चंपाकळी म्हणजे एका विशेष आकाराची गोड खारी शंकरपाळी. ही विशेष प्रकारची शंकरपाळी दिसायला छान असते तसेच बनवायला देखील ही सोपी आहे. लहान मुलांना चंपाकळी खूप आवडते. चंपाकळी ही खारे आणि गोड दोन्ही प्रकाराची करता येते. पाकातली कुरकुरीत चंपाकळी बनवण्यासाठी साहित्य आणि कृती जाणून घ्या
साहित्य -
दीड वाटी बारीक रवा
मीठ
साजूक तूप तळण्यासाठी
पाकासाठी साहित्य -
2 कप साखर
वेलचीपूड
1/4 टीस्पून खाण्याचा केशरी रंग
1/2 टी स्पून लिंबाचा रस
कृती-
सर्व प्रथम रवा एका पात्रात घेऊन त्यात गरम साजूक तुपाचे मोहन व मीठ घालून मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या. नंतर हे पीठ तासभर तसेच झाकून ठेवा.
पीठ चांगले मुरल्यावर त्याचे एक सारखे गोळे बनवून मोठी पातळ पोळी लाटून एका वाटीच्या सहायानी छोट्या गोल पुऱ्या कापून घ्या. मग एक पुरी घेवून त्याच्या मधोमध उभा काप द्या लक्षात ठेवा कडेला पुरी तुटू नये. काप मारल्यावर पुरी गुंडाळून कडेच्या दोनी बाजूला दाबून घ्या. अशा प्रकारे सर्व चंपाकळी बनवून घ्या.नंतर तयार चंपाकळी ओल्या कापडावर झाकून ठेवा, जेणे करून त्या सुकणार नाही.
पाक तयार करण्यासाठी -
सर्वप्रथम एका पातेल्यात साखर घ्या त्यात साखर बुडेल एवढेच पाणी घाला. नंतर त्याला उकळू द्या.साखर वितळली की त्यात लिंबाचा रस , वेलची पूड, आणि केसरी रंग घाला आणि दोन तारी पाक तयार करा.
आता कढईमधे साजूक तूप गरम करून घ्या. एक चंपाकळी घेऊन गरम तुपात सोडून वरून तूप सोडा. जेणे करून ती थोडी उलघडेल व त्याचा छान आकार येईल. मग चंपाकळी तुपात सोडल्यावर गॅस मंद करून छान कुरकुरीत गुलाबी रंग येई पर्यंत तळून घ्या. मग पाकात सोडून हलवा नंतर एका पसरट ताटलीत उपसून ठेवा. चंपाकळी खाण्यासाठी तयार. नंतर थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.