ज्या घरात सूर्यप्रकाश येत नाही, तेथे डॉक्टर जातो, अशी चीनमध्ये म्हण आहे. थोडक्यात सूर्यप्रकाश आपल्या घरात येणे किती जरूरीचे आहे, ते या एका वाक्यात सांगितले आहे. जेथे प्रकाश नसतो, तेथे अंधार असतो. अंधाराबरोबरच वावरणारे कीटक, प्राणी तेथे असतात. निराशा, अनुत्साह, नकारात्मक दृष्टीकोण हेही तेथे वास्तव्याला असतात. सहाजिकच तेथे रहाणाऱ्यांच्या आरोग्यावर या सर्व नकारात्मक बाबींचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक प्रकाशाला सर्वाधिक महत्त्व द्यायला हवे. प्रकाशाला रोखणाऱ्या बाबी हटवायला हव्या. खिडकीचे पडदे खुले ठेवायला हवे.परिणामी प्रकाश आत येऊन तो आपले जीवन उजळवेल.
कृत्रिम प्रकाश घरात कमीत कमी हवा. बेडरूममध्ये सतत मंद तेवणारा दिवा पाहिजे. तेथे मोठा दिवा असल्यास विश्रांती घेण्यात बाधा येते. झोप नीट येत नाही. शिवाय येथील दिवाही बरोबर आपल्यासमोर नको. अभ्यासाची खोली वेगळी असल्यास तेथेही तीव्र प्रकाशाचा दिवा नको. अन्यथा अभ्यास बाजूला राहून झोप येईल. अभ्यास करताना पुस्तकावरील प्रकाश योग्य हवा. तो जास्तही नको आणि कमीही.
घराच्या एखाद्या विशिष्ठ भागात आपल्याला ऊर्जा निर्माण करावीशी वाटत असेल, तर तेथे मेणबत्ती पेटवा. घराच्या पूर्व भागात मेणबत्ती पेटविणे आपल्याला आशावादी बनवते. शिवाय आरोग्यसंपन्न राखण्यास मदत होते. संपूर्ण खोलीचे संतुलन या प्रकाशामुळे रहाते. घराच्या दक्षिण-पश्चिम भागात मेणबत्ती पेटविणे हे शांतता राखण्यास उपयुक्त आहे.
फेंगशुईत मेणबत्तीला मोठे महत्त्व आहे. मेणबत्तीचा प्रकाश संपूर्ण खोलीत ऊर्जा उत्पन्न करतो. ज्या खोलीत आपल्याला प्रकाश हवा आहे, तेथे मंद दिवा हवा. याशिवाय घरातील प्रत्येक खोलीत नैसर्गिक प्रकाश यावा यासाठी आपणास प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी अधिकाधिक खिडक्या हव्यात. घर बांधताना ही काळजी घेणे जरूरीचे आहे. सकाळचा प्रकाश अधिक लाभदायी असतो. तर, त्याचवेळी सायंकाळी तीव्र प्रकाश नको. असे झाल्यास ऊर्जेचा उपयोग योग्य पद्धतीने होऊन, त्याचा आपल्याला फायदा होईल.