आपल्या मुलाच्या या चित्रपटाकडे आकर्षित करण्यासाठी वासु यांनी बॉलीवूडमधील स्टार्सना यामध्ये घेतले आहे. शाहरुख, अभिषेक, संजय दत्त, जूही चावलासारखे स्टार कलाकार या चित्रपटात दिसून येणार आहेत. निहालसिंहाची कथा आहे. हा सर्वसामान्य मुलगा आहे. तो खूप बोलत असतो आणि प्रश्नांचा भडीमार करत असतो. देशातील सर्वांत मोठ्या महाविद्यालायात त्याने विज्ञानाचे प्रशिक्षण घ्यावे, अशी त्याच्या आईची इच्छा असते. अखेर निहालला मुंबईतील एका मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो. मुंबई आणि कॉलेजमधील वातावरण त्याच्यासाठी अनोखे असते. नवे आव्हान, नव्या लोकांच्या ओळखी त्याला आवडतात. सुरूवातीस तो अभ्यास गांर्भियाने घेत नाही. सिनीयर विद्यार्थ्यांकडून त्याचे रॅगिंग सुरू होते. त्याला आवडणा-या मुलीच त्याचा अपमान करतात. त्यातील मीशा ही मुलगी त्याला आवडत असते पण, मीशाला त्याच्यात रस नसतो. ती एकनंबरची घमेंडी मुलगी असते.
हळूहळू निहालची लोकप्रियता वाढू लागते आपल्या हुशारीने तो शिक्षक व विद्यार्थ्यांचे मन जिंकतो आणि स्मार्ट मुली त्याच्याकडे आकर्षित होतात. मीशाचा जळफळाट होऊ लागतो. मीशा संकटात असल्याचा त्याला भास होतो आणि तो धावत जाऊन तिचे जीव वाचवितो. खरेतर त्याला भविष्यातील घटनांची अनुभूती होत असते आणि हे सत्य याचवेळी बाहेर पडते.
मीशाचा नकार होकारात बदलतो आणि दोघांमध्ये रोमांस सुरू होतो. आपल्याला सर्वकाही मिळाल्याचे निहालला वाटू लागते पण, त्याची पुढची वाटचाल कठीण असते. भविष्य पाहण्याच्या त्याच्या ताकदीचा काहीजण गैरफायदा घेतात. पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी पहा.. कल किसने देखा