मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाने कहर केला असून गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणार्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
संततधारेमुळे घाटातील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्य महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेल्या पावसाने अद्याप उसंत घेतलेली नाही. मुंबईत जोरदार बरसून अख्या मुंबापुरीला वेठीस धरल्यानंतर पावसाने प.महाराष्ट्राकडे मोर्चा वळविला. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यात सुरु असणाºया पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वीजपुरवठा खंडीत झाल्याने हाल होत आहेत. पुण्याला पाणीपुरवठा करणार्या धरणांतील पाणीसाठी झपाट्याने वाढत असून मुळा-मुठा नदीपात्रातही पाणी वाढले आहे. येथील नवीन बोगद्यानजीक एका दुचाकीवर दरड कोसळून दोघे जखमी झाले तर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळ्यानजीक दरड कोसळल्याने दोन दिवस मुंबईकडे जाणारा मार्ग बंद होता.
सातारा, सांगली, कोल्हापूरात जोरदार पाऊस सुरु असून कोकणातही जोरदार पावसाने दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु आहेत. आंबोली येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या मोटारीवर दरड कोसळली मात्र, यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सावंतवाडी येथे जोरदार पावसासह चक्रिवादळ झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.