उत्साही आणि खिलाडू वृत्तीच्या करणला (हरमन बावेजा) कायदे कानून या भानगडीत जीवन जगणे आवडत नाही. तर काहीशी लाजाळू वृत्तीची सना (प्रियंका चोपड़ा) हिचा शिस्तबद्ध जीवन जगण्याकडे कल असतो. दोघांच्या विचारशैलीत मोठा विरोधाभास असला तरीही दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. डॉ. यतिंद्र खन्ना (बोमन इराणी) हे करणचे काका आहेत. अनेक वर्षांपासून 'टाइम मशीन'च्या निर्मितीसाठी त्यांचे संशेधन सुरू असून ते त्यात यशस्वी होतात. सनाला जेव्हा हे कळते तेव्हा ती टाइम मशीन साहाय्याने भविष्यातील मुंबई पाहण्याची इच्छा व्यक्त करते. करण, सना, डॉ. यतिंद्र आणि सनाचा लहान भाउ व बहीण राहुल आणि ठिय्या 2050 च्या मुंबईत पोहचतात. तेथे उडणा-या गाड्या आणि रेल्वे, 200 मजली इमारती, काम करणारे रोबोट हे सार पाहून ते थक्क होतात. त्यानंतर असे काही घटनाक्रम घडत जातात की करणला आपण सनापासून वेगळे होत असल्याची जाणीव होते. त्यावेळी क्यूटी (रोबोट) आणि बू (रोबोटिक टेडी बिअर) हे दोघांना पुन्हा जवळ आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
दरम्यानच्या काळात त्याला भविष्यातील देवता असलेल्या डॉ. होशीकडून धमकाविले जाते. त्यानंतर करण हे सर्व कसे हाताळतो, त्याला त्याचे प्रेम परत मिळते का? आणि पुन्हा परत येतो का? आदी अनेक प्रश्न पडद्यावरच पाहिलेले बरे...
हा लेख आपणास कसा वाटला, आम्हाला जरूर कळवा..