Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भव्यतेचं बाहुबळ, पण पहिल्या भागाशी विसंगत...

भव्यतेचं बाहुबळ, पण पहिल्या भागाशी विसंगत...
आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा एक प्रवाह येतो आणि त्या प्रवाहाच्या दिशेने आपण जात असतो. एखाद्या गोष्टीची चलती झाली, तर त्या विरोधात ऐकण्याची अनेकांनी मानसिकता नसते. आपण प्रचंड भावूक होतो आणि त्या प्रवाहावर कुणी बोट ठेवले तर बोट ठेवण्यार्‍याला आपण जणू शत्रूच मानून बसतो. भारतीय समाजाला सिनेमाचं प्रचंड वेड आहे. त्यात दक्षिण भारत हा सिनेमावेडाच आहे. तिकडच्या बड्या कलाकारांना दैवत्वाचे स्वरुप दिले जाते. बाहुबलीच्या बाबतीत सबंध भारतातले अनेक लोक भावूक झाले आहेत. त्यात महाराष्ट्रही मागे नाही. सध्या भारतात हिंदूनेसला अच्छे दिन आले आहेत. म्हणून बाहुबली हा जरी काल्पनिक सीनेमा असला तरी हिंदू त्याने प्रचंड प्रभावित झाले आहेत आणि बाहुबलीच्या विरोधात बोलणारे किंवा लिहिणारे, हे हिंदू विरोधी किंवा पाश्चात्य सिनेमांच्या आहारी गेलेले आहेत, असे म्हटले जात आहे. म्हणूनच मूळ विषयात प्रवेश न करता हा वेगळा परिच्छेद खर्च केला आहे. मी चार वर्षे कर्नाटकमध्ये होतो. वीरप्पनने कर्नाटकचे सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केले होते, तेव्हा कर्नाटकच्या लोकांचे दुःख मी माझ्या इवल्याशा डोळ्यांनी पाहिले आहे. असो. आता बाहुबली विषयी बोलायचं झालं तर बाहुबलीचे हिंदुवादी फॅन्स हा चित्रपट खान्स लोकांविरुद्ध प्रचारासाठी वापरत आहेत. त्यांचे म्हणणे खानांचे चित्रपट पाहण्यापेक्षा हिंदू संस्कृतीचे उदात्त दर्शन दाखवलेला चित्रपट पाहावा. पण या खानांनी सुद्धा त्यांच्या चित्रपटात बहुतांशी हिंदू नायकाचेच काम केले आहे. भारतात बहुसंख्य हिंदू राहतात, त्यामुळे खान हिरोंनी जर मुस्लिम भूमिका पुष्कळ केल्या असत्या तर ते चालले नसते. त्यामुळे खान विरुद्ध बाहुबली या प्रचारात तसे फारसे तथ्य नाही. पण या सर्व सामान्य लोकांच्या भावना आहेत आणि त्या तशाच असणार आहेत. यामुळे बाहुबलीच्या निर्मात्यांना आणि खानांनाही विशेष काहीच फरक पडणार नाही. काही खानांनी हिंदूंविषयी गैर वक्तव्य केले होते. पण यामुळे त्यांच्या चित्रपटांच्या उत्पन्नावर कोणताही परिणार झाला नाही. दुसरी गोष्ट चित्रपटाचे अनेक फॉर्म्स असतात, ज्या फॉर्ममध्ये जो चित्रपट तयार झाला आहे, त्याच दृष्टीने तो पाहायचा असतो. जर एखादा मॅड कॉमेडी चित्रपट पाहत असू तर त्यात विचित्रपणा, जो मनाला सहसा पटणार नाही, तो असतोच. बाहुबली हा सिरीयम मोडवर निर्माण झालेला चित्रपट आहे. त्यात तो भारतातला पहिला मोठा (कदाचित) तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला चित्रपट आहे. म्हणून बाहुबली विषयी आपण गंभीरपणेच बोललं पाहिजे. त्यात हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवले आहे म्हणून सगळंच चांगलं आहे, असं म्हणणं अर्थात चुकीचंच ठरेल. तसाही मुदामून हिंदूत्वासाठी हा चित्रपट तयार झालेला नाही. या चित्रपटाची कथा प्राचीन असल्यामुळे, प्राचीन हिंदू भारताचे काल्पनिक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते इतकेच. परंतु काहीजण असा प्रचार करीत आहेत, जणू बाहुबली चित्रपट निघाला नसता तर हिंदूभावविश्वाचे खुप मोठे नुकसान झाले असते. परंतु ती एक कला आहे आणि त्यात त्रुटी राहणारच, त्यात काहीच हरकत नाही आणि त्या त्रुटींवर बोट ठेवले तरी मुळीच हरकत नाही. एखादा सिनेमा खुप चालला तर तो खुप चांगला आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. तसे म्हणायचे असल्यास सैराट हा मराठी सिनेसृष्टीतला उत्तम सिनेमा म्हणावा लागेल. कारण याआधी मराठी सिनेसृष्टीने विचारही केला नसेल, एवढा गल्ला या चित्रपटाने कमवला आहे.
 
बाहुबली १ हा सिनेमा बर्‍यापैकी चांगला सिनेमा आहे. मुळात या सिनेमात तंत्रज्ञान हाच खरा हिरो असल्यामुळे तंत्रज्ञानावरच अधिक चर्चा होत आहे. इथे पाश्चात्य चित्रपटांशी तुलना करावीशी वाटते. पण ती केल्याने आपण पाश्चात्य चित्रपटांच्या आहारी गेलो आहोत, अशी टिका होते. मुळात इंग्रजी चित्रपटात तंत्रज्ञानाचा उत्तम वापर केला जातो. याचा अर्थ त्यांचे सर्वच चित्रपट उत्तम असतात असे नव्हे. पण जे उत्तम असतात, ते उत्तमच असतात. बाहुबली १ मध्ये तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला होता, असे माझे वैयक्तीक मत आहे. पण काहींचे असे म्हणणे होते की जेव्हा आपण हाडामांसाच्या माणसांचा चित्रपट पाहतो, ज्याला आपण कार्टून फिल्म म्हणत नाही, त्या चित्रपटतील ऍनिमेटेड दृश्य सत्यच वाटले पाहिजेत, जे बाहुबली १ मध्ये वाटले नव्हते. बाहुबली २ मध्ये तर अनेक तांत्रिक चूका सहज दिसून येतात. बाहुबली जेव्हा बैलांवर चढतो, तेव्हा ते दृश्य अक्षरशः खोटे वाटते, कंप्यूटराईज्ड वाटते. त्याच लढाईत बाम्ध तोडण्यासाठी बाहुबली जेव्हा भव्य लाकडावर चढत जातो, ते दृश्यही वाईट पद्धतीने चित्रित झाले आहे. तसेच बाहुबली १ मध्ये कालकेयच्या युद्धातील दृश्ये जितकी चांगली वाटतात, तसे बाहुबली २ मध्ये कोणत्याच युद्धाचे दृश्य चांगली वाटत नाही. असे काही दृश्य सोडल्यास बाकी ऍनिमेटेड दृश्ये चांगली आहेत. पण ते दृश्य अगदी खरे वाटत नाही. आपण हाडामांसाच्या माणसांचा चित्रपट न पाहता. एखादा ऍनिमेटेड चित्रपट पाहत आहोत, असेच वाटत राहते. त्यात भव्यता नक्कीच आहे. कटप्पाने बाहुबलीला मारले इथे बाहुबली १ संपतो आणि सबंध भारताला या प्रश्नाने पछाडले. कटप्पाने बाहुबलीला का मारले? हा प्रश्न जणू भारताचा सर्वात मोठा प्रश्न आहे, असेच काहीसे सोशल मिडियामुळे वाटले होते. कटप्पाने बाहुबलीला का मारले, यावर अनेक विनोद झाले. हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकांनी आपले बौद्धिक कौशल्य पणाला लावले होते. पण बाहुबली २ मध्ये कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे सोडून बाकी सगळे काही आहे. कटप्पा जेव्हा बाहुबलीला मारतो, तो प्रसंग अतिशय साधा आहे. मुळात हा प्रसंग अतिशय रोमहर्षक, उत्कंठावर्धक असायला हवा होता. कारण या पॉईंटवर येऊन बाहुबली १ संपला होता. हा पहिल्या भागाचा क्लायमॅक्स होता आणि या क्लायमॅक्सलाच चित्रपट संपतो. पण बाहुबली २ मध्ये कटप्पा बाहुबलीला का मारतो, याचे उत्तर पाहून आपल्याला वेगळ काही पाहिल्यासारखं वाटत नाही. ते उत्तरही साधं आहे आणि मारतानाचे दृश्यही सामान्य आहे. बाहुबली २ मध्ये अमरेंद्र बाहुबलीच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याची अतिशयोक्ती झाली आहे. कारण बाहुबली २ हा स्वतंत्र चित्रपट नाही. तो पहिल्या भागाचा एक भाग आहे. ही प्रतिशोधाची कथा आहे. मूळात ही कथा महेंद्र बाहुबलीची आहे, जो आपल्या पित्याच्या मृत्यूचा प्रतिशोध घेणार आहे आणि अमरेंद्र बाहुबली हा या कथेचा भाग आहे. ही कथाही तशी नवीन नाही. अनेक चित्रपटांत अशी कथा आहे. हिरो आपल्या आई-वडीलांवर झालेल्या अत्याचाराचा प्रतिशोध घेतो. पण त्यात हरकत घेण्यासारखेही काही नाही. अनेक कथा (स्टोरी लाईन) या सारख्याच असतात. पण पटकथा आणि कथा नेमकी कुठे घडतेय, कोणत्या काळात आणि कोणत्या परिस्थितीत घडतेय यामुळेच कथेत वेगळेपण येतं. तसं वेगळेपण बाहुबलीमध्ये आहेच. तर आपला मुद्दा असा होता की अमरेंद्र बाहुबलीच्या आयुष्यवर खुप वेळ खर्च केला असल्यामुळे मूळ कथेचं गांभीर्य निघून गेलं आहे. किमान मध्यांतरपर्यंत तरी अमरेंद्र बाहुबलीची कथा संपवायला पाहिजे होती. पण तसे झाले नाही आणि महेंद्र बाहुबलीला प्रतिशोध घ्यायला वेळच मिळाला नाही. कारण महेंद्र बाहुबली म्हणजेच एका लहानशा गावात वाढलेला शिवा हा जन्माने जरी क्षत्रिय असला आणि त्याच्यात अमरेंद्र बाहुबलीचे रक्त वाहत असल्यामुळे तो प्रचंड बलशाली आहे, हे जरी खरे मानले तरी त्याला कोणतेही युद्ध शास्त्र माहित नसताना तो आपल्या पित्याची कथा ऐकतानाच माहिश्मतीच्या साम्राज्या विरुद्ध बंड पुकारुन युद्ध करण्यास सज्ज होतो आणि तो पटकन जिंकतोही. हे काही मनाला पटत नाही. मारामार्‍या करणं वेगळ आणि प्रचंड सैनिकांसह युद्ध करणं वेगळं. 
 
अजून एक घोडचूक म्हणजे अवंतिका ही शिवाची म्हणजेच महेंद्र बाहुबलीची प्रेमिका. मुळात पहिल्या भागात तिच तिच्या साथीदारांसह, सरदारासह माहिश्मती साम्राज्याच्या स्वातंत्र्यासाठी आणि देवसेनेला (शिवाची आई)सोडवण्यासाठी लढत असते. याबद्दल शिवाला काहीच माहित नसतं. शिवा तिच्या प्रेमात पडतो आणि त्याचे ध्येय स्वतःचे ध्येय आहे, असे समजून तिची मदत करतो आणि तेव्हा त्याला कळतं की हे तर त्याचेच ध्येय आहे. तर सांगायचे तात्पर्य असे की अवंतिका हे अतिशय महत्वाचे पात्र बाहुबली २ मध्ये अक्षरशः वगळण्यात आले आहे. ही महा-घोडचूक आहे. हा कथेतला कमकुवतपणा आहे. भव्यता दाखवण्याच्या मोहापोटी अनेक त्रुटी दिग्दर्शक आणि लेखकाने सोडल्या आहेत. अमरेंद्र बाहुबली आणि देवसेना यांची कथा सांगताना, बाहुबलीचा पहिला भाग जिथून सुरु झाला होता, त्या मूळ कथेचा चित्रपट निर्माण करणार्‍यांना विसर पडला आहे. त्यांचे प्रेम फुलवण्यात खुपच वेळ घेतल्यामुळे बाकीची कथा हळूवार पुढे सरकते आणि क्लायमॅक्स निसटून जातो. बाहुबली १ मध्ये क्लायमॅक्स उत्सुकता निर्माण करतो. बाहुबली २ मध्ये तर क्लायमॅक्सचा अभाव आहे. एका दृश्यात कटप्पा भल्लालदेव आणि त्याच्या वडीलांची चर्चा ऐकतो. त्यात भल्लालदेवचा बाप बिज्जलदेव म्हणतो की तू तुझ्या आईला मारुन टाक. ही बाब एक निष्ठावान सेवक ऐकतो, पण त्याला त्यात विशेष काहीच वाटत नाही. बीज्जलदेव हा कपटी आहे, हे माहित असतानाही कटप्पाला हे ऐकून विशेष वाटत नाही, ही कटप्पाची नाही तर लेखकाची चूक आहे. यातील गाणी चांगली असली तरी त्यातील एकही गाणे तुमच्या जीभेवर तरळत राहत नाही. सिनेमाचे बॅकग्राऊंड म्यूझिक सुद्धा फारसे प्रभावी झाले नाही. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर राणा डुगुबट्टी, अनुष्का शेट्टी, नास्सर, रम्या कृष्णन, सथ्यराज यांनी आपली भूमिका चांगली निभावली आहे. अनुष्का शर्मा जितकी गोड दिसली, तितकाच तिचा राजेशाही थाट चांगला वाटला आहे. ती चित्रपटात आपला वेगळा प्रभाव पाडते. राणा डुगुबट्टीने पहिल्या भागाची कंटिन्यूटी चांगली ठेवली आहे. चित्रपटात विविध सीन करताना कंटीन्यूटी राखणे कठीण जाते. त्यात चित्रपट दोन भागात तयार झाला असेल, तर आपला पहिल्या भागातला मूड कायम राखणे खुपच कठीण. तो या तरुण खलनायकाने राखला आहे. नास्सर, रम्या कृष्णन आणि सथ्यराज या ज्येष्ठ अभिनेत्यांनी त्यांची भूमिका चांगली निभावली आहे. देवसेनेवर जो प्रेम करतो, तो कुमारवर्मा, ही भूमिका सुब्बूराजू या नटाने साकारली आहे. त्याने खुपच वाईट अभिनय केला आहे. अखेर नाव घ्यायचे ते प्रभासचे. प्रभास शिवा आणि अमरेंद्र बाहुबली या दोन्ही भूमिकेत चांगला दिसला आहे. त्याची भूमिकाही उत्तम झाली आहे. तो एक उत्तम ऍक्शन हीरो म्हणून समोर आला आहे. बाहुबलीच्या निमित्ताने तो आता सबंध भारताला परिचित झाला आहे. प्रभास हा देखणा आणि गुणी अभिनेता आहे. साऊथचे लोक अधिक एप्स्रेसिव्ह असतात, म्हणून काही लोकांना त्यांचा अभिनय ओव्हर वाटतो. तो कधी लधी होतही असेल. परंतु प्रत्येक देशाचा अभिनय वेगळाच असतो. त्यात भारत हा विविध भाषांनी नटलेला देश आहे. प्रत्येकाची अभिव्यक्ती खुपच वेगळी आहे. मी चित्रपटाच्या कमतरते विषयी अधिक चर्चा केली आहे. कारण त्यातील जमेची बाजू अनेक समीक्षकांनी दाखवलेली आहेच. पण चित्रपटाच्या अनेक चांगल्या बाजू आहेत. चित्रपटाची ऍक्शन पाहताना मजा येते. नायक आणि खलनायकाची लढाई खुपच रंजक झाली आहे. चित्रपटाच्या प्रत्येक पटकथेत लोकांचं मनोरंजन होईल, याची खबरदारी घेतली आहे. एकतर या चित्रपटाचं कथानक प्राचीन भारतातलं आहे. त्यामुळे यात प्राचीन हिंदू संस्कृतीचे दर्शन घडते. बाहुबली २ मध्ये जय भवानी म्हणून एक घोषणा आहे. मी गेल्या वर्षी "रण" नावाचे नाटक राज्यनाट्यासाठी लिहिले होते. त्यात मी हर हर महादेव अशी घोषणा लिहिली होती. म्हणून मला परिक्षकांनी प्रश्न विचारला होता की हर हर महादेव ही घोषणा ११-१२ व्या शतकात होती का? पण असे प्रश्न श्री. राजमौली यांना कुणीही विचारणार नाही. मी परिक्षकांना उत्तरही दिले होते. पण ते त्यांना पटले नाही. असो. अशा घोषणांनी, प्रसंगांनी, विशेषतः बाहुबली हा धर्माला जागतो असे दाखवले आहे, त्यामुळे हिंदूविश्व सुखावले आहे. अशी अनेक दृश्य आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन तर होतंच. पण हिंदू मनही सुखावतं. म्हणूनच बाहुबलीच्या विरोधात त्यांना ऐकणे हे हिंदूंवरचे संकट वाटते. पण तो एक चित्रपट आहे. ती एक कला आहे. कोणत्याही कलेत जमेची बाजू असते, तशा त्रुटीही असतात. त्या दोन्हींचा उहापोह झाला पाहिजे. सबंध बाहूबली २ चित्रपट पाहताना त्यातील तंत्रज्ञानाने आपण भारावून जातो. प्रेक्षकांची नजर हटणार नाही, याची काळजी राजमौली यांनी पुरेपूर घेतली आहे. बाहुबली सारखा भव्य चित्रपट भारतात निघतो आणि तेही प्रादेशिक भाषेत ही अभिमानाची बाब आहे. राजमौली यांनी ही सुरुवात केली आहे. यापुढे असे अनेक चित्रपट तयार होतील अशी आशा आपण बाळगुया. बाहुबली २ हा मनोरंजक आणि आपल्याला एका वेगळ्यात दुनियेत घेऊन जाणारा चित्रपट आहे. बाहुबली १ जेव्हा मी पाहिला, तेव्हा मला मनातून खुप वाटत होते की हा चित्रपट ऑस्करला पाठवावा. पण बाहुबली २ बघून असे वाटत नाही. कारण याच्या मूळ कथेतच त्रुटी आहेत आणि चित्रपट पहिल्या भागाशी विसंगत आहे. असो. 

- जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कावळा - चिमणीचा पूर्वापार शेजारी.