भारतीय फुटबॉल संघ 2026 फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत मंगळवारी (21 नोव्हेंबर) भुवनेश्वरमध्ये कतारविरुद्ध मैदानात उतरेल.भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. अ गटात भारतासमोरील हे सर्वात कठीण आव्हान आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या खेळाडूंकडून चमत्कारिक कामगिरीची अपेक्षा आहे. पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात कुवेतचा 1-0 असा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे.
भारतीय संघाने चार वर्षांपूर्वी आशियाई चॅम्पियन कतारला गोलशून्य बरोबरीत रोखले होते आणि ते या सामन्यात संघासाठी प्रेरणादायी ठरेल. 10 सप्टेंबर 2019 रोजी 2022 विश्वचषक पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत कतारला गोलशून्य बरोबरीत रोखून भारताने फुटबॉल जगताला आश्चर्यचकित केले. कतार त्यावेळी जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि 2019 च्या सुरुवातीला आशिया कप जिंकला होता.
करिष्माई भारतीय कर्णधार सुनील छेत्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या सामन्यात मैदानात उतरला नाही, परंतु मंगळवारी कलिंगा स्टेडियमवर तो आपले कौशल्य दाखवण्यासाठी उत्सुक असेल.
अफगाणिस्तानविरुद्ध चार गोल करणारा कतारचा स्टार स्ट्रायकर अल्मोइझ अली याला रोखण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असेल. अन्वर अलीच्या अनुपस्थितीत भारताचा बचाव आधीच थोडा कमकुवत आहे.
गोलरक्षकगुरप्रीत सिंगने 2019 मध्ये कतारविरुद्धच्या त्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते आणि कलिंगा स्टेडियमवर कतारला गोल करण्यापासून रोखण्याची जबाबदारी पुन्हा एकदा त्याच्यावर असेल.
भारत आणि कतार यांच्यात आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. कतारने दोन सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.