Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

सौ. भाग्यश्री कुलकर्णी

ज्या घरात बाईच्या आरोग्याची, तिच्या मनाचीही काळजी घेतली जाते त्या घराचा उत्कर्षच होताना दिसतो कारण शारीरिक मानसिक आरोग्य व्यवस्थित असणारी स्त्री अधिक कार्यक्षमतेने घराचे व्यवस्थापन करू शकते आणि पर्यायाने चांगला समाज घडवायला मदत करते.      
अनादी काळापासून माया आणि ब्रह्म यांच्यात मायेची जागा ही काहीशी महत्त्वाची मानली गेलेली आहे. शिव व शक्ती यातही शिवाने शक्तीला बरोबरीचे रूप देऊन तो स्वत: अर्धनारीनटेश्वर बनला. माणसाच्या विकसित अवस्थेपूर्वीही स्त्रिया ह्या त्याच्या बरोबरीने काम करत. पूर्वी मातृसत्ताकपद्धती असल्याचाही दाखला मिळतो. हळूहळू माणूस शेती करू लागला तेव्हाही शेतात त्याच्या बरोबरीने स्त्री काम करत होती. मुळात सृजनशील असणार्‍या स्त्रीने आदिमकाळात भित्तिचित्राचे रेखाटण केलेले आहे. मध्य प्रदेशातील भीमबेटका या ठिकाणी सर्वात प्राचीन रेखाचित्रे पाहाव्यास मिळतात ती स्त्रियांनीच रेखाटली असावीत असाही संशोधकांचा दावा आहे.

मुलाच्या जडणघडणीत तर तिचा मोलाचा वाटा आहे. मुलाच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक, वाचिक विकास करण्यात आईची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. ती केवळ घरापुरतीच स्वामिनी नाही तर जिजाऊ सारखी एका हिर्‍याला पैलू पाहणारी 'जोहरी' आहे. अहिल्याबाईंसारखी धर्माधिष्ठित राजकारण चालवणारी कुशल राज्ञी आहे. राणी लक्ष्मीबाईसारखी झुंजार तर आहेत पण पोटच्या मुलासाठी हिरकणी चढणारी धाडसी आईही आहे.

आईला कितीही त्रास होत असला तरी आपल्या मुलाबाळांसाठी ती उठून त्यांना रांधून वाढायचं काम करतेच. तिच्या आजारपण्यात गबाळं झालेलं घर तिचा एक हात फिरताच परत नीटनेटकं दिसू लागतं. ती स्वत:च्या आरोग्यापेक्षा घरधनी, वडिलधारे मूलबाळ यांचीच काळजी जास्त करत असते.मुळातच पुन:निर्मितीची शक्ती निसर्गाने फक्त स्त्रीलाच दिली असल्यामुळे गर्भाचा नऊ महिने भार सोसण्याच, नव्या जीवाला नवीन जग दाखवण्यासाठी स्वत: त्रास घेण्याची जोखीम तीच उठवते. स्वत:पेक्षा बाळाचा विचार ती आधी करते या सर्वांत ती लवकर थकते हे निश्चित.

ज्या घरात बाईच्या आरोग्याची, तिच्या मनाचीही काळजी घेतली जाते त्या घराचा उत्कर्षच होताना दिसतो कारण शारीरिक मानसिक आरोग्य व्यवस्थित असणारी स्त्री अधिक कार्यक्षमतेने घराचे व्यवस्थापन करू शकते आणि पर्यायाने चांगला समाज घडवायला मदत करते.राष्ट्र सेविका समितीची संस्कृत प्रार्थना फार सुंदर आहे ती ऐकताना माझ्या अंगावर रोमांच येतात अन मी एक स्त्री असल्याचा मला अतिशय गर्व वाटतो.

