Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रसिद्ध म्हैसूरचा दसरा

प्रसिद्ध म्हैसूरचा दसरा

वेबदुनिया

, बुधवार, 5 ऑक्टोबर 2011 (14:20 IST)
WD
दसरा हा कर्नाटकचा नदहब्बा म्हणजे राज्याचा सण आहे. नवरात्रातील दहा दिवसांना दसरा म्हणण्याची येथे प्रथा आहे. या दसऱ्याचा शेवट विजयादशमीच्या दिवशी होतो. याच दिवशी जगभरात प्रसिद्ध असलेली 'जंबू सवारी' म्हणजे हत्तींची मिरवणूक ऐतिहासिक म्हैसूर शहरातून निघते.

अनिष्ट प्रवृत्तींवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठीच विजयादशमीचे प्रयोजन आहे. देवी चामुंडेश्वरीने महिषासूराचा वध केला, तोही याच दिवशी. महिषासूराच्या नावावरूनच म्हैसूर हे नाव पडले. या पौराणिक महत्त्व असलेल्या म्हैसूर शहरात दसरा साजरा करण्याची प्रथाही पारंपरिक आहे. येथील दसरा पाहण्यासाठी लांबून लोक येतात. अगदी परदेशातील लोकही हजेरी लावतात.

येथील म्हैसूर राजवाडा नवरात्राच्या दहाही दिवसात रोषणाईने लखलखत असतो. शहरातच असलेल्या चामुंडी टेकडीवर चामुंडेश्वरीचे मंदिर आहे. वाडियार राजघराण्याच्या प्रतिनिधींकडून म्हणजे राजा-राणीकडून या देवीची विशेष पूजा केली जाते. त्यानंतर उत्सवाला सुरवात होते, असे मानले जाते. त्यानंतर विशेष दरबार भरविला जातो. कृष्णराजा वाडियार यांनी १८०५ पासून हा विशेष दरबार भरविण्याची प्रथा सुरू केली. या दरबारात राजघराण्यातील सदस्य, विशेष निमंत्रित, अधिकारी तसे सामन्यजनही उपस्थित असतात. या राजघराण्याचे सध्याचे वारस श्रीकांतदत्ता नरसिंहराजा वाडीयार यांच्या काळातही ही प्रथा सुरू आहे. एवढंच की राजेशाही संपल्याने हा दरबार खासगी स्वरूपात भरतो.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे माता चामुंडेश्वरीची मिरवणूक. सजवलेल्या हत्तीच्या पाठीवर सोन्याच्या अंबारीत देवीची मूर्ती ठेवण्यात येते. मिरवणुकीला सुरवात होण्यापूर्वी या मुर्तीची राजघराण्यातील जोडप्याकडून पूजा करण्यात येते. या मिरवणूकीचे दृश्य अतिशय प्रेक्षणीय असते. बॅंड निनादत असतो. लोक आनंदात नाचत असतात. हत्ती सजविल्यामुळे अतिशय छान दिसत असतात. त्यांच्याबरोबर घोडे आणि उंटही सजवून मिरवणूकीत चालत असतात. आणि ही मिरवणूक पहायला हजारो लोक रस्त्याच्या कडेला उभे असतात.

म्हैसूरच्या राजवाड्यापासून निघालेली ही मिरवणूक 'बन्नीमंडप' या स्थळापाशी जाऊन थांबते. तेथे शमीचे मोठे झाड आहे. त्याची पूजा केली जाते. याच झाडाच्या ढोलीत पांडवांनी अज्ञातवासात असताना आपली शस्त्रे लपवून ठेवली होती. कोणतीही लढाई सुरू होण्यापूर्वी राजेलोक या झाडाची पूजा करतात. त्यामुळे आपल्याला विजय मिळतो, अशी त्यांची श्रद्धा होती. नवरात्रापासून सुरू झालेला दसर्‍याचा उत्सव विजयादशमीच्या दिवशी रात्री बन्नीमंडपाच्या मैदानावर 'पनजिना काव्यायथ्थू'ने (बॅटरीच्या प्रकाशातील संचलन) संपतो.

दसर्‍याच्या सणाचे आणखी एक आकर्षण म्हणजे म्हैसूर राजवाड्याच्या विरूद्ध दिशेला असलेल्या मैदानावर भरणारी यात्रा होय. दसरा सुरू झाल्यापासून सुरू झालेले ही यात्रा सुरू होते. ती डिसेंबरपर्यंत चालते. या यात्रेत विविध स्टॉल असतात. त्यात कपडे, प्लास्टिक वस्तू, किचनमधील वस्तू, कॉस्मेटिक्स, खाण्यापिण्याचे पदार्थ यांचा समावेश असतो. तेथे लोकांची प्रचंड गर्दी होते.

नवरात्राच्या दहा दिवसांत येथे संगीत व नृत्याचे कार्यक्रम होतात. त्यात जगभरातील बडे बडे कलावंत हजेरी लावतात. याशिवाय येथे होणार्‍या कुस्त्या हाही आकर्षणाचा बिंदू आहे. जगभरातील प्रसिद्ध कुस्तीगीर येथे येत असतात.

म्हैसूरविषयी- हे कर्नाटकातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. बंगळूरपासून ते १३० किलोमीटरवर आहे. ऐतिहासिक म्हैसूर राज्याची म्हैसूर ही राजधानी होती. वाडियार घराण्याने येथे राज्य केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi