दिग्दर्शकाने छोट्या छोट्या दृश्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. स्पोर्ट्स डेला बंकू मैदानावर सतत हरत असतो. त्याला वाटते भूतनाथने येऊन मदत करावी आणि आपण जिंकावे. मुंगीचे उदाहररण देऊनही भूतनाथ त्याला चमत्कार वगैरे काही नसते असे पटवून सांगतो. मेहनतीनेच यश मिळू शकते, हे त्याच्या मनावर ठसवतो. नवी पिढी करीयरला महत्त्व देते आणि आई-वडिला मात्र उपेक्षित रहातात. हेही यातून दाखविले आहे. दिग्दर्शक विवेक शर्मांची चित्रपटाच्या तंत्रावर चांगली पकड असल्याचे दिसून येते. हा त्यांचा पहिला चित्रपट आहे, असे चुकूनही वाटत नाही. चित्रपट पहाता पाहता लोक त्यात गुंतून जातात. वास्तविक पात्र कमी असूनही नीरस वाटत नाही. पण अर्थात चित्रपटात काही कच्चे दुवेही आहेत. मध्यंतरापूर्वीचा भाग छान मनोरंजक आहे. पण त्यानंतर चित्रपट एकदम गंभीर होतो. लहान मुलांऐवजी मोठ्या माणसांसाठी हा भाग बनवला असे वाटते. या भागात काही मनोरंजक दृश्ये हवी होती. चित्रपटाचा शेवटही वेगळा आहे. त्यामुळे तो सगळ्यांना आवडेल असे नाही. शेवटचा एक तास चित्रपट लांबल्यासारखा वाटतो. तो कमी करता येऊ शकतो. संगीत साधारण आहे. जावेद अख्तरची गाणी अर्थवाही आहेत. पण विशाल शेखर त्याला न्याय देऊ शकले नाहीत.
अमिताभ बच्चन 'आफ्टर ऑल' सगळ्यांवर प्रभाव पाडतात. भूतनाथचे पात्र त्यांनी अतिशय बारकाईने आणि त्यातल्या भावभावनांसहित पेलले आहे. अमन सिद्दीकीनेही अमिताभ यांना अभिनयात चांगलीच 'टक्कर' दिली आहे. नैसर्गिक अभिनयाने तो लक्षात रहातो. शाहरूख खान चित्रपटात अधून मधून येतो. जूहीची भूमिकाही छान. प्रिंसिपल सतीश शहाची भूमिका मुलांना हसवणारी आहे. राजपाल यादवला फार संधी मिळालेली नाही.
एकूणात भूतनाथ हा 'फॅमिली एंटरटेनर' आहे. लहान मुलांसमवेत मोठेही हा चित्रपट बघू शकतात आणि तो एंजॉयही करू शकतात.