चौघांनाही आपण संपूर्ण संपत्तीचे मालक होऊन आयुष्य ऐषोरामात जाणार, अशी स्वप्ने पडत असताना अनपेक्षितपणे इन्सपेक्टर कबीरची (संजय दत्त) एंट्री होते. कबीर पुष्कळ दिवसांपासून बोसच्या मागावर असतो. संपत्तीचा मामला असल्याने चौघेच बोसच्या मृत्यूस जबाबदार असणार असा तो संशय व्यक्त करतो. संपत्तीवरून एकमेकांत मतभेद होऊन एकेकटेच खजिन्याच्या शोधार्थ निघतात. ह्या दृश्यांमधील धावपळ कमालीची परिणामकारक झाली आहे. यामध्ये हास्यदृश्यांची गुंफण मनसोक्त हसवण्यासोबतच खुर्चीत बसवून ठेवते. सुरूवातीचा पंधरा मिनिटांचा भाग थोडा रटाळ झाला आहे. इंद्रकुमार भारतीय प्रेक्षकांचा बुद्ध्यांक 10-14 वर्षांच्या दरम्यान असल्याच्या समजुतीतून चित्रपट तयार करत असावेत. भारतीय प्रेक्षक सूज्ञ झाला आहे. त्याची चित्रपटाची जाण वाढण्यासोबतच दर्जेदार कलाकृतींच्या माध्यमातून त्याच्यात परिपक्वता आली असल्याचे त्यांची गावीही नाही. त्यामुळे अनेकदा बाळबोध विनोद करतात. एक आहे. चित्रपटातील हास्य-विनोदात कोठेही अश्लीलता येणार नाही याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली आहे. कारण हल्ली असले चित्रपट बरेच येत आहेत. चित्रपटातील अभिनयाची बाजू भक्कम आहे. जावेद जाफरी, आशिष चौधरी, रितेश देशमुख व अर्शद वारसी यांनी प्रेक्षकांना हसविण्याची कामगिरी चोख पार पाडली आहे. रितेश व अर्शदची अभिनय क्षमता बघता त्यांची पात्रे आणखी खुलवता आली असती. संजयच्या बाबतीतही तसेच म्हणता येईल. असराणी यांनी खूप दिवसानंतर काम करून
आजही आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले आहे. वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटात एकही नायिका नाही तिची कमतरताही भासत नाही. चित्रपटात फक्त दोन गाणी असून पटकथेतील त्यांची पेरणी योग्य आहे. कारण नसताना गाणे घुसडण्याचा अट्टहास केलेला नाही. तांत्रिक बाजू थोडी कमकुवत वाटते. छायाचित्रण व संपादन दोन्ही बाजू अगदी ढिसाळ वाटतात. संवादही पाहिजे तेवढी उंची गाठत नाही. पण तरीही धमाल एक टाईमपास चित्रपट आहे.