Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉंग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण- मुंडे

कॉंग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण- मुंडे
, शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2009 (18:19 IST)
Gajanan Ghurye
GG
कॉंग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण आहे. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. आश्वासने देऊन ती न पाळण्यासाठीच या आघाडीचे सरकार प्रसिद्ध आहे. त्यामुळे या आघाडीच्या सरकारला जनता कंटाळली आहे. हीच जनता सत्तापरिवर्तनास उत्सुक असून येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सत्तेत येईल, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी 'हिदूस्तान समाचार'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. त्यांच्याशी झालेल्या गप्पांचा हा गोषवारा....

कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याविषयी काय सांगाल?
मुंडे- जाहिरनाम्यातील वचने पूर्ण करण्यासाठी नसतात, असे काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मागच्यावेळी सरकार स्थापन होताच सागितले आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मोफत वीज देऊ असे आश्वासन मागच्यावेळी जाहीरनाम्यात दिले होते. प्रत्यक्ष सरकार स्थापन होताच शब्द फिरविला. त्यामुळे काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाचे आमंत्रण आहे ते जेवल्याशिवाय खरे नाही याचा प्रत्यय महाराष्ट्रातील जनतेला आला आहे. त्यामुळे आता त्यांनी आमची कॉपी केली काय किंवा आणखी कितीही आश्वासने दिली काय त्याचा काहीही परिणाम महाराष्ट्राच्या जनतेवर होणार नाही.

युतीचे सरकार आले तर आपले प्राधान्य कोणत्या विषयांना राहणार आहे ?
मुंडे- युतीच्या वचननाम्यात आम्ही म्हटलेच आहे की आम्ही शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील समस्या यांना प्राधान्य देणार आहोत. शेतकर्‍यांना कमी व्याजदरात कर्ज देण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. आज शेतीचे अर्थशास्त्र बिघडले आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे आम्ही शेतकर्‍यांना कमी व्याजदरात पतपुरवठा करणार आहोत. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे वचन आम्ही दिले आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीवनात सध्या गगनाला भिडलेली महागाई ही सर्वांत मुख्य समस्या आहे. डाळ, साखर, तेल, तांदूळ , डिझेल, पेट्रोल या सर्वांचे भाव अचानक खूपच वाढले आहेत. लोकांचे महिन्याचे सर्व अंदाजपत्रक कोलमडले आहे. सामान्य माणसाला तर एकेक दिवस कसा घालवायचा हाच प्रश्न आहे. आम्ही सत्तेत आलो की महागाईवर नियंत्रण आणणार आहोत. हे आश्वासन नाही. आम्ही आमचे सरकार महाराष्ट्रात होते तेव्हा हे करून दाखविले आहे. आम्ही जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवले होते. आताही सरकार आल्यावर डाळ, तांदूळ तेल, साखर, गहू अशा पाच जीवनावश्यक वस्तूचे भाव पाच वर्षे आम्ही स्थिर ठेवणार आहोत. परिस्थिती बदलली तर सरकार तोटा सहन करील पण वस्तूंचे भाव आम्ही वाढू देणार नाही.

शरद पवार हे कृषीमंत्री असूनही साखरेचे भाव कसे काय वाढले ?
मुंडे- सध्याच्या या महागाईला सोनिया गांधी आणि शरद पवार हेच जबाबदार आहेत असा माझा आरोप आहे. सरकारचे निर्यात आयातीचे धोरण याला जबाबदार आहे. भारतात साखर आणि तांदूळ किती आहेत याचा विचार न करता या दोन्ही गोष्टी सरकारने निर्यात केल्या त्यामुळे इकडे मागणीपेक्षा कमी उपलब्धता असे चित्र निर्माण होवून महागाई वाढली. शरद पवार हे साखर कारखानदारांचे नेते आहेत, शेतकर्‍याचे नाहीत. सर्वसामान्य माणसांचा आणि शेतकर्‍यांच्या हिताचा विचार त्यांनी केलाच नाही. आमच्या वचननाम्यात आम्ही ग्रामीण भागात वीजपुरवठा नियमित करण्याचे वचन दिले आहे. आम्ही लोडशेडिंग संपवणार आहोत. युतीचे राज्य होते तेव्हा आठवड्यातून फक्त एक दिवस लोडशेडिंग होते.

वीज टंचाईला युतीचे सरकारच जबाबदार होते असा आरोप काँग्रेसचे नेते करतात, त्यावर तुमचे म्हणणे काय?
मुंडे- काहीही आरोप केला तरी लोक विश्वास ठेवणार नाहीत. युतीचे सरकार सत्तेत होते तेव्हा राज्यात केवळ पाचशे मेगावॅट इतके शॉर्टेज होते. त्यामुळे आठवड्यातून एकच दिवस लोडशेडिंग होतं. या सरकारच्या काळात हे शॉर्टेज सात हजार मेगावॅटवर गेलं आहे. दहा वर्षे हे राज्य करताहेत मग आम्ही जबाबदार कसे? एन्रॉनबाबत एका केंद्रीय मंत्र्यानं इतकं बेजबाबदार विधान करावे म्हणजे काय? जर ते भंगार होतं तर दहा हजार कोटीला विकत का घेतलं? जनतेचा पैसा वाया का घालवला याचं त्यांनी उत्तर द्यावं. एन्रॉनच्या सर्व वाटचालीची चौकशी करण्यासाठी न्या. कुर्डूकर समिती नेमली होती. त्याचं काम यांनी अर्धवट का थांबवलं? हिंमत असेल तर न्या. कुर्डुकर आयोगाचं काम पुन्हा सुरू करा. या आयोगाच्या अहवालावर एक श्वेतपत्रिका प्रकाशित करा. विजेच्या वाढत्या मागणीचा आणि अतिरिक्त विजनिर्मितीचा काहीही विचार काँग्रेसनो गेल्या दहा वर्षात सत्तेवर आल्यावर केला नाही. त्यामुळे सगळा महाराष्ट्र यांनी अंधारात लोटला आहे.

राज ठाकरे यांचा पक्ष युतीची घोडदौड रोखेल काय ?
मुंडे- लोकसभेला घडलं ते आता घडणार नाही. महाराष्ट्रातील मतदार सूज्ञ आहे. आपलं मत वाया जाऊ नये याची तो काळजी घेत असतो. मनसेला मत दिलं की काँग्रेसचा फायदा होतो हे आता या मतदारांना कळून चुकलं आहे. त्यामुळे आता लोकसभेची पुनरावृत्ती होणे नाही. शिवाय या निवडणुकीत तिसरी आघाडी उभी आहे. तिरंगी लढती झाल्या की आमचा नेहमीच फायदा झालेला आहे. लोकसभेला तिसरी आघाडी नव्हती. रिपब्लिकन पक्ष काँग्रेसबरोबर होते. आता तसे नाही. तिसरी आघाडी बारा टक्क्यांपेक्षा जास्त मते घेईल. त्यामुळे राज ठाकरे यांनी लोकसभेप्रमाणे चार टक्के मते घेतली तरी त्याचा फटका आम्हाला बसणार नाही..

युवा मतदारांचा ओढा राज ठाकरे यांच्याकडे दिसतो आहे. त्यावर युतीची भूमिका काय आहे?
मुंडे- युवकांना आम्ही सरकार आल्यानतंर सरकारी सेवेत ज्या जागा रिक्त आहेत त्या सर्व आमचे सरकार भरणार. आज दोन लाख जागा रिक्त आहेत.. सरकार येताच दोन वर्षात सर्व बेरोजगारांना रोजगार देणार. जर रोजगार देता आला नाही तर त्यांना बेरोजगार भत्ता देणार. महाराष्ट्रात सहा महसूल विभाग आहेत त्या सहा विभागामध्ये विभागीय ठिकाणी पंचतारांकित औद्योगिक वसाहती आणून नवे उद्योग आणणार. आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणार. सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही सत्तेत आलो की असा कायदा करणार आहोत की ८० टक्के स्थानिक लोकानां रोजगार दिला पाहिजे. हे सर्व युवकांच्या फायद्याचं राहणार आहे. त्यामुळे युवक वर्ग आमचाच मतदार आहे तो आमच्याबरोबरच राहील.

बंडखोरांचे काय ? भाजप सेनेत किती बंडखोर आहेत ?
मुंडे- बंडखोरीचे अमाप पीक काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आले आहे. त्यांचे जवळ जवळ सव्वाशे बंडखोर उभे आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बंडखोर आहे. त्या मानाने भाजप शिवसेनेत बंडखोरांची संख्या अगदी नगण्य आहे. त्यामुळे याचा काहीच परिणाम आमच्यावर होणार नाही. आमचा विजय निश्चित आहे. आमचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार यात कसलीही शंका नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi