निर्विघ्नतेसाठी ॥६५॥ मग फुले तुळशी घे‌ऊन । त्याने जलसिंचन करून । लक्ष्मीदेवी पूजावी ॥६६॥ मूर्ति असल्या पूजेत । स्नान घालावे ताम्हनात । मग पुसोनि त्वरित । चौरंगावरी ठेवावी ॥६७॥ हळदकुंकु आदि वाहून । सुगंधी पुष्पे अर्पून । धूप नीरांजन ओवाळून । फलनैवेद्य दाखवावा ॥६८॥ सकर्पूर तांबूल अर्पावा । मनींच्या इच्छा पुरविण्यास । देवीस विनवावे ॥६९॥ बसोनि पाटावर सत्वर । व्रतकथा वाचावी सुम्दर । त्यावर माहात्म्य पोथी मनोहर । दूध फळे नैवेद्य अर्पावा ॥७०॥ मग वाचावे महालक्ष्म्यष्टक । सर्वसिद्धीदायक । पूर्णपणे वरदायक । भक्तांसी ॥७१॥ मग नीरांजन उजळावे । उदबत्ती कर्पूर लावावे । आरतीसी करावे । मनोभावे ॥७२॥ आरती झाल्यावरी । मनोभावे प्रार्थना करावी । माते मान्य करी । यथाशक्ति पूजा ही ॥७३॥ काही चूक असल्यास । माते घे‌ई पदरात । निष्ठाभाव आहे मनात । हे जाणुनि ॥७४॥ आमुचे घरी अखंड रहावे । दारिद्रय दु:ख निवारावे । संततिसंपत्तीने भरावे । घर आमुचे ॥७५॥ सुखशांती असावी । तुझे नामी मती रहावी । चित्ती कृतज्ञता रहावी । सदोदित ॥७६॥ मनोभावे करिता प्रार्थना । आ‌ईस येते करूणा । ठेवावे मनी वचना । आणि प्रार्थावे ॥७७॥ दिवसा उपवास करावा । दुग्ध फलाहार घ्यावा । रात्री मिष्टान्न नैवेद्य दाखवावा । आरतीचे वेळी ॥७८॥ गोग्रास नैवेद्य काढावा । तो गा‌ईस घालावा । आपुल्या सो‌ईने ॥७९॥ सुवासिनी ब्राह्मण । उद्यापनी भोजन । दक्षिणा दून । संतुष्ट करावे ॥८०॥ त्यानंतर आपण । घे‌ऊन प्रसादाचे पान । करावे प्रसाद भोजन । नामपूर्वक ॥८१॥ दुसरे दिवशी स्नानोत्तर । घे‌ऊनि दूध साखर । नैवेद्यानंतर । पूजा विसर्जन करावि ॥८२॥ कलशातील जल सर्व । तुळशीत करावे विसर्जन । पाच पर्णफांद्या । घे‌ऊन निघावे ॥८३॥ त्या ठेवाव्या पाच ठिकाणी । आणि यावे पूजास्थानी । हळदकुंकू अक्षता दोनदा वाहुनी । नमस्कार करावा ॥८४॥ मार्गशीर्षातील सर्व गुरूवारी । पूजन ऐसे करी । शेवटच्या गुरूवारी । उद्यापन करावे ॥८५॥ उद्यापनाचे दिवशी । पूजा आरती करोनी । सात कुमारी अथवा सुवासिनी । ह्यांसी पाचारावे ॥८६॥ त्यांना आसन द्यावे । हळदकुंकू लावावे । महालक्ष्मी म्हणोनि नमस्कारावे । एकेक फळ नि हे माहात्म्य दे‌ऊनि ॥८७॥ वृद्धा एवढे बोलून । वेगे निघाली जाण । दासी म्हणे आ‌ई एक क्षण थांब । निरोप देते राणीस ॥८८॥ निरोप मिळता राणीला । क्रोध अनिवार झाला । ये‌ऊन म्हणे तू कोण थेरडे । आली कशास इकडे ॥८९॥ वृद्धा म्हणे माजलीस । उन्मत्तपणे वागलीस । पूर्वस्थिती आठव ॥९०॥ आजच्या शुभदिनी । करुन एका स्त्रीची हेटाळणी । विपत्ति घेतलीस ओढवूनि । भोगावे लागेल ॥९१॥ शापवाणी ऐकून । राणी गेली संतापून । आणि धक़्काबुक़्की करून । वृद्धेस तिने अवमानिले ॥९२॥ महालक्ष्मी वेगे निघाली जाण । शामबाला तो समोरून । येती झाली जाण । दैव भले म्हणून ॥९३॥ ती गेली होती उद्यानात । मैत्रिणींच्या समवेत । त्याच वेळी राजमहालात । घटना ही घडली असे ॥९४॥ शामबालेने वंदन करून । आपली दिली ओळख करून । मग वृद्धेने घडले वर्तमान । कथन केले तिजसी ॥९५॥ शामबाला दु:खी झाली । तिने विनये क्षमा याचिली । कारूण्ये माय हेलावली । म्हणे तुझे कल्याण हो‌ईल ॥९६॥ सुखसंपन्नता यावी । वैभव कीर्ति लाभावी । विनयशील संतती व्हावी । म्हणून त्वां व्रत हे करावे ॥९७॥ महालक्ष्मीने तिजसी । सांगितले ह्या व्रतासी । आणि म्हटले सुखशांति । कुटुंबी नांदेल ॥९८॥ संकल्प सिद्धिस जातील । समृद्धी भाग्य येतील । पद्मावतीच्या कृपेने जाण । संपूर्ण कल्याण हो‌ईल ॥९९॥ मार्गशीर्ष महिन्यातला । तोच होता गुरूवार पहिला । शामबाला करून उपवासाला । पूजन करीत त्या दिनी ॥१००॥ शेवटचे गुरूवारी । ती उद्यापन करी । प्रसन्न झाली महालक्ष्मी । तिजवरी ॥१०१॥ इच्छा मनातली सारी । पूर्ण झाली लवकरी । लक्ष्मी प्रभावास नाही सरी । हेच खरे ॥१०२॥ कीर्तिमंत राजा सिद्धेश्वर । त्याचा सुपूत्र मालाधर । शामबालेस अनुरूप वर । विवाह मंगल जाहला ॥१०३॥ लक्ष्मीचा वरदहस्त लाभला । राजैश्वर्यात शामबाला । परि न सोडले नम्रतेला । भाग्यवान खरीच ती ॥१०४॥ महालक्ष्मीच्या अवकृपेने । भद्रश्रवाचे राज्य गेले । ऐश्वर्य सारे नष्ट झाले । दारिद्री झाले गोघेही ॥१०५॥ आधी दशा । मग अवदशी । नंतर अन्नानदशा । झाली त्यांचि ॥१०६॥ सुरतचंद्रिका मग पतीस । म्हणे जा‌ऊन भेटावे शामबालेस । सांगावे आपुला दुर्दशेस । समजावूनी ॥१०७॥ जाव‌ई आपुला धनवान । राखाया आपुला मान । धनसहाय्य दे‌ईल महान । संकट टळण्या ॥१०८॥ भद्रश्रवा जरी स्वाभिमानी । तरी परिस्थिती जाणॊनी । जावयाचे राज्यालगोनी । प्रयाण करिता जाहला ॥१०९॥ तळ्याकाठीं राजा बसला । तो होता थकलेला । विश्रांतिसाठी टेकला । तो दासी आल्या काही पाणी नेण्यास ॥११०॥ राजाकडे दृष्टी गेली । विनये चौकशी केली । राजाची ओळख पटली । भेटण्यास स्वारी आली । शामबालेस ॥१११॥ दासी गेली लगबगीने । शामबालेस कथन केले । पिताश्रीचे आगमन झाले । आपुल्या राज्यात ॥११२॥ अत्यादरे वडीलांस । शामबालेने राजमहालास । आणून गौरविले । वस्त्रालंकारे ॥११३॥ अल्पकाळ तेथे राहून । आपली व्यथा कथन करून । तिचे वैभव पाहून । राजा म्हणे निघतो आता ॥११४॥ राजा निघता तेथून । मालाधरे दिला भरून । हंडा सुवर्ण मोहरांनी ॥११५॥ संगे दिले नोकर । मग राजा निघाला सत्वर । चंद्रिकेस भेण्या अधिर । वेगे चाले ॥११६॥ पाहता राणिने राजास । हर्ष झाला मनास । हंडा पाहता उल्हास । मनी दाटे ॥११७॥ राजाने भेट कथन करून । हंडा दाविला उघडून । कौतुके पाहे डोकावून । तो आत काळे कोळसे ॥११८॥ राजा राणी भांबावली । काय लिहिले आहे कपाळी । भद्रश्रवा अश्रू ढाळी । दु:ख नावरे दोघांना ॥११९॥ मुलीविषयी अढी मनात । परंतु जाणे तिच्या राज्यात । मदतीचा मिळेल हात । आशा मोठी ॥१२०॥ म्हणून दु:ख आवरून । राणीने केले गमन । आली तिच्या राज्यालागून । लेकीस भेटावया ॥१२१॥ आली नदीतीरास । पाय उचलेना पुढे जाण्यास । मिटुनी आपल्या नेत्रास बसती झाली ॥१२२॥ एका दासीने देखिले । शामबालेस कथन केले । मातेने थकुनि नेत्र मिटले । बैसलीसे नदीतीरी ॥१२३॥ सत्वरि निघाली घे‌ऊनी रथ । वेगे चाले वाटे लांब पथ । सत्वर उतरून तेथ । वंदिले मातेस ॥१२४॥ बसवून रथात । आणीली राजमहालात । स्नान घालून त्वरित । वस्त्रालंकार दिधले ॥१२५॥ तो होता प्रथम गुरूवार । मार्गशीर्ष महिना खरोखर । मनोभावे मनोहर । पूजा करी शामबाला ॥१२६॥ शामबाला मस्तक लववी । अति‌आदरे वंदन करीं । पूर्वजन्मस्थिती जागी करी । सुरतचंद्रिकेस ॥१२७॥ माथा लववी परोपरी । लक्ष्मीव्रत पुन्हा आचरी । राहून लेकीचे घरी । करी उद्यापन ॥१२८॥ लक्ष्मी होता पुन्हा प्रसन्न । स्थिती पालटे परिपूर्ण । आनंदे फुलले मन । लक्ष्मीकृपेने ॥१२९॥ मालाधरास बुद्धि झाली । भद्रश्रवास बोलवावयास भली । तो येताच मसलत शिजली । जिंकणे राज्य पुनरपि ॥१३०॥ मग झाले भीषण । शत्रुसंगे रणकंदन । मग भद्रश्रवास सिंहासन । पुनश्च प्राप्त होय ॥१३१॥ राजधर्म पाळुनि नेटका । भद्रश्रवा जपे प्रजाहिता । प्रजा गौरवे राजसत्ता । दुवा देती ॥१३२॥ राजाचे पुत्रहि सात । परागंदा होते अज्ञात । ते सर्व परत राज्यात । आले लक्ष्मीकृपे ॥१३३॥ शामबालाही भेटण्या आली । राजाराणी मनी धाली । आनंदे ॥१३४॥ परी राणीच्या मनात । किल्मिष एक सलत । हिने संकट कालात । कोळसे दिले ॥१३५॥ म्हणुन राणी नच संभाषी । तरी शामबाला संतोषी । राहिली अल्पमुक़्कामे ॥१३६॥ मग निघता घरी । तोच हंडा मिठाने भरी । घे‌ऊन गेली घरी । आपुल्या समवेत ॥१३७॥ घरी पोहोचल्यावर । प्रश्न करी मालाधर । माहेर-भेट आणली काय् । दाखवी ॥१३८॥ राजसा थांबा थोदे तरी । मग दाखविते सत्वरी । राज्याचे सार खरोखरी । आणले आहे ॥१३९॥ मग सांगे आचाऱ्यास । स्वयंपाक अळणी करण्यास । भोजनी घेता घासास । अन्न बेचव वाटले ॥१४०॥ शामबालेने तरा करून । सर्वा मीठ वाढले पानातून । चवदार लागले सगळे अन्न । म्हणे राज्याचे सार हे ॥१४१॥ मग पतीस म्हणे प्रेमे । मीठ सौराष्ट्राचे सोने । राज्य पित्याचे सागरासम । विशाल ॥१४२॥ अन्नास चव आणि मीठ । सेवक मिठाशी जागती नित्य । मीठ खाता इमान । जागते प्राणसंकटी ॥१४३॥ राजा डोलवी मान । म्हणे ही इमानाची खूण् । मनी जतन करी जाण । सुनिश्चये ॥१४४॥ राजाराणीस लक्ष्मी पावली । दु:स्थिती दुरावली । वैभवे पुन्हा सरसावली । व्रते लक्ष्मीच्या ॥१४५॥ म्हणू लक्ष्मीदेवीस । सतत स्मरावे रात्रंदिवस । दे‌ईल तीच सौख्यास । भावबळे पूजिता ॥१४६॥ हे माहात्म्य जणू कल्पतरू । इच्छित लाभेल वरू । उतरेल पलपारू । व्रत मनोभावे आचरिता ॥१४७॥ देशपांडे नामे कुळात । माधवसुत रंगनाथ । लक्ष्मी माहात्म्य वदत । लोकमङ्गल व्हावया ॥१४८॥ शके अठराशे अठरात । फाल्गुन वद्य पक्षात । लक्ष्मीमाहात्म्य समाप्तीस । रंगपंचमीस आले असे ॥१४९॥ नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥१५०॥ इति श्री महालक्ष्मीव्रत माहात्म्य कथा संपूर्णम् ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Navratrotsav : मांढरदेवची श्री काळेश्वरी काळूबाई नवसाला पावणारी देवी