Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेवटी माणुसकीच धावली मदतीला..

शेवटी माणुसकीच धावली मदतीला..
राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पोलिस यंत्रणा हतबल झाल्याचे स्पष्ट झालेच शिवाय सरकारी यंत्रणाही कुचकामी ठरली. पण, या बॉम्बस्फोटात शिकार झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला पुन्हा एकदा माणुसकीच धावून आली.

बॉम्बस्फोट होताच एकच धावपळ आणि जखमींच्या आक्रोशाने वातावरण भयभीत झाले. त्यावेळी शासकीय मदत, रुग्णवाहिकांची वाट न बघता नागरिकच मदतीला धावले. जखमींना उचलून स्वतः:च्या गाडीतून रूग्णालयात दाखल करण्यात येत होते. दूरध्वनीवरून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. रूग्णालयात रक्ताचा तुटवडा झाल्यावर रक्तदातेही धावून आले.

माणुसकी हरवत चालल्याची तक्रार नेहमीच केली जाते. पण, देशात, राज्यात कोणतेही संकट अोढावल्यावर माणसाच्या मदतीला माणुसकीच धावून येते. याचा पुनश्च प्रत्यय दिल्लीत दिसून आला. माणुसकीचा झरा अजूनही अोला आहे हेच या घटनेतून सिद्ध झाले.

दहशतवाद्यांच्या अशा कृत्यामुळे दिल्लीतील नागरिक घाबरणार नाहीत. ते रोजच्याप्रमाणेच आपल्या कामावर परततील. दिल्लीतली ग्रेटर कैलास मार्केटमधील दुकानदार निशिकांत शर्मा म्हणाले, आम्ही असल्या भेकड कृत्यांना घाबरणार नाही, हे दहशतवाद्यांनी लक्षात ठेवावे. आम्ही सर्व देशवासी एकजूट होऊन काम करू. मी तर रोजच्याप्रमाणेच दुकानात जाईन.

करोल बागेतली सरस्वती मार्केटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची अधिक तीव्रता होती. स्फोटानंतर याठिकाणी रक्ताचा सडा पडलेला होता. मोठा स्फोट होऊनही आज येथील जनजीवन सुरळीत होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi