रामूने बब्बनच्या व्यक्तिरेखेवरच जास्त भर दिला आहे. त्यामुळे बाकीच्या व्यक्तरेखा पांगळ्या बनल्या आहेत. अमिताभचा बब्बन ठीक आहे. पण अनेकदा तो ओव्हरएक्टिंग करतो असे वाटते. अजय देवगण आणि प्रशांत राज यथातथाच आहेत. त्याला त्यांच्यापेक्षा त्या व्यक्तिरेखाला आलेले पंगुत्व कारणीभूत आहे. सुश्मिता सेन व निशा कोठारी यांचा अभिनय ठीक. मोहनलालचा अभिनय चांगला आहे, पण त्याचे हिंदी उच्चार खूप खटकतात. राजपाल यादव तर संतापजनक आहे. अमित राय यांनी फोटोग्राफीच्या नावावर बरेच प्रयोग केले आहेत. पण ते सगळे चांगले आहेत, असे म्हणण्याचे धाडस करता येत नाही. वेगवेगळ्या कोनातून अनेक प्रसंग शूट केल्याने चेहरे अनेकदा अर्धेमुर्धे दिसतात. अमिताभचा सफरचंद फेकण्याचा शॉट छान जमलाय. ब्रेक घेण्यासाठी गाणी उपयुक्त आहेत. ती लक्षात ठेवण्याची गरज नाही. तशी वेळही येत नाही. शोलेतील मेहबूबा गाणे उचलले आहे. त्यावर मराठी बाला उर्मिला छान नाचलीय. आणि हो अभिषेक बच्चन दर्शनही यावेळी होते. शोलेमध्ये आऊट़डोअर शूटींग बरेच होते. ऊन, स्वच्छ
प्रकाश, वीरू-बसंती यांची छेडछाड होती. रामूच्या चित्रपटात अंधाराचे साम्राज्य आहे. मळकट, कळकटपणा आहे. नकोसे वाटणारे चेहरे आहेत. शोलेचा पूर्ण प्रभाव बाजूला ठेवून आग पाहिला तरी चटके बसावे असे त्यात काही नाही. कारण आग पार विझून गेलीय. उरलीय ती फक्त राख. आणि राखेचं आपण काय करतो. तर गंगेत सोडून देतो. तसेच याचेही करायचे इति गंगार्पणमस्तू.