Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन वारसदारांमधील ऐतिहासिक लढत

दोन वारसदारांमधील ऐतिहासिक लढत
सध्या जामीनावर सुटलेले खा. डॉ. पद्मसिंह पाटील आणि कै. पवनराजे निंबाळकर यांचे वारसदार राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील व ओमराजे निंबाळकर एकमेकांसमोर निवडणूकीसाठी उभे आहेत. या दोन वारसदारांमधील ही ऐतिहासिक लढत आगामी काळातील जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलवणारी ठरेल.

पुनर्रचनेनंतर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील ७२ गावे तुळजापूर मतदारसंघात गेली उर्वरित उस्मानाबादसह कळंब तालुका मिळून नवा उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ तयार झाला. तुळजापूरमध्ये समाविष्ट झालेल्या ७२ गावात डॉ. पद्मसिंह पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. तर नव्याने उस्मानाबादमध्ये सामील झालेल्या कळंब तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओमराजे निंबाळकर यांना मोठा जनाधार आहे.

२००४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकांत डॉ. पद्मसिंह पाटील व कै. पवनराजे निंबाळकर यांचे एकमेकांना कडवे आव्हान होते. या निवडणुकीत या दोघांव्यतिरिक्त सात अपक्ष उमेदवार निवडणुकीत होते. पवनराजे निंबाळकर यांना अपक्ष असताना या निवडणुकीत ६८ हजार ३५० मते मिळाली. तर त्यांचे कट्टर विरोधक पद्मसिंह पाटील यांनी ६८ हजार ८३४ मते घेऊन फक्त ४८४ मतांनी पवनराजे निंबाळकर यांचा पराभव केला. उर्वरित सात अपक्ष उमेदवारांमध्ये १३ हजार १९६ मतांची विभागणी झाली होती.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात २ लाख ९५ हजार ४७० मतदार संख्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातच या मतदार संघात कडवी झुंज होणार हेही निश्चित आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला ७४ हजार ४२५ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ७४ हजार ७७६ मते मिळालेली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसला उस्मानाबादमधून केवळ ३५१ मतांची आघाडी घेता आली. पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरण, खा. डॉ. पद्मसिंह पाटलांना झालेली अटक, अण्णा हजारे यांनी खा. पाटलांविरूध्द नव्याने दाखल केलेली फिर्याद अशा अनेक बाबींमुळे अडचणीत सापडलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेने उमेदवारी देवून ओम राजेनिंबाळकर यांना दिलेले बळ यामुळे या दोन वारसदारांमध्ये होत असलेल्या या अटीतटीच्या ऐतिहासिक लढतीकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi