Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात
, शनिवार, 31 जुलै 2021 (23:18 IST)
गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप बॅंडपासून गिफ्टपर्यंतच्या वस्तूंनी दुकाने ओसंडून वाहत आहेत. हे सारे पाहिल्यावर मैत्री दिवस साजरा करण्याची खरोखरच गरज आहे काय़ असा प्रश्न पडतो. मैत्री एकाच दिवसाचीच आणि ''फ्रेंडशिप बँड''च्या किमतीएवढीच आहे का?
 
मैत्री ढोलताशे पिटून फ्रेंडशिप बॅंड बांधून व्यक्त करण्याची बाब नाही, ती अंत:करणातून जोडली जाते. ती जाणून घेण्यासाठी अंतःकरणाचाच मार्ग अनुसरावा लागतो. मैत्री ही निरंतर वाहणार्‍या गंगेसारखी निर्मळ व पवित्र असते. पहिल्या पावसानंतर येणार्‍या मातीच्या सुगंधासारखी धुंद व हळुवार वार्‍याच्या स्पर्शासारखी सुखद जाणीव देणारी असते. अशा या नात्याला पैशांत तोलणे म्हणजे या निर्मळ व पवित्र संबंधाचा अपमान नव्हे काय?
 
'मैत्री' ही काही एक दिवस साजरा करण्याचीही बाब नाही. जीवनातील प्रत्येक क्षण मैत्रीचा सोहळा साजरा करायला हवा. मैत्री ही निस्वार्थ असते. एकमेकांच्या सुख-दुखा:त मेतकुटासारखी मिसळून जाणारी असते. कधी कधी असे वाटते की मैत्रीचा हा अर्थ आजच्या झकपक, दिखाऊ जीवनशैलीत पार हरवल्यागत झाला आहे. म्हणूनच हा दिवस साजरा करण्याची गरज भासायला लागली आहे. हे नाते देवाने आपल्याला दिलेले एक वरदान आहे. मैत्रीद्वारे जीवनातील सुखाचे आणि दुखाःचे क्षण भोगण्याची आणि सोसण्याची शक्ती दिलेली आहे.
 
देवाच्या भक्तीची किंवा श्रावणातील पावसाची चिंब ओल या नात्यात आहे. मैत्री ही पाण्यासारखी ‍तरल तर लोखंडासारखी मजबूत असते. हे नाते जीवनात येणार्‍या कुठल्याही प्रकारच्या वादळात नेस्तनाबूत होत नाही. उलट प्रत्येक वादळाच्या स्पर्शाने नितळ होऊन सोन्यासारखे उजळत जाते.
 
जागतिकीकरणाच्या या युगात आणि मुक्त विचारधारेत मैत्रीची व्याख्या बदलली आहे. 20-25 वर्षांपूर्वी आई-वडील व वयात आलेल्या मुलांमध्ये एक दुरावा होता. मुले आई-वडिलांसमोर स्वत:चे विचार मुक्तपणे मांडायला घाबरत, पण आज त्यांच्यामध्ये मैत्रीच्या नात्याची जोड झालेली आहे. हा बदल एका दृष्टीने चांगला आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते.
मैत्रीची साथ, मैत्रीचाच हात
मैत्रीच्या मंदिरात, मैचीचीच वात
मैत्रीच्या घरात मैत्रीची बात
आणि मैत्रीची जात मैत्रीच्याच आत.
मैत्री केवळ एका दिवसापूरती मर्यादित न ठेवता युगांतरापर्यंत असीम, अमर्यादित ठेवून तिच्यात ओतप्रोत प्रेमभावना सतत जागृत ठेवूया. आजचा मैत्री दिन ही शपथ घेऊनच साजरा करूया. काय?
-संजीव जोशी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फूल पाखरा