Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गवईंना ओढून नेणे हे कॉंग्रेसचे कारस्थान- कवाडे

- अविनाश पाठक

गवईंना ओढून नेणे हे कॉंग्रेसचे कारस्थान- कवाडे
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीपासून खरा धोका सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला आहे. त्यामुळे ही समिती खिळखिळी करण्याचा कुटील डाव खेळत काँग्रेसच्या इशार्‍यावर राजेंद्र गवईंना या आघाडीतून दूर केले गेले, असा आरोप समितीचे एक निमंत्रक आणि एकीकृत रिपब्लिकन पक्षाचे प्रवक्ते माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे.

'हिंदुस्थान समाचार'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

प्रा. कवाडे म्हणाले, की अनेक खासदार वर्षानुवर्षे खासदारकी केल्यावरही सरकारी निवासस्थाने बळकावून बसतात. पण, त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र, आठवलेंवर नेमकी कारवाई करीत त्यांच्या घरातून सामान बाहेर फेकले जाते. हा आठवलेंवर उगवलेला सूड तर होताच. पण, गवईंना इशाराही होता. काँग्रेसच्या दबावाला गवई बळी पडले. सत्ताधार्‍यांनी कितीही ठरविले असते तरी केरळचे राज्यपाल रा. सु. गवईंची टर्म पूर्ण होईपर्यंत त्यांना राज्यपालपदावरून हटविणे कठीण होते. त्यामुळे नेमक्या कोणत्या दबावाला गवई पिता-पुत्र बळी पडले हे सांगणे आज तरी कठीण आहे. मात्र, दबाव आला हे निश्चित ! असेही कवाडे म्हणाले.

काँग्रेसच्या मदतीने गवईंनी आजवर अनेक पदे उपभोगली तरीही त्यांची सत्तेची हाव संपत नाही. आज गवई जर रिपब्लिकन ऐक्यासाठी राजभवन सोडून आमच्यासोबत आले असते तर आंबेडकरी जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचली असती, असा दावा कवाडे यांनी केला.

गवई किंवा आंबेडकर आमच्यासोबत आले नाही, त्यामुळे आंबेडकरी जनतेत त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे, याकडे लक्ष वेधत रिपब्लिकन ऐक्य ही आंबेडकरी जनतेची आग्रही मागणी होती. त्यांच्यातला जनआक्रोश आम्हाला ऐक्यासाठी जनादेश देत होता. ऐक्यानंतर नव्याने स्थापन होणार्‍या डाव्या आघाडीने आम्हाला बोलावले. आम्ही त्यांना प्रतिसाद दिल्यावर त्यांनी आम्हाला सामावून घेतले, असे कवाडेंनी स्पष्ट केले. या राज्यात सध्या सत्तेचे दावेदार असणार्‍या दोन आघाड्या एक काँग्रेस-राष्ट्रवादी आणि दुसरी शिवसेना-भाजपची युती या दोन्हीं गटांनाही सक्षम असा पर्याय असावा, अशी लोकांची अपेक्षा होती. त्यानुसार आम्ही तिसर्‍या आघाडीच्या रूपाने हा पर्याय दिला, असा दावा कवाडे यांनी केला.

तिसर्‍या आघाडीच्या रूपाने आम्ही काँग्रेस आणि भाजप दोघांनाही नामोहरम करणार, हे निश्चित, असे ठाम प्रतिपादन करीत कवाडे म्हणाले की, आम्ही सर्वच बाबतीत आघाडी घेतलेली आहे. इतरांच्या युती आणि आघाडीबद्दल नुसत्या चर्चा चालू होत्या तेव्हा आम्ही २०० मतदारसंघांची यादीही जाहीर केली होती. उमेदवार निवडीतही आम्ही आघाडी घेतली तसेच प्रचारातही आम्ही आघाडीवर आहोत. या आघाडीत एकूण १७ पक्ष आहेत. हे सर्वच पक्ष विविध स्तरांवर जनसामान्यांसाठी संघर्ष करीतच आजच्या जागी येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे जनसामान्यांचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही जनतेला सक्षम पर्याय देणार हे निश्चित, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मायावतींचं सोशल इंजिनीअरींग' महाराष्ट्रात काम करणार नाही, अशी खात्री देत त्यांचे सोशल इंजिनीअरींग उत्तर प्रदेशातही फसल्याचा आरोप कवाडे यांनी केला. त्यांचे सोशल इंजिनीअरींग हे मतपेटीचे राजकारण असल्याची टीका करताना उत्तर प्रदेशात सोशल इंजिनीअरींगच्या माध्यमातून कोणता सोशल चेंज झालेला आहे, असा सवाल त्यांनी केला. ही 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे,' असे सांगताना सोशल इंजिनीअरींगचे खरे जनक रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच होते, असा दावा प्रा. कवाडे यांनी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi