श्रीधर स्वामी महाराज हे मराठी आणि कन्नड संत कवी होते. यांचे संपूर्ण नाव श्रीधर नारायण पत्की देगलूरकर होते. हे श्रीरामाचे अनन्य भक्त आणि समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होते. यांचा जन्म 7 डिसेंबर 1908 रोजी नांदेड जिल्ह्यातील लाडचिंचोळी येथे मार्गशीर्ष पोर्णिमा दत्तजयंतीच्या दिवशी झाला .यांचा वडिलांचे नाव नारायण राव आणि आईचे नाव कमलाबाई होते.ते लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या पश्चात त्यांच्या आईने त्यांचे संगोपन केले. त्यांना लहानपणापासून कथा-कीर्तनाची आवड असल्यामुळे त्यांना रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगितल्या जात असल्यामुळे त्यांची श्रीरामांवर श्रद्धा होती.
सौरसुक्त, रुद्र, वैश्वदेव , त्रिसूपर्ण, बरोबर धर्मकर्माचा सखोल अभ्यास केला. भारतीय आर्य संस्कृती,वेद,पुराण, उपनिषदे यांचावर त्यांची श्रद्धा होती. देशासाठी समाजासाठी काही करण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. समर्थ रामदास स्वामींसारखे तप आपण करावे असे त्यांना वाटत असे.स्वतःचे आयुष्य सनातन आर्य धर्माच्या प्रचारासाठी समर्पित करण्याचा निश्चय केला. त्यांचे शिक्षण गुलबर्गा आणि पुण्यात झाले. प्राथमिक शिक्षणासाठी हैदराबादला पाठवण्यात आले .श्रीधर स्वामींचा मोठा भाऊ (श्रीधर) अवघ्या दहा वर्षांचा असताना त्याचे निधन झाले.त्याच्या धक्क्याने आईचे देखील निधन झाले. नंतर ते आपल्या मावशीकडे राहण्यासाठी गेले.
कालांतराने त्यांची शाळेतील एक शिक्षक श्री पालणितकर गुरुजी यांच्याशी चांगली ओळख झाली. श्रीधर यांचा अध्यात्मवादाकडे असलेला खोल कल पाहून त्यांनी त्यांना समर्थ रामदास स्वामीजींचा आशीर्वाद घेण्याचा सल्ला दिला. नवरात्रात दसऱ्याच्या दिवशी ते पुणे सोडून सज्जनगडावर गेले. 'जयजय रघुवीर समर्थ म्हणत त्यांनी स्वामी समर्थांच्या समाधीचे आणि श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन केले. आणि गडावर श्रीधरबुवा रामदासी म्हणून वास्तव्य केल .दासनवमीच्या दिवशी श्रीधर बुवांना स्वामी समर्थांचे दर्शन झाले. त्यांच्या आज्ञानुसार ते अरण्यातून गोकर्ण -महाबळेश्वरला गेले आणि तिथे त्यांची भेट शिवानंद योगींशी झाली. नंतर ते शिवानंदांच्या आश्रमात कर्नाटकात शिगेहळ्ळीला राहिले. तेथे तपश्चर्या केली. नंतर पुढे जाता जाता कोडसाद्री या पर्वतावर श्रीधर तप करीत असता त्यांना आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी दर्शन दिले. आणि त्यांना ब्रम्हासनावर स्थानापन्न केले.
नंतर उत्तर भारतात भ्रमण करून ते पुन्हा गडावरआले. त्यांचे हातून रामगौरव, श्रीरामपाठ, श्रीसमर्थपाठ, मारूति माहात्म्य, स्वात्मनिरूपण हे साहित्य निर्माण झाले. कानडी, इंग्रजी, संस्कृत व मराठी भाषेतून तत्वज्ञानपर चिंतन त्यांनी ग्रंथरूपाने लिहिले.शिवानंदस्वामींनी देह ठेवल्यावर शिगेहळ्ळीला मठाची व्यवस्था श्रीधरांनी पाहिली. मठाचे जीर्णोद्धार केले. नंतर ते गडावर आले व पुढे महाराष्ट्रात भ्रमण करून पुन्हा सन १९४२ साली ते शिगेहळ्ळीला परत आले. त्या आश्रमात त्यांनी “विजयादशमी”च्या मुहूर्तावर संन्यासदीक्षा घेतली. या काळात श्रीधरबुवा हे श्रीधरस्वामी म्हणून प्रसिध्द झाले. त्यांनी यज्ञयागादि कर्मे केली. समर्थांची 350 वी जयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली. लोकांच्या अडीअडचणी उपासनामार्गाने सोडविण्यासाठी मार्गदर्शन करू लागले.
श्रीधरस्वामी गडावर आले. समर्थ सेवा मंडळाची स्थापना केली. गडावर अनेक सुधारणा केल्या. समर्थांच्या वाड.मयाचा, तत्वज्ञानाचा प्रसार सुरु केला.वरदपूर या पुण्यभूमीवर “श्रीधराश्रम” स्थापन केला. श्रीधरस्वामींना एकांतवास प्रिय असे. त्यांनी एकूण 13 वर्षे एकांतवास काढला.चैत्र वद्य द्वितीयेला ला दि. 19 एप्रिल 1973साली रोजी सकाळी ॐ चा तीन वेळा उच्चार करून श्रीधरस्वामीं यांनी देहत्याग केला.