बॅनर : यूटीवी मोशन पिक्चर्स निर्माता : रॉनी स्क्रूवाला दिग्दर्शन व संगीत : विशाल भारद्वाज गीत : गुलजार कलाकार : शाहिद कपूर, प्रियंका चोप्रा, अमोल गुप्ते, देब मुखर्जी.
मकबूल व ओंकारा असे सकस चित्रपट देणार्या विशाल भारद्वाजने आपल्या पुढील चित्रपटाचे नाव 'कमीने' असे घेतल्यावर त्याचे गुरू गुलजार यांच्याव्यतिरिक्त इतरांनी नाके मुरडली. पण तरीही विशालने हेच नाव ठेवायचे नक्की केले.
कमीनेमध्ये ते सैफ अली खानला घेण्यास उत्सुक होता. पण सैफ 'लव्ह आज कल' मध्ये गुंतला होता. शिवाय सैफचे वय 'कमीने'तील भूमिकेपेक्षा बरेच जास्त वाटत होते. त्यामुळे शाहिदला घ्यायचे ठरले. शाहिदच्या आयुष्यातली ही वेगळी फिल्म आहे. शिवाय तो यात डबल रोलमध्ये आहे.
चार्ली ( शाहिद कपूर) व गुड्डू (शाहिद कपूर) भाई आहे. चार्लीला श्रीमंत व्हायचेय. तेही झटपट. त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी आहे. त्यासाठी तो गुंड बनायलाही मागेपुढे बघत नाही.
गुड्डू एका एनजीओ फर्ममध्ये ट्रेनी आहे. तो प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. स्वीटी (प्रियंका चोप्रा) त्याची प्रेयसी आहे. स्वीटीचा भाऊ भोपे (अमोल गुप्ते) गॅंगस्टर आहे. ती त्याला खूप घाबरते. तो स्वतःला गरीबांचा मसीहा मानतो.
चार्ली व गुड्डू जुळे भाऊ असूनही एकमेकांपेक्षा अगदी वेगळे आहेत. चार्ली चाचरत बोलतो तर गुड्डू तोतरे. परस्परांना ते पहातही नाहीत. पण एका पावसाळी रात्री दोघांची आयुष्ये एकमेकांत मिसळतात. यातच मग अनेक समज गैरसमज होतात. बंदुका, ड्रग्ज, पैशाच्या दुनियेत दोघेही हरवून जातात. गॅंगस्टर्स, भ्रष्ट राजकीय नेते, बंडखोर, भ्रष्ट पोलिस यांच्याशी त्यांची गाठ पडते. त्यासाठी दोघेही एकत्र येऊन लढा देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.