Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा
दसरा हा शब्द दश म्हणजे दहा यावरून आला असावा. त्याचा अर्थ दहावा दिवस असा आहे. नवरात्रात घटाच्या आजूबाजूला पेरलेले नवधान्य उपटून देवीला व इतर देवतांना वाहतात. 

गवळी व इतर काही जातींचे लोक या दिवशी कालियानागावर बसलेल्या कृष्णाची पूजा करतात. त्याला शिलांगणाचा उत्सव असेही म्हटले जाते. शिलांगणाच्या पागोट्यात नवधान्याच्या रोपांचा झेंडा रोवतात. शिलंगण हा सीमोल्लंघन या शब्दाचा अपभ्रंश आहे. या दिवशी शमीची पूजा करण्यात येते. पांडवांनी अज्ञातवासातून बाहेर आल्यानंतर याच दिवशी शमीच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेली वस्त्रे काढली होती. त्यामुळे शमी व शस्त्रे यांची या दिवशी पूजा करण्यात येते. यानंतर शमीची फांदी तोडून तिची पाने, तिळाच्या झाडाची फुले, बाजरीची पाने व आपट्याची पाने गणपतीस अर्पण केली जातात. नंतर ही पाने गावाबाहेर नेऊन लुटली जातात. यालाच सीमोल्लंघन असेही म्हणतात.

श्रीरामाने याच दिवशी लंकाधिपती रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी दक्षिणेस कूच केले. त्याला यशही मिळाले. त्याच्या विजयाबद्दल आनंदोत्सव म्हणूनही हा सण साजरा केला जातो. राजपूत सरदारही याच मुहूर्तावर लढाईवर निघत असत. मराठ्यांच्या स्वार्‍याही याच दिवसांपासून सुरू होत. पेशवे आपल्या आश्रित संस्थानिकास दसर्‍याच्या दिवशी दरबार भरवून मानाचा पोशाख देत. ब्रिटिश अधिकार्‍यांनीही काही काळ ही प्रथा सुरू ठेवली होती.

webdunia
 
ND
दसरा शेतकर्‍यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण नवरात्रात नऊ दिवसात उगवलेली रोपे शेवटच्या दिवशी दसर्‍यास वाहतात. तसेच शेतकरीही शेतात तयार झालेल्या भाताच्या लोंब्या आणून त्याची पूजा करतात. प्रवेशद्वारावरही टांगतात. याशिवाय घरातील विविध भांड्यांना धान्याची कणसे बांधण्याची प्रथा कोकणात आहे. बंगालमध्येही अशाच प्रकारचा एक विधी होतो. तेथे स्त्रिया गवताची पेंढी धान्याच्या कोठारास बांधतात. त्याला बावन्न पोटी असे म्हणतात. म्हणजे हे धान्य बावन्न पट होऊ दे.

त्याचप्रमाणे भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे धान्याला व ते पिकवणार्‍या शेतकर्‍याला मोठा मान आहे. धान्य उदंड प्रमाणात यावे यासाठी ईश्वराला साकडे घालण्यात येत असे. या धान्याच्या रक्षणासाठी पूर्वीच्या काळी राजा व प्रजा झटत असे. कारण धान्य असले तर जगता येईल. अन्यथा नाही. हे त्यांना माहित होते. म्हणून धान्याला सोन्याची उपमा दिली जात असे. वर्षाकाल संपताच राजा प्रजाजनांबरोबर गावाच्या सीमेपर्यंत जाऊन नविन धान्य घरात आणत असे.

(आधार- आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा