Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तरूण गोगोईंची आसाममध्ये 'सत्तेची हॅट्ट्रिक'

तरूण गोगोईंची आसाममध्ये 'सत्तेची हॅट्ट्रिक'

मनोज पोलादे

ND
तरूण गोगोई यांच्या करिष्माई नेतृत्वात कॉंग्रेसने आसाममध्ये सत्तेची हॅट्ट्रिक साधली. कॉंग्रेसने १२६ जागांच्या विधानसभेत ७८ जागा पटकावल्या. राज्यात १९७२ नंतरचा कोणत्याही पक्षाद्वारे हा सर्वात मोठा विजय होय. गोगोई यांनी २०११ मध्ये विधानसभा निवडणूकीत हॅट्ट्रिक साधत इतिहास रचला. बिमला प्रसाद चलीहा यांच्यांनंतर सलग तिसर्‍यांना मुख्यमंत्रीपद भूषवणारे गोगोई हे दुसरे मुख्यमंत्री होय.

पहिल्यांदा १७ मे २००१ रोजी आसाम गण परिषदेपासून सत्तेची धुरा सांभाळणार्‍या तरूण गोगोई यांना उल्फा सारख्या बंडखोर गटांना चर्चेच्या माध्यमातून शांतताप्रवाहात आणण्यासोबतच राज्यास दिवाळखोरीच्या गर्गेतून काढण्याचे श्रेय जाते. आसामच्या मातीत रूजलेल्या ७५ वर्षीय गोगोईंकडे प्रशासन आणि राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. राज्यातील संवेदनशील सामाजिक, राजकीय गुंतागुंतीची त्यांची जाण अचूक आहे. राज्यातील काही प्रश्नांमुळे धार्मिक आणि सामाजिक घटकांचे बदलते प्रमाण, या पार्श्वभूमीवर येथील मूळ समाजघटकावर होणारे परिणाम आणि निर्माण झालेली नवी संरचणा त्यांनी स्वत: अनुभवली आहे. त्यांनी विधानसभा आणि संसदीय राजकारणातील दिर्घ अनुभव येथील परिस्थिती हाताळण्यात खर्ची घातला आहे.

गोगोईंनी पहिल्यांदा सत्ता हाती घेतली त्यावेळी राज्यात बंडखोर गटांच्या हिंसात्मक कारवाया, डबघाईस आलेली राज्याची आर्थिक स्थिती, यासारख्या आव्हानात्मक समस्या त्यांच्यासमोर होत्या. कर्मचार्‍यांना त्यांचे वेतन वेळेवर मिळणे कठिण झाले होते. मात्र गोगोईंनी या आव्हानांचा समर्थपणे सामना केला. राज्यास आर्थिक स्थिरता प्रदान करताना हिंसेवर उतारू झालेल्या बंडखोर गटांना चर्चेच्या टेबलावर येण्यास भाग पाडून राज्यात शांतता प्रस्थापित केली. कारण शांततेतून विकासाचा मार्ग जातो, हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. जवाहरलाल नेहरूंपासून प्रेरणा घेऊन राजकारणात आलेल्या गोगोईंच्या राजकीय कारकीर्दीस सुववात झाली ती १९६८ मध्ये. जोरहाट महानगरपालिकेचे सदस्य बनून राजकीय प्रवासास सुरवात करणारे गोगोई १९७१ मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. तेव्हापासून त्यांची राजकारणावर घट्ट पकड राहिली आहे.

२०११ मधील विधानसभा निवडणूकीत त्यांनी विरोधकांना धोबीपछाड केले. राज्यात दोनदा सत्ता उपभोगणार्‍या आसाम गण परिषदेस फक्त १० तर त्यांच्या सहय्योगी पक्षास ५ जागांवर समाधान मानावे लागले. २००६ पासून २०११ पर्यंत यांची जागांची संख्या निम्म्यावर आली. एखाद्या विरोधी पक्षाच्या लोकप्रियेतत झालेल्या ही झपाट्याची घट होय.

राज्यात स्थलांतरीत मुस्लिम बहुल भागात प्राबल्य असलेला ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटीक फ्रंट (एआययूडीएफ) या निवडणूकीत १८ जागा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला. या फ्रंटची लक्षणीय उपस्थिती या निवडणूकीचे वैशिष्ट ठरले.

सत्ताधारी कॉंग्रेसचा सहय्योगी पक्ष बोडोलँड पीपल्स फ्रंटने (बीपीएफ) १२ जागांवर विजय संपादन करून चांगली कामगिरी केली. मात्र त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हे पक्ष किंगमेकर ठरू शकले नाहीत. राज्यात सत्ताधारी कॉंग्रेसची ही तिसरी टर्म असल्याने सरकारविरोधी जनभावना असल्याची विरोधकांची हाकाटी होती. मात्र गोगोईंनी बहुमतासाठी आवश्यक ६४ या जादूई आकड्यापेक्षा १४ जागा अधिक पटकावत विजोयोत्सव साजरा केला. जनतेने सर्व फॅक्टर्स धुडकावून लावत गोगोईंना अभूतपूर्व बहुमत प्रदान करताना आणखीन 'तरूण' बनवले.


Share this Story:

Follow Webdunia marathi