Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळी फराळ : किती आपला, किती परका? मराठी मुलखात आलेल्या परकीय फराळाची कथा

diwali faral
, मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (00:10 IST)
- रश्मी वारंग
सर्वांसाठी दिवाळीच्या आनंदाची व्याख्या ज्या बाबतीत समान होते ती गोष्ट म्हणजे फराळ. दिवाळीची कितीही तयारी करा, फराळाशिवाय ती अपूर्ण आहे. दिवाळीनिमित्त प्रत्येक भारतीय घरात फराळ तयार होतो.
 
प्रांतागणिक त्यातले पदार्थ बदलत जातात पण फराळाशिवाय दिवाळी नाही. महाराष्ट्रीय फराळाचा विचार करता लाडू, चकली, शेव , करंजी , शंकरपाळी , अनारसे या पदार्थांमुळे दिवाळीची रंगत खऱ्या अर्थाने द्विगुणित होते.
 
पण या मराठी फराळाच्या ताटातले कितीतरी पदार्थ मुळात आपले नाहीत. ते आपल्याकडे आले कुठून आणि इथे इतके रुळले कसे हे पहाणं रंजक ठरेल.
 
फराळाचं प्रयोजन काय?
दिवाळी फराळ ही एक परंपरा मानली तर साहजिकच मनात या परंपरेच्या प्रयोजनाचा प्रश्न निर्माण होतो. दिवाळी आणि फराळ भारताच्या शेतीप्रधानतेला जोडलेले आहेत. शेतीच्या दिवसात कष्ट करून थकलेल्या शेतक-याचा निवांत होण्याचा हा काळ.
 
या काळात गोडधोड खाऊन तो स्वतःच्या शरीराचं कोडकौतुक पुरवू शकतो. या तेलकट तुपकट पदार्थांच्या माध्यमातून येणाऱ्या थंडीसाठी तो शरीरात स्निग्धता साठवून घेत असतो. या प्रयोजनाने दिवाळीचं निमित्त साधून फराळाची परंपरा निर्माण झाली.
 
'भोजनकुतूहल' ते आल्बेरुनी
 
परंपरेचा इतिहासही दीर्घ आहे. अगदी उपनिषद काळापासून वेगवेगळ्या रूपात हा फराळ सिद्ध होतो. ११ व्या शतकातील "भोजनकुतूहल" ग्रंथात दिवाळीच्या फराळाचा उल्लेख येतो. याच काळात भारतभेटीवर आलेला जगप्रवासी आल्बेरुनी दिवाळी उत्सवाचं वर्णन करतो. त्यातही अनेक पदार्थांचा उल्लेख येतो.
 
अशा या दीर्घ परंपरेतून मराठी घराघरात सिद्ध होणाऱ्या फराळाकडे पाहतो, तेव्हा मराठी मुलखात हे पदार्थ नेमके कधीपासून बनवले जाऊ लागले याची उत्सुकता वाढते. आणि याच उत्सुकतेने या पदार्थांचं मूळ शोधायला गेल्यावर हाती येणारी माहिती मात्र आपल्याला आश्चर्यचकित करून जाते.
 
प्रत्येक प्रांत आपल्या खाद्यपरंपरेचा समृद्ध वारसा जपत असतो. काही पदार्थांची नावं उच्चारल्यावर त्या प्रांताचे शिक्कामोर्तब होते. खाखरा म्हटल्यावर गुजरात आठवतो. रसगुल्ल्याचं बंगालशी नातं असतं.
 
मोदक किंवा पुरणपोळी मराठी मातीशी नाळ सांगतात. मात्र मराठी फराळातील पदार्थांचं मूळ शोधताना जाणवतं की आपल्या फराळाच्या थाळीतले अनेक पदार्थ इथले नाहीच .ते अन्य प्रांतातून आपल्याकडे आलेले आहेत. असे मूळचे परप्रांतीय पण आता आपलेच होऊन राहिलेले पदार्थ कोणते हे जाणून घेणं मजेशीर आहे.
 
लड्डूचा अपभ्रंश?
कुठलाही पदार्थ अमुक प्रांतात निर्माण झाला असं प्रत्येकवेळी ठामपणे सांगता येत नसलं तरी काही पदार्थांची मूळ नावं आणि नंतर त्याचं अन्य प्रांतांनी केलेलं अनुकरण ह्यातून काही अंदाज मांडता येतात.
webdunia
आपले मराठी लाडू हे लड्डूच्या अपभ्रंशातून आलेलं नाव आहे. त्यामुळे फराळाच्या थाळीत रवा आणि बेसन अशा वैविध्याने मिरवणारा लाडू अन्य प्रांतातून आपल्याकडे शिरला असावा.
 
प्राचीन काळी या लाडवाना मोदक म्हटलेलं आहे. मोद अर्थात आनंद देणारा तो मोदक. पण मराठी मोदक हा पूर्णतः भिन्न पदार्थ असल्याने आज ज्याला लाडू या नावाने आपण संबोधतो त्याचे मूळ हिंदी लड्डूत आढळते आणि नावाच्या या अपभ्रंशामुळे लाडू अन्य प्रांतातून आपल्याकडे आला या म्हणण्याला बराच वाव मिळतो.
 
लाडूंचा प्रवास : सुश्रुतापासून इराणपर्यंत
प्राचीन काळी साधारण ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात प्रसिद्ध भारतीय शल्यचिकित्सक सुश्रुत शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मध व गूळ यांच्यासह तीळ खाण्यास देत.
 
या मिश्रणाचे प्रमाण निश्चित व्हावे याकरता ते विशिष्ट मात्रेत गोलाकारात वळलेले असत. त्यामुळे ज्याला आपण लाडू म्हणतो तो आकार पदार्थ म्हणून निश्चित होण्यापूर्वी औषधास सोयीस्कर म्हणून वळला जाई.
 
त्यानंतर मग या आकारात अन्य घटक जसे की बेसन, रवा यांचे लाडू वळले जाऊ लागले. पर्शियन आक्रमणानंतर लाडू शाही झाला. त्यात सुकामेवा वाढला. बुंदी ही तर मूळ राजस्थानची त्यामुळे बुंदीचे लाडू देखील तिथून आपल्याकडे आले.
 
मुरुक्कू, चक्रिका, चकुलीते चकली
लाडवाप्रमाणे अन्य प्रांतातून आपल्याकडे आलेला आणि आपलाच वाटावा इतका परिचित झालेला अन्य पदार्थ म्हणजे चकली. चकुली, चकरी, मुरुक्कू या नावाने ओळखली जाणारी ही चकली दक्षिण भारतातून आपल्याकडे आली.
webdunia
उपनिषद काळात चक्रिका अशा पदार्थाचा उल्लेख झालेला दिसतो. तमिळ भाषेत मुरुक्कू म्हणजे वेटोळी. जगभरात जिथे जिथे तामिळ मंडळी पसरली तिथे तिथे चकली आहे.
 
श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया या देशातही तिचं आढळणं तिचं तामिळ कनेक्शन दाखवतं चकलीच्या गोलाकाराने या तामिळ मुरुक्कुचं रूपांतर चकरीत झालं आणि त्याचा मराठी अपभ्रंश चकली असा झाला.
 
शष्कुलीची करंजी होताना...
फराळात मानाचं स्थान जिला प्राप्त झालेलं दिसतं ती करंजी. शुभशकुनाशी तिचं नातं जोडलं गेलं आहे. ही करंजी प्राचीन काळापासून शष्कुली या नावाने परिचित होती.
 
या करंजीचं मूळ उत्तरप्रदेशात दिसून येतं. उत्तरप्रदेश- राजस्थान - गुजरात - महाराष्ट्र असा प्रवास करत ती मराठी घरात आली असावी. प्रत्येक प्रांतात तिचं नाव बदललेलं दिसतं हे आणखी एक विशेष.
 
उत्तरप्रदेशात ती गुजिया असते. छत्तीसगडमध्ये कुसली, बिहारमध्ये पुरुकीया किंवा पेडकीया आणि गुजराथमध्ये घुघरा. जशी मराठी घरात होळीला पुरणाची पोळी तशी उत्तर भारतात होळीच्या सणाला गुजिया हवीच.
 
अनारशाचं बिहारी कनेक्शन
मराठी फराळाच्या थाळीत सध्या अपवादाने आढळणारा पण सुगरणीच्या पाककौशल्याची परीक्षा पाहणारा पदार्थ म्हणजे अनारसा. या पदार्थाच्या मराठीपणाबद्दलदेखील शंका घ्यायला पुरेसा वाव आहे.
webdunia
याचं कारण म्हणजे अनारसे दोनच राज्यात विशेषत्वाने खाल्ले जातात एक महाराष्ट्र आणि दुसरं बिहार. या दोन्ही राज्यांमधलं भौगोलिक अंतर या पदार्थाच्या संदर्भात बुचकळ्यात टाकणारं आहे.
 
महाराष्ट्रात अनारसे हे केवळ दिवाळीच्या दिवसात फराळाच्या ताटापुरतं अस्तित्व दाखवत असले तरी बिहारमध्ये तिथल्या अस्सल बिहारी पदार्थात अनारशांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे अनारशांचे कुळ शोधताना ते बिहारकडे अधिक झुकलेलं दिसतं.
 
फराळी कडबोळं
कडबोळे हा पदार्थ अलिकडे फारसा फराळाच्या थाळीत आढळत नसला तरी त्याचं नाव आपल्याला एक विशेषण म्हणून पुरतं. या पदार्थाची माहिती शोधताना तो मराठी पदार्थ आहे असं सांगितलं जातं. मात्र कडबोळे हे नाव कन्नड कडबूच्या खूप जवळ जाणारे आहे.
 
कडबू या कनार्टकी पदार्थाची पाककृती पूर्णतः भिन्न दिसत असली तरीही कडबूचा डिक्शनरी अर्थ होतो गोंधळ, अडचणीची स्थिती आणि मराठीत आपण हे काय कडबोळं करून ठेवलंय? असा वाक्यप्रयोग त्याच अर्थाने करतो. त्यामुळे कडबोळ्यांचं दायित्व महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकाकडे अधिक असावं.
 
परकीय आक्रमणं आणि स्वाऱ्या
या सगळ्या पदार्थांच्या अस्सल मराठीपणाची खात्री नसली तरी वर्षानुवर्षे ते आपल्या फराळाच्या ताटाची शोभा वाढवत आहेत.
 
परकीय आक्रमणाने यातल्या काही पदार्थांचा आपल्या संस्कृतीत समावेश झालेला दिसतो तर काही वेळा इथले राज्यकर्ते स्वारीच्या निमित्ताने परराज्यात गेल्यावर तिथून येताना आवडलेल्या पदार्थाना आपल्या सोबत घेऊन आलेले दिसतात.
 
आज विविध कारणांनी, माध्यमांनी ज्याप्रमाणे जग जोडलं गेलं आहे, त्याकाळी खचितच तशी परिस्थिती नसणार. परक्या राज्यातून पदार्थ आपल्या राज्यात घेऊन येण्यासाठी, ते पदार्थ इथल्या मातीत रुजण्यासाठी तितका मुबलक काळ जावा लागला असणार.
 
या सगळ्या शक्यता इतक्या धुसर असतानाही हे पदार्थ बाहेरून येऊन या मातीतले झाले यामागे काहीतरी तथ्य आहे. त्या पदार्थांमध्ये ते सत्व आहे.
 
आज या पदार्थाना मराठीच मानावं इतके ते आपल्या फराळाच्या डब्यात आणि आपल्या मनातही रुळले आहेत. फराळ हा केवळ दिवाळीच्या आनंदाचा उपचार नाही. तो खाद्यसंस्कृतीचा ठेवा आहे.
 
हा ठेवा समृद्ध करणारे पदार्थ मग या मातीतले असोत अथवा नसोत या पदार्थानी वर्षानुवर्षे आपल्या दिवाळीच्या आनंदात भर टाकत आपली दिवाळी खमंग आणि खुसखुशीत नक्कीच केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Diwali Special Nashik chivda Recipe : नाशिकचा खमंग चिवडा रेसिपी