  ज्या घरात स्त्रीचे शोषण होते (मग ते कोणत्याही प्रकाराने असो), ते तर चुकीचेच आहे पण आपल्या स्त्री असण्याचा गैरफायदाही काही स्त्रिया घेताना दिसतात ते बघून वाईट वाटते व अशा मूठभर स्त्रियांमुळे पूर्ण स्त्री वर्गाविषयी चुकीचा ग्रह तयार होऊ शकतो.      
आपला भाऊ, भ्रतार (नवरा), मुलगा या पुरुषांना घडवण्याचे काम करते ती स्त्रीच. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे सक्षमपणे उभी असते ती स्त्री, या सर्व रूपात असणारी स्त्री एका स्त्रीच्या विरोधात जेव्हा उभी राहते तेव्हा मात्र या गोष्टीबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही की एक स्त्रीच मग ती सासू, जाऊ, नणंद शेजारी या रूपात एकमेकींना त्रासदायक कशी होऊ शकते? मुलाला घडवणारी स्त्री पुत्रप्राप्तीसाठी नवसायास का करते किंवा एखादीला मुलगा झाल्यावरच कृतकृत्य झाल्यासारखे का वाटते?

उलट या बाबतीत मला असे वाटते की जर देवाने तुझ्या पदरात मुलीचे दान टाकले आहे तर तू इतर स्त्रियांपेक्षा जास्त योग्य असली पाहिजेस कारण मुलाला घडवून तो तुझ्याच घराचे नाव मोठे करणार पण मुलगी मात्र दुसर्‍या घराचा कारभार ही समर्थपणे चालवणार आहे, तेव्हा योग्य व्यक्ती (स्त्री) घडवण्याची किती मोठी जबाबदारी देवाने तुझ्यावर टाकली आहे. तुला देवाने मुलगी दिली कारण तूच तिला योग्य माणूस बनवू शकतेस याचा विश्वास देवाला आहे. तो तू सार्थ ठरवशीलच. देवाने या चांगल्या कामासाठी तुला निवडले आहे तेव्हा तूच उलट जास्त लायक आहेस स्त्री म्हणून जगायला. याचा अर्थ मुलगा असणारीला मी कमी लेखत नाही पण मुलगी असणारीवर विशेष जबाबदारी आहे.

ज्या घरात स्त्रीचे शोषण होते (मग ते कोणत्याही प्रकाराने असो), ते तर चुकीचेच आहे पण आपल्या स्त्री असण्याचा गैरफायदाही काही स्त्रिया घेताना दिसतात ते बघून वाईट वाटते व अशा मूठभर स्त्रियांमुळे पूर्ण स्त्री वर्गाविषयी चुकीचा ग्रह तयार होऊ शकतो. त्यामुळे नवर्‍याला मुठीत ठेवणे, त्याला आपल्या तालावर नाचवणे, त्याला त्याच्या घरच्यांपासून तोडणे हे चुकीचे आहे.

त्याच्या पैशावर मजा करताना त्याला फक्त पैशाचे मशीन न समजता तुमचा एक मित्र म्हणून त्याच्याकडे बघाल तर तुमचा संसार फार सुखाचा होईल. दोघांमध्ये तुझं-माझं काय आलं. उलट एकदाच मिळणारा माणसाचा देह आहे तेवढं आयुष्य एकमेकांच्या साहाय्याने प्रेमाने सहवासाने सुंदर जगा योग्य प्रकारे समाजाभिमुख जगा. आपल्याला मिळालेल्या संधीचा संपत्तीचा योग्य उपभोग घेतानाचा वाचितानाही त्यापासून लाभ मिळू द्या. वडीलधाऱ्यांच्या आदराबरोबरच आपुलकीचे शब्द द्या. कर्तव्याला प्रेमाची झालर द्या. गरजूला मदत करा, भुकेल्याला अन्न द्या. समाजकार्य करताना प्रसिद्धीपेक्षा मदत योग्य ठिकाणी, योग्य वेळी कारण महत्त्वच हे लक्षात घ्या आणि बघा तुमचं स्त्रीत्व अजून उजळेल ठळक होईल.

योग्य मार्ग अवलंबा, वाईटाचा प्रतिकार करा, खर्‍याच्या मागे ठामपणे उभे राहा तुमचं हेच व्यक्तित्व पाहून मुलं घडतील त्यांचे मित्र मैत्रिणी, समाज विकसित होईल. आत्मोन्नतीबरोबरच तुमची चित्तशुद्धी होईल अन आजार, आळस तुमच्या जवळही फिरकणार नाहीत. तुम्ही अशाच राहा चिरतरुण आयुष्यभर! याच शुभेच्छा तुम्हा प्रत्येकासाठी अन प्रत्येकासाठी ह्या दिवाळीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